-सायली परांजपे
एखाद्या पुरुषावर सूड उगवण्यासाठी स्त्रीने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केल्याच्या बातम्या येतात फारशा? नाही, कारण सौंदर्य ही पुरुषाची ओळख समजलीच जात नाही. ती तर असते स्त्रीची ओळख. पुरुषावर सूड उगवायचा तर त्याच्या तथाकथित ‘पौरुषा’वर वार केले जातात. त्याचं समर्थन अजिबात नाही पण हा फरक समाजात नेहमीच केला जातो.
लक्ष्मी अगरवाल या अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलीच्या आयुष्यावर बेतलेला छपाक नावाचा सिनेमा सगळ्यांना ठाऊक आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली म्हणण्यापेक्षा जिच्यावर अॅसिड हल्ला झाला आहे अशी एक मुलगी या अॅसिडने चेहऱ्यात केलेले बदल मागे टाकून पुढे कशी जाते याची ही कथा. लक्ष्मी अगरवाल या मुलीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
अशा हल्ल्यांतल्या गुन्हेगाराला कितीही कडक शिक्षा झाली, तरी त्याने केलेलं नुकसान काही भरून येत अशी सर्वसाधारण धारणा असते. प्रचंड पैसा खर्च करून केलेल्या प्लास्टिक सर्जरीसारख्या उपचारांनीही चेहरा (हे हल्ले बहुतेकदा चेहऱ्यावरच होतात, म्हणून चेहरा) पहिल्यासारखा होत नाही हे तर खरंच. मात्र, या हानीहून गंभीर आहे ती असल्या हल्ल्यांमागची मानसिकता.हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि आपण त्याकडे अर्थातच सोयीस्कर दुर्लक्ष करतो.
स्त्रीवर सूड उगवण्यासाठी (किंवा तिला ‘शिक्षा’ देण्यासाठी) तिचा चेहरा विद्रुप करून टाकायचा हा मार्ग काही केवळ गेल्या काही वर्षांत अवलंबला जातोय असं मुळीच नाही. अगदी पूर्वापार चालत आलेली ‘परंपरा’ आहे ती. छपाकचा ट्रेलर बघताना मला आठवली रामायणातली शूर्पणखेची गोष्ट. आपल्याला आवडलेल्या पुरुषाचा उघड उघड अनुनय केल्याची ‘शिक्षा’ म्हणून लक्ष्मणाने नाक-कान कापून विद्रुप केलेली शूर्पणखा. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या सांगण्यावरून त्याच्या अर्ध्या वचनातल्या धाकट्या भावाने दंडकारण्यात एका स्त्रीचे, मग ती राक्षसीण का असेना, नाक-कान कापून टाकले. मला आठवतंय, कोणी तरी सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका व्यक्त केली म्हणून तिला गरोदर असताना सोडून देणारा राम चुकीचं वागला हे अगदी लहानपणीही जाणवलं होतं. अशा पद्धतीने एका स्त्रीला नाक-कान कापून अपमानित करण्यात राम-लक्ष्मणाची काही चूक होती असं मात्र तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. टीव्हीवरच्या रामायण मालिकेत लक्ष्मण शूर्पणखेचं नाक-कान कापतो तेव्हा आम्ही मुलांनी हसून टाळ्या वाजवल्या होत्या, ही लाज वाटावी अशी आठवण ‘छपाक’मुळे ताजी झाली. प्रसिद्ध तेलुगू लेखिका व्होल्गा यांच्या लिबरेशन ऑफ सीता (हे इंग्रजी अनुवादाचं शीर्षक आहे) पुस्तकातला सीता आणि शूर्पणखेतला काल्पनिक संवाद वाचताना शूर्पणखेवरचा अन्याय जाणवला होता. तो आणखी तीव्रतेने बोचला.
शेवटी अॅसिड फेकणं काय किंवा नाक-कान कापणं काय, हेतू एकच. त्या स्त्रीला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणं, तिला विद्रुप करून टाकणं. अशी अद्दल घडवण्याचा अधिकार आपल्याला पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने आहेच दिलेला. पुराणकाळात स्त्रीच्या या अपमानाचा सूड घेण्यासाठी तिच्या भावाने (म्हणजे आणखी एका पुरुषाने) आणखी एका स्त्रीवर अन्याय केला. आज चेहऱ्यावर अॅसिड वगैरे फेकणाऱ्याला कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. अर्थात मूळ मुद्दा आधी म्हटलं तसा दुर्लक्षितच आहे.
स्त्रीला अद्दल घडवण्यासाठी तिला विद्रुप करण्याचे प्रकार पूर्वापार घडत आहेत याचं मूळ कारण म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचं अवास्तव उदात्तीकरणही अनादी काळापासून सुरू आहे. चेहऱ्यावर अॅसिड फेकलं गेल्यामुळे होणाऱ्या जीवघेण्या वेदनांहूनही भयंकर जर काही त्या स्त्रीसाठी असेल, तर या हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर घेऊन घरादारात, समाजात वावरणं. असा चेहरा घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं हा विचार त्या स्त्रीच्या मनात पदोपदी यावा अशी मानसिकता आपल्याकडे खोलवर रुजलेली आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्याचं प्रमाण वाढण्यामागे जसं स्त्रीच्या योनीशुचितेला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व आहे, तसंच मुलींचे चेहरे विद्रुप करण्याच्या गुन्ह्यांमागे त्यांच्या सौंदर्याचं उदात्तीकरण आहे. स्त्री म्हणजे एकतर योनी किंवा सुंदर चेहरा. बास. या पलीकडे माणूस म्हणून स्त्रीचा विचार करण्याची सवय आपल्या समाजाला नाही. शारीरिक सौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व कमी झालं तर ते सौंदर्य हिरावून स्त्रीला धडा शिकवण्याची मानसिकताही हळुहळू बदलत जाईल अशी आशा बाळगायला तरी हरकत नाही.
एखाद्या पुरुषावर सूड उगवण्यासाठी स्त्रीने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केल्याच्या बातम्या येतात फारशा? नाही, कारण सौंदर्य ही पुरुषाची ओळख समजलीच जात नाही. ती तर असते स्त्रीची ओळख. पुरुषावर सूड उगवायचा तर त्याच्या तथाकथित ‘पौरुषा’वर वार केले जातात (त्याचं समर्थन अजिबात नाही पण हा फरक समाजात नेहमीच केला जातो).
अॅसिड फेकण्यासारख्या घटना टोकाच्या झाल्या पण त्याशिवायही स्त्रीचा शारीरिक सौंदर्याचं आपण किती उदात्तीकरण करतो. माझी एक मैत्रीण लहानपणी खूप दांडगाई करायची. कुठेतरी चढताना ती पडली. कपाळावर टाके पडले. घरादाराला एकच काळजी- चेहऱ्यावरचे टाक्यांचे व्रण जातील की नाही. मुलगी आहे ना म्हणून काळजी वाटते. (पुढे लग्नाला उभी करायची असते ना) आणि हेच व्रण मुलाच्या कपाळावर आले तर आमचा बाब्या कसा धडपड्या म्हणून कौतुक!
ओळखीच्या घरात बाळ होणार होतं. ते कोणासारखं दिसावं यावर चर्चा सुरू होती. कोणीतरी म्हणालं, मुलगी झाली तर मावशीवर गेलेली बरी (कारण मावशी दिसायला सुंदर), मुलगा असेल तर जाऊ दे कोणावरही. मुलीचं सौंदर्य तिच्या जन्माच्या आधीपासूनच महत्त्वाचं होऊन जातं, तर नंतर बोलायलाच नको. हे सौंदर्याचं अतिकौतुक करून तिच्यावर किती बंधनं लादली जातात याकडे कोणाला फारसं लक्ष द्यायचं नसतं.
मुलगी कशी दिसायला सुस्वरूप हवी, नाक-डोळे काही आपल्या हातात नसतात पण मग निदान तिने दिसण्याकडे लक्ष पुरवून मुळात जेवढं रूप आहे, त्यात भर घातली पाहिजे. यात काही गैर आहे असंही नाही. आपलं व्यक्तिमत्व सुस्वरूप, प्रसन्न राखण्याचा हक्क तर स्त्री-पुरुष दोघांनाही आहे. मात्र, एखाद्या स्त्रीला ते फारसं महत्त्वाचं वाटत नसेल, तर त्यावरून तिच्याबद्दल जजमेंट्स पास करणं नक्कीच चुकीचं आहे. तसंच तू बाई आहेस म्हणून तुला इतपत नीट राहिलंच पाहिजे ही अपेक्षा चूक आहे. आपण कसं दिसावं याबाबतचा निर्णय पूर्णपणे त्या मुलीचा, स्त्रीचा असावा. सौंदर्याच्या ठोकळेबाज कल्पनांतून आपण जेवढे लवकर बाहेर पडू, तेवढी लवकर त्या सौंदर्यावर डाग पाडण्याची मानसिकता बदलण्यास सुरुवात होईल.
काही वर्षांपूर्वी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा नितळ नावाचा सिनेमा बघितला होता. त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावर कोड असतं. त्या मुलीला कोणीतरी सांगतं की तुझ्या चेहऱ्यावर कोड आहे हे एका अर्थी बरंच आहे. बाईला कायम जखडून ठेवणाऱ्या सौंदर्य नावाच्या तुरुंगातून तुझी सुटका झाली, अशा आशयाचा संवाद होता. खरोखर सौंदर्य नावाच्या या तुरुंगात स्त्रिया बांधल्या गेल्या आहेत अनेक शतकांपासून. या तुरुंगातून बाहेर पडता आलं, तरच वरवरच्या शारीरिक सौंदर्यापलीकडचं आंतरिक सौंदर्य त्यांना अनुभवता येईल.
शारीरिक सौंदर्याच्या साचेबद्ध कल्पनांतून बाहेर आलं पाहिजे हे कितीही मान्य केलं तरी ‘छपाक’ बघताना सर्वाधिक अस्वस्थ करून गेला दीपिका पाडुकोणचा मेक-अपच्या मदतीने तयार केलेला अॅसिडने ‘विद्रुप’ झालेला चेहरा. या हल्ल्याने केलेल्या आघातातून बाहेर येण्यासाठी आणि आल्यानंतर या मुलीने केलेला प्रवास नक्कीच विलक्षण आहे. यात तिला ज्या अन्यायाला तोंड द्यावं लागतं ते खूपच अस्वस्थ करणारं आहे. तरीही दोनेक दिवस सारखा माझ्या डोळ्यापुढे तो चेहरा येत होता. तो चेहरा अंगावर काटा आणत होता. हा सिनेमा बघण्यासाठी खूप मोठं धैर्य गोळा करावं लागलं. चेहऱ्याचं सौंदर्य गौण आहे हे तत्त्वत: कितीही मान्य असलं, तरी अॅसिड हल्ल्याच्या खुणा वागवणारा तो चेहरा डोळ्यापुढे आल्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया तो डोळ्यासमोरून पुसून टाकणं हीच होती. कितीही म्हटलं तरी सौंदर्य आणि विद्रुपता या संकल्पनांच्या बेड्या खूप घट्ट रुतलेल्या आहेत. त्या सैल करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार, खूप चौकटी मोडाव्या लागणार एवढं खरं.