ई-मेल हा शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी उपयुक्त असलेला प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी केवळ पत्राद्वारे संदेश, माहिती कळविण्याचा मार्ग होता, मात्र ‘ई-मेल’ मुळे ऑनलाईन, कोठेही, कधीही, काही क्षणात संदेश, माहिती, फाइल्स, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ पाठविणे शक्य झाले आहे. थोडक्यात ई-मेल हे दळणवळणाचे महत्वाचे साधन बनले आहे. पेपरलेस कामकाजात ई-मेल महत्वाची भूमिका बजावत आहे. आज सर्वाधिक वापर हा गुगलच्या ‘जीमेल ‘चा होताना दिसतो.
ई-मेल म्हणजे काय ?
ईमेल (इलेक्ट्रॉनिक मेल) हा इंटरनेटद्वारे एका व्यक्ती अगर संस्थेकडून दुसऱ्या व्यक्ती अगर संस्थेला संदेश, माहिती, फाईल्स पाठवण्याचा एक मार्ग आहे. हा एक अतिशय सामान्य आणि जलद प्लॅटफॉर्म आहे, कि ज्याद्वारे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्ती अगर संस्थेशी संपर्क साधू शकतो, माहिती अगर फोटो, डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, ऑडिओ पाठवू शकतो.
रचना कशी असते ?
ई-मेलची पध्दत ठरलेली असते, यामध्ये नवीन मेल पाठविण्यासाठी ‘Create/Compose’ हा सेक्शन असतो. आलेले मेल ‘Inbox’मध्ये साठवले जातात, तर नंतर पाठवावयाचे ई-मेल हे ‘Draft’ मध्ये ठेवले जातात. पाठवलेले ‘Sent’ मध्ये असतात. याशिवाय ‘Search’, ‘Important’, सोशल मीडियावरचे ‘Social’ अशा विभागणीनुसार ई-मेल पाहावयास मिळतात.
अलीकडच्या काळात हॅकर्सकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत, त्यामध्ये ईमेलद्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही फिशिंग म्हणजे वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड माहिती किंवा बँक अकाउंट माहिती चोरण्यासाठी बनावट ई-मेल पाठविले जातात. ई-मेल साठवून ठेवण्यासाठी ‘Address Book’चा वापर करता येतो.
कसे काम करते?
नवीन ई-मेल अकाउंट ओपन करताना एक ऍड्रेस मिळतो, तो यूजर जे नाव देईल त्या नावाने तयार होत असतो. नवीन ई-मेल अकौंट ओपन केल्यांनतर सुरवातीला ‘Inbox’ नावाचा विभाग मिळतो की ज्यात नवीन आलेले ई-मेल असतात, त्याच्यानंतर ‘Outbox’ की ज्यामध्ये पाठविले जाणारे ई-मेल, ‘Draft’मध्ये नंतर पाठवावयाचे ई-मेल असतात, ‘Sent’ यात पाठविलेल्या ई-मेलची माहिती असते. ‘Reply’ एखाद्या मेलला रिप्लाय याद्वारे दिला जातो, ‘Forword’ आलेला ई-मेल अन्य ई-मेल अड्रेसना याद्वारे पाठविला जातो.
ई-मेल ऍड्रेस : प्रत्येक ईमेल यूजर एक अद्वितीय ई-मेल पत्ता असतो. हा पत्ता इनबॉक्सप्रमाणे काम करतो, जिथे सर्व ईमेल येत असतात.
ई-मेल सर्व्हर: ई-मेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ई-मेल सर्व्हर आवश्यक असतो. हा एक कॉम्प्युटर असतो की, जो ईमेल साठवतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतो.
ई-मेल क्लायंट: कॉम्पुटर, स्मार्टफोन किंवा वेब ब्राउझरद्वारे ई-मेल क्लायंट वापरून ई-मेल पाठवता तसेच प्राप्त करू शकता.
लोकप्रिय ई-मेल कंपन्या :
Gmail, Outlook, Yahoo mail, Godaddy, Zoho, iCloud, Rediffmail
फसवणूक कशी होते ?
ईमेलद्वारे फसवणूक किंवा फिशिंग हा एक सामान्य सायबर गुन्हा आहे, ज्यामध्ये हल्लेखोर फसव्या ईमेल पाठवून यूजर्सची वैयक्तिक माहिती किंवा पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात. हे ईमेल सहसा विश्वासार्ह संस्था किंवा व्यक्तीचे असल्यासारखे भासविले जाते, परंतु प्रत्यक्षात ते फसवणूक करणारे असतात. वेगवेगळी आमिषे दाखविल्या जाणाऱ्या नामंकित कंपन्यांच्या नावाने पाठविलेल्या बनावट ई-मेलला लोक अधिक फसतात, त्यामुळे अशा प्रकारचे मेल सातत्याने पाठविले जात असतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास टाटा, बजाज कंपन्यांकडून ऑफर्स तसेच महावितरण कंपनीच्या नावे वीज बिल भरण्यासाठीची बनावट लिंक पाठविणे, या गोष्टी पाहावयास मिळतात, की लोक खातरजमा न करता त्यावर क्लिक करतात आणि फसवणूक होते.
फसवणुकीच्या पद्धती:
फिशिंग ई-मेल (Phishing mail) : या प्रकारात ई-मेल यूजर्सची अकाउंटमधील माहिती बदलण्यास सांगितली जाते, जसे की पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर.
मालवेअर (Malware): या प्रकारात यूजर्सना व्हायरस असलेल्या फाईल पाठवून त्या डाउनलोड करण्यासाठी किंवा कॉम्प्युटरवर मालवेअर इंस्टॉल करणाऱ्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते.
रॅन्समवेअर (Ransomware) : या प्रकारचे ई-मेल यूजर्सचा कॉम्प्युटर लॉक केला जातो आणि नंतर डेटा परत मिळवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.
वापर करताना ही काळजी घ्या
- ई-मेलसाठी मजबूत पासवर्डचा वापर करावा, तो किमान ८ ते १२ शब्दांचा पासवर्ड द्यावा, ज्यामध्ये अक्षरे (लहान आणि कॅपिटल), अंक आणि स्पेशल किंचा वापर करावा.
- फिशिंग हल्ल्यांपासून सावध रहावे, अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. ई-मेलवर अज्ञाताकडून ई-मेल आला आणि त्यात लिंक असेल तर त्यावर क्लिक करणे टाळावे.
- कोणाशीही पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, मोबाईल नंबर किंवा इतर संवेदनशील माहिती कोणत्याही ई-मेलमध्ये शेअर करू नये.
- ई-मेल अकाउंट नियमितपणे अपडेट करावे. सॉफ्टवेअर अपडेट्स:, ई-मेल क्लायंट तसेच ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी अपडेटेड ठेवावी.
- अन्य कोणत्याही उपकरणावरून ई-मेल लॉगिन केल्यास बाहेर पडताना ‘Logout’ करायला विसरून नये, तसेच पासवर्ड ‘Save’ करू नये.
- ई-मेल वापरताना सुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा वापर करावा.
- जीमेल, आउटलुक, रेडीफमेल सारख्या लोकप्रिय ई-मेल सेवांचा वापर करावा.
- कॉम्प्युटर, लॅपटॉपवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आणि फायरवॉल इंस्टाल करावे व ते अपडेटेड ठेवावे
ई-मेल व इतर महत्त्वाच्या डेटाचा नियमित बॅकअप घ्यावा.