मुंबई
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे. पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपातील अनेक दिग्गज नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
आज (दि. १९) माजी मंत्री व अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी हाती तुतारी घेतली. तर, सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते रणजीतसिंह मोहिते -पाटील यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच पवार गटात प्रवेश करून तुतारी चिन्हावर माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे सर्वच पक्षातील इच्छुक व नाराज नेत्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली आहे. विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार व नेते पवारांकडे घरवापसी करत आहेत.
आज आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे राज्याला व जनतेला वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज (दि.१९) टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत केले. (Ramesh Chennithala)
टिळक भवन येथे झालेल्या नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थान. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीचा चेहरा कोण आहे त्यांनी जाहीर करावे असे आम्ही सातत्याने विचारत होतो. पण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूतच्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपाचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूत सह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत. देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दीकी आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले, असेही ते म्हणाले. (Ramesh Chennithala)
वरिष्ठ निरिक्षकांची बैठक
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक झाली. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगाणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सिताक्का, टि. एच. सिंग देव, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खा. नासीर हुसेन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, वॅार रूमचे प्रमुख वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department ) आज (दि.१९) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्याचबरोबर लोकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईंमुंग काढणी, भात कापणी यासारखी शेतीतील बरीच कामे ठप्प झाली आहेत. काढणीला आलेली पिके गमावण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. आज (दि.१९) मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department ) काही ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्याचबरोबर कोकण, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा दक्षिण आणि उत्तर, अंदमान आणि निकोबार बेट अंतर्गत भाग आणि ओडिशा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. (Unseasonal Rain)
महाराष्ट्रात ‘या’ ठीकाणी पडेल पाऊस
राज्यात आज (दि.१९) पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याला अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज राज्यातील धाराशिव, बीड, कोकण, अहिल्यानगर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, परभणी, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आज (१९ ऑक्टोबर)पासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या दक्षिण आंध्रप्रदेश पासून कर्नाटक रायल सीमीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, अरबी समुद्रामध्ये चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसणार आहे. राज्यात आज (१९ ऑक्टोबर) रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Unseasonal Rain)
हेही वाचा :
मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी पाच आरोपींना अटक केली. याप्रकरणी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आ. झिशान यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. पोलिसांनी झिशान आणि त्याच्या कुटुंबीयांना या प्रकरणाच्या तपासाची माहिती दिली आहे. (Baba Siddique)
याआधी गुरुवारी मुंबई पोलिसांनी मुख्य शूटर शिवकुमार गौतमसह तीन आरोपींना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी ‘लूक आउट नोटीस’जारी केली. त्यात नाव असलेल्या इतर दोन आरोपींमध्ये शुभम लोणकर आणि संशयित हँडलर मोहम्मद जीशान अख्तरची नावे आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले, की आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली आहेत. आरोपी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून लूक आऊट नोटीस’जारी करण्यात आली आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग (२३), हरिशकुमार बलकराम निसाद (२३) आणि पुण्यातील शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. लोणकर बंधूंनी निषादच्या माध्यमातून शूटरला पाच लाख रुपये रोख दिले होते. शुभम पुण्यात डेअरी चालवतो. शुभमच्या चौकशीत तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे समोर आले. जामीन मिळाल्यानंतर २४ सप्टेंबरला शुभम बेपत्ता झाला, त्याचवेळी पोलिस त्याच्यावर नजर ठेवून होते. (Baba Siddique)
सुरक्षा रक्षकांची चौकशी
सिद्दीकी यांना ‘२+१’ सुरक्षा मिळाली होती. म्हणजेच दिवसा दोन आणि रात्री एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, सिद्दीकी वांद्रे पूर्वेला गेले, तेव्हा त्यांच्यासोबत दोन सुरक्षा रक्षक उपस्थित होते; पण रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दीकी मुलाच्या कार्यालयातून बाहेर पडण्यापूर्वीच एक सुरक्षारक्षक कुठेतरी गेला होता. याचा अर्थ असा की सिद्दीकी यांच्यासोबत फक्त एक सुरक्षा रक्षक होता. त्याने गोळीबार झाला, तेव्हा प्रत्युत्तर दिले नाही. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा :
जमीर काझी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये विदर्भातील जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत बैठकीत सहभागी होण्यास बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज (दि.१८) मुंबईत वाय. बी .चव्हाण सेंटर येथे होणारी महाविकास आघाडीची नेत्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली असून त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथला मुंबईत आले आहेत. उद्या (दि.१९) दिवसभर मुंबईत थांबून ते चर्चा करणार आहेत. (Maharashtra Election)
राज्यात २० नोव्हेंबरला २८८ विधानसभेच्या जागावर व नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चित झालेला नाही. मुंबई व कोकणात उद्धव ठाकरे गट तर पश्चिम महाराष्ट्र शरद पवार गटाला आणि विदर्भ व मराठवाडा विभागात काँग्रेसला सर्वाधिक जागा लढविण्याबाबत ठाम आहे.
