नवी दिल्ली : द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा जसा कापून घेतला, तशी वागणूक भाजप देशातील तरुणांना देत असल्याचा सणसणीत आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी केला. (rahul gandhi)
भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सुरू असलेल्या वादळी चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप सरकारच्या काळात सुरू असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. त्यांनी संविधानाबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी व्यक्त केलेल्या मतांचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, ‘…तुम्ही अग्निवीर योजना राबवून तरुणांचा अंगठा कापला. तुमच्या कारकीर्दीत पेपरफुटीचे ७० प्रकार घडले. तेव्हा तुम्ही भारतातील तरुणांचा अंगठा कापला. दिल्लीबाहेर शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, शेतकऱ्यांवर तुम्ही लाठीमार केलात. शेतकरी तुमच्याकडे एमएसपीची मागणी करतात. त्यांची मागणी योग्य आहे. पण तुम्ही अदानी, अंबानींच्या नफ्याची सोय करता आणि शेतकऱ्यांचा अंगठा कापता. आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो ‘डरो मत.’. तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुमचा अंगठा कापू.’ हाच तुमच्या आणि आमच्यातील फरक आहे.’(rahul gandhi)
‘आत्मविश्वास, सामर्थ्य आणि निर्भयपणा कौशल्यातून, अंगठ्याद्वारे येतो. ही अभयमुद्रा आहे. सत्ताधारी लोक मात्र त्याविरोधात आहेत. द्रोणाचार्यांनी ज्या पद्धतीने एकलव्याचा अंगठा कापला, तसा तुम्ही संपूर्ण राष्ट्राचा अंगठा कापण्यात व्यस्त आहात. जेव्हा तुम्ही धारावी अदानीकडे सोपवता, तेव्हा तुम्ही उद्योजक, लघु आणि मध्यम व्यवसायांचे अंगठे कापता. भारतातील बंदरे, विमानतळ आणि संरक्षण उद्योग अदानींच्या घशात घालता तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भारतातील सर्व व्यवसायाचे अंगठे कापले आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.(rahul gandhi)
‘भारतात आज विचारांची एक मोठी लढाई सुरू आहे. या बाजूला (विरोधी पक्ष) संविधानातील अपेक्षित संकल्पनांचे रक्षक आहेत. या विचारधारेशी बांधलेले महापुरूष आमच्याकडे प्रत्येक राज्यात आहेत. तामिळनाडू म्हणाल, तर आम्ही पेरियार सांगू, कर्नाटक विचाराल तर आम्ही बसवण्णा, महाराष्ट्राबद्दल विचाराल तर आम्ही फुले, आंबेडकर आहेत. गुजरात विचाराल तर महात्मा गांधी आहेत. तुम्हाला मात्र जुन्या बुरसटलेल्या विचाराने देश चालवायचा आहे,’ असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
खासदार राहुल गांधी यांनी भाषणाची सुरूवात सावरकर यांनी राज्यघटनेबद्दल व्यक्त केलेल्या मतांनी केली. भारताची राज्यघटना आणि त्यांची भारताविषयीची संकल्पना काय होती ते मला सांगायचे आहे. भारतीय राज्यघटनेत भारतीय असे काहीही नाही, असे सावरकर म्हणत. वेदानंतर मनुस्मृती हाच हिंदूंसाठी सर्वांत पूजनीय ग्रंथ आहे, असे सावरकरांचे म्हणणे होते. हे सावरकरांचे शब्द आहेत. त्यामुळे आमची लढाई कुणाविरोधात आहे ते स्पष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा :