-विक्रांत जाधव
विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान संमेलनाच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून त्यांनी दलित, मुस्लिम आणि ओबीसींना जोडण्याचा प्रयत्न केला. संविधान धोक्यात आहे, जातनिहाय जनगणना हे लोकसभा निवडणुकीतील मुद्दे या विधानसभेतही कायम असल्याचे त्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
राज्यातील सर्वाधिक ६२ विधानभा मतदारसंघ असलेला विदर्भ राज्याच्या सत्तास्थापनेमध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सर्व प्रमुख पक्षांची नेतेमंडळी विदर्भात असल्यामुळे विदर्भाकडे अधिक लक्ष असते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा त्यामध्ये समावेश होतो. विदर्भातील यशापयश हे संबंधित नेत्यांचे यशापयश म्हणून पाहिले जाते, त्यामुळे विदर्भ अधिक संवेदनशील मानला जातो.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचारासाठी येऊन गेले. राज्यातील सर्वच मोठ्या नेत्यांच्या सभांनी वातावरण तापवले. राष्ट्रीय नेत्यांच्या सभांपूर्वीच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भात सभांमधून वातावरण तापविले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सभा घेत आहेत. इतर नेते त्यांच्या गडातच व्यस्त दिसतात. महाराष्ट्राच्या सत्तेचे प्रवेशद्वार म्हणून विदर्भाची ओळख आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमीचा यामुळेही विदर्भाची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. विदर्भात आजवर जो प्रचार झाला त्यावरून संविधान, शेतकरी आणि महिला या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. भाजपने या गडाला सुरूंग लावले. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान संमेलनाच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून त्यांनी दलित, मुस्लिम आणि ओबीसींना जोडण्याचा प्रयत्न केला. संविधान धोक्यात आहे, जातनिहाय जनगणना हे लोकसभा निवडणुकीतील मुद्दे या विधानसभेतही कायम असल्याचे त्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून बदललेले वातावरण लक्षात घेऊन भाजपनेही सावध पावले टाकली. संमेलनात सहभागी झालेल्यांना वाटण्यात आलेल्या लाल रंगाच्या वहीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘लाल दहशत’ पसरविण्यासाठी हे संमेलन होते, असा आरोप केला. परंतु हे प्रकरण फडणवीस यांच्यासह भाजपच्या अंगलट आले. यावरून आरोप-प्रत्यारोपाचा सामनाही रंगला. अजूनही या विषयावरून धुसफूस सुरूच आहे. संमेलनात सहभागी संघटना मात्र ‘अर्बन नक्षल’च्या या वादावरून दुखावल्या आहेत.
२०१९च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २९ जागा मिळविल्या. शिवसेना चार, काँग्रेस १५, राष्ट्रवादी सहा, प्रहार दोन तर सहा अपक्ष आमदार निवडून आले होते. भाजपला जास्ती जागा मिळाल्या तरीही भाजप १०५ पर्यंतच अडकला त्यामुळे सत्तेपासून दूर राहिला. यावेळी भाजपला त्याहून खाली खेचण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. आपले आकडे वाढविण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड सुरू असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून सहा घटक पक्ष तयार झाले आहेत. यातूनच इच्छुकांची संख्या वाढली. यातील अनेकांनी बंडाचे झेंडे हाती घेतले. महायुतीत सुमारे १५ तर महाविकास आघाडीतील २० अशा ३५ मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम आहे. या बंडखोरीने अनेकांचे गणित बिघडविले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने डॉ. जिशान हुसेन यांना उमेदवारी दिली होती. पण, अचानक त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यांच्या या खेळीने काँग्रेसचे साजिद खान पठाण यांना बळ मिळाले. तर वंचितच्या गडातच उमेदवारी संपुष्टात आल्याने ऐनवेळी पाठिंबा देण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ वंचितच्या नेत्यांवर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना भाजपने उमेदवारी दिली. विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या मनधरणीसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली. विशेष विमानाने अहमदाबादला बोलविण्यात आले. प्रदेश उपाध्यक्षपदही दिले गेले. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, काटोलमध्ये युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवल्क्य जिचकार, अहेरीत भाजपचे अंबरीश आत्राम, आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक मानले जाणारे ब्रिजभूषण पाझारे, हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू तिमांडे, अमरावतीत भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता, बडनेऱ्यात भाजप नेते तुषार भारतीय, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रीती बंड, रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख, उमरखेडमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी पक्षनेत्यांची चिंता वाढवली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यामुळे लढत रंगतदार झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. बापलेकीतील संघर्ष अन् मैत्रीपूर्णचा प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात आत्राम घराण्यातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. अन्न, औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दंड थोपटले. तर महायुतीत हा मतदारसंघ भाजपला न सुटल्याने माजी राज्यमंत्री अंबरीश आत्राम यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. या मतदारसंघात यापूर्वी काका-पुतण्यांमधील निवडणूक लढत नवी नाही. पहिल्यांदा बापलेकींमधील सामन्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी दिली. महायुती असतानाही भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली. शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने महायुतीचे दोन्ही घटकपक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सिंदखेडराजात अजित पवारांची साथ सोडून निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. शिंगणे म्हणजेच राष्ट्रवादी असे समीकरण असल्याने अजित पवारांची अडचण झाली. शिवसेनेने डॉ. शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. हक्काच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली. महायुतीचे दोन घटक पक्ष आमने-सामने आल्याने शिंगणेंची वाट सुकर झाल्याचा विश्वास व्यक्त झाला. पण, डॉ. शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने घरातूनच बंडाचा सामना त्यांना करावा लागत आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधाऱ्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरील आपला फोकस कायम ठेवला आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी, धानाला बोनस, कापूस आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात टाकण्याचे आश्वासन सत्ताधारी देत आहे. या योजनांमध्ये भर टाकून अधिकचे लाभ देणार हे विरोधक सांगू लागले आहेत. हमीभावापेक्षा कापूस आणि सोयाबीनला मिळणाऱ्या दरावरून सरकारला विरोधक घेरत आहेत. महिला सुरक्षेचा मुद्दा मांडत आहेत. विदर्भात हे मुद्दे प्रचारात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातील सभेत ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. संविधान, ‘एक है तो सेफ है’चा मुद्दा परत गाजणार आहे. तोवर लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापवत ठेवले जाणार आहे.