लोकसभा निवडणुकीत या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या व त्यांचा एक बंडखोर खासदारही विजयी झाला होता. त्यामुळे काँग्रेसने सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम असून विदर्भात लोकसभेत मिळालेल्या यशामुळे बहुतांशी जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर गुरुवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादावादी झाली. (Maharashtra Election)
आघाडीमध्ये २८८ पैकी जवळपास २१५ जागाबाबत एकमत झाले असून उर्वरित जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. ठाकरे गट विदर्भात नऊ ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे. मात्र काँग्रेसने त्यांना जास्तीत जास्त चार जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावरून एकमत होत नसल्याने कालची बैठक अर्धवट झाली. नाना पटोले हे आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांच्या उपस्थितित जागा वाटपाबाबत चर्चा न करण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतला आहे. त्याबाबत आज संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी दर्शविली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील नेतृत्व निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. त्यामुळे आपण काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नई मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्याशीही बोलणार आहे. जेणेकरून जागा वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र, ठाकरे गटाबरोबर वादा बाबत फारसे बोलण्याचे टाळले. ते म्हणाले राष्ट्रवादी गटाचे नेते अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शरद पवारांशी बोलतात.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची बोलतात त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही तातडीने निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, महाविकास आघाडीतील काही जागेचा तिढा लवकरच संपुष्टात येईल.’ (Maharashtra Election)
निर्णय घेण्यास राज्यातील नेते असमर्थ
जागा वाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघणे महाविकास आघाडीसाठी आवश्यक आहे. मात्र, राज्यातील नेते निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत त्यामुळे आपण काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत
– खा .संजय राऊत (ठाकरे गटाचे नेते)
राऊत काय बोलले समजले नाही
आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी आपापल्या सर्वोच्च नेत्यांची चर्चा करावी लागते. आमचे सर्वोच्च नेते दिल्लीत असल्यामुळे त्यांना सांगणे अपरिहार्य आहे. त्यामुळे संजय राऊत हे काय बोलत आहेत ते समजले नाही.
– नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)
हेही वाचा :
मुंबई; विशेष प्रतिनिधी : जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज (दि.१८) दिली. (Satish Chavan)
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे., असे तटकरे यांनी सांगितले. (Satish Chavan)
हेही वाचा :
पाचगणी; प्रतिनिधी : पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांना प्रदुषण कर व प्रवासी कर ठेक्याबाबत उच्च न्यायालने नोटीस पाठवली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई उच्च न्यायालयात याबाबत समक्ष हजर राहण्याची सुचना प्रशासक तथा मुख्याअधिकारी निखील जाधव यांना देण्यात आली आहे. पाचगणी नगरपालिकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याचा वाद आता उच्च न्यायलयात गेल्यामुळे निखील जाधव यांच्या प्रशासकीय कारभाराबाबत पाचगणी शहरात चांगल्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेकडून सण २०२४ चा प्रदुषण कर व प्रवासी कराच्या ठेकेच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. मोमीन एन्टरप्रायजेसकडून परवेज शेख यांनी याबाबत उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करत पाचगणी नगरपालिकेकडून राबवण्यात आलेल्या प्रवासी कर व प्रदुषण कर ठेक्याबाबत उच्च न्यायलयात दाद मागितली आहे. पाचगणी नगरपालिकेकडून प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका मॅक्स लिंक या कपंनीला ७ कोटी २४ लाख रुपायला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. (Panchgani)
याचिकाकर्ते परवेझ शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेत पाचगणी नगरपालिकेचे आर्थिक नुकसान करुन निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन या निविदेत नियबाह्यतेसह, ठराविक कंपनीला झुकते माप देत निविदा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पाचगणी नगरपालिकेचा प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका ७ कोटी 39 लाख रुपायाला भरुन देखील यापेक्षा कमी भरलेल्या ठेकेदाराला कसा जातो. याचाही प्रश्न याचिकाकर्ते परवेझ शेख यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केला आहे .
पाचगणी नगरपालिकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याच्या निविदेवरुन पाचगणी शहरात चांगलेच वातावरण ढवळून निघाले आहे. उच्च न्यायलयाकडून याबाबत अंतिम काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रवासी कर व प्रदुषण कराच्या ठेकेच्या निवेदेवरुन पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या प्रशासका विरोधात दोन वेळा उच्चन्यायालयात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. उच्च न्यायालयाने ठेक्याच्या निवेदनाबाबत सुचना करुन देखील प्रशासक तथा मुख्याधिकारी पाचगणी नगरपरीषद यांच्या विरोधात पुन्हा एकदा उच्चन्यायलयात याचिका दाखल झाल्यामुळे पाचगणी नगरपालिकेच्या प्रशासकाच्या कारभाराबाबत शंकेची पाल चुकचुकत आहे.
हेही वाचा :
मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप आजच निश्चित करून एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. महायुतीतील भाजपच्या शंभर उमेदवारांची यादी तयार असून, उद्या ती जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिसऱ्या आघाडीने राज्यात दीडशे जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Election)
सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीत दोनशे जागांवर एकमत झाले होते. तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे, यासाठी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आणि इतर नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा दिल्या जातील. जागावाटपात काही जागांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघ जिथे मागील निवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आला होता, ती काँग्रेसकडून ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. भाजपला आणि महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढायचे, असा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे. त्यामुळे जागावाटपात तिन्ही पक्षांनी काही जागांवर सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
मुंबईतील ३३ जागांवर एकमत
आजच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पक्षाला एक जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकते, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. (Maharashtra Election)
भाजपची पहिली यादी १०० जणांची असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून या संभाव्य उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महायुती कोणी किती जागा लढवायच्या याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही; मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघात सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे निश्चित आहे. भाजप १२६ जागांवर लढण्याची शक्यता असून यातील पहिल्या शंभर उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाला ९० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलारसह इतर नेत्यांचा समावेश असेल. पहिल्या यादीतील नावे ही अशा मतदारसंघातील असतील, ज्यांची निवडून येण्याची खात्री शंभर टक्के आहे आणि जे मतदारसंघ सुरक्षित आहेत.
भाजपची काल दिल्लीत उमेदवार ठरवण्याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी काही आमदारांना डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सुमार कामगिरी केल्याच्या दावा करत भाजप पक्षश्रेष्ठींकडून काही विद्यमान आमदारांना तिकीटवाटपात डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. भाजप पक्ष नेहमी धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. त्यामुळे भाजप या विधानसभा निवडणुकीतही धक्कातंत्र वापरून अनेक बड्या चेहऱ्यांना तिकीट नाकारणार असल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांची तिकिटे कापली होती.
महाशक्तीचा १५० जागांबाबत निर्णय
दरम्यान, पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत १५० जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णयदेखील घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस यांच्या विरोधातदेखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज तरंगे पाटील यांच्याशी आमचे बोलणे सुरू आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. महादेव जानकर आमच्यासोबत येतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. आम्ही चांगले उमेदवार देणार असून शरद पवार कसले परिवर्तन आणणार आहात? असा सवालही कडू यांनी केला. तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसे काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल त्यांनी विचारला. परिवर्तनाचा अधिकार युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थाने कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार आहोत. आमच्याकडे छोट्या मोठ्या ३० ते ४० संघटना आहेत. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार आहोत.
– माजी खा. संभाजीराजे, राजू शेट्टी, तिसरी आघाडी
मुंबई; प्रतिनिधी : अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. चंद्रप्रकाश सोनी (वय ७४), कांता सोनी (वय ७४), पेलूबेता (वय ४२)अशी मृतांची नावे आहेत.
अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील रिया पॅलेस इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. ही इमारत १४ मजली असून इमारतीच्या १० व्या मजल्यावर आग लागली. या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कुलिंगचे काम सुरू केले आणि इमारतीच्या १०व्या मजल्यावरील रूममधील तिघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील कूपर रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मृताची मुले अमेरिकेत वास्तव्यास असून हे दाम्पत्य मुंबईत राहत होते. या वयोवृद्ध दाम्पत्यांसोबत एक नोकरसुद्धा राहत होता. मृतक नोकराचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. मृतक दाम्पत्याचा बेड हा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घरात नेमकी आग कशी लागली याबाबतची माहिती समोर आलेली नाही. शेजारील व्यक्तींनी या दाम्पत्याच्या घरातून धूर येत असल्याचे पाहिले. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावला; मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. मग शेजाऱ्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तिघांचाही मृत्यू झाला.