थिरुवनंतपुरम, वृत्तसंस्था : फुटबॉल वर्ल्ड कपचा विद्यमान विश्वविजेता असणारा लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ पुढील वर्षी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. केरळमधील कोची येथे हा सामना होणार असल्याची घोषणा केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुलरहमान यांनी बुधवारी केली.
अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघटनेशी (एएफए) आमची सप्टेंबरपासून चर्चा सुरू होती. केरळ स्पोर्ट्स फाउंडेशनने आम्हाला या कामी संपूर्ण साहाय्य केले. पाहुण्या संघाच्या सुरक्षेची, तसेच अन्य व्यवस्था केरळ सरकारतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती अब्दुलरहमान यांनी दिली. या सामन्याविषयीची अधिकृत घोषणा पुढील महिन्यात करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) अधिकाऱ्यांकडून सामन्याच्या स्थळाची पाहणी करण्यात येणार असून ते सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतील, असे अब्दुलरहमान म्हणाले. मेस्सी यापूर्वी २०११ साली भारतात खेळला होता. त्यावेळी अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यादरम्यान कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगलेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता.