मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने या स्पर्धेसाठी आयसीसीकडे पाठवलेल्या भारतीय संघातून बुमराहला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, प्राथमिक संघात नसलेल्या वरुण चक्रवर्तीचा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील कामगिरीच्या आधारे या संघात समावेश करण्यात आला. (Team Selection)
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीदरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. या कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये त्याने गोलंदाजीही केली नव्हती. तेव्हापासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. जानेवारी महिन्यात आयसीसीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवलेल्या प्राथमिक संघामध्ये बुमराहचा समावेश असला, तरी त्याच्या फिटनेसवरच त्याचे अंतिम संघातील स्थान अवलंबून होते.(Team Selection)
मागील आठवड्यात बीसीसीआयच्या बेंगळुरू येथील सेंटर फॉर एक्सलन्स येथे बुमराहची वैद्यकीय चाचणी आणि स्कॅन्स करण्यात आले. त्यानंतर, वैद्यकीय पथकाने यासंबंधीचा अहवाल निवड समितीला सादर केला असून त्यामध्ये बुमराह अद्याप पूर्णपणे फिट नसल्याचे म्हटले आहे. परिणामी, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्याजागी हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, हर्षितला अंतिम संघात स्थान देऊन अनुभवी महंमद सिराजला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. तथापि, चेंडू जुना झाल्यावर सिराजच्या गोलंदाजीतील भेदकता कमी होत असल्याचे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघनिवड जाहीर करताना कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. याच मुद्द्यावरून त्याचा अंतिम संघात समावेश झाला नसल्याचा अंदाज आहे.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देताना प्राथमिक संघातील यशस्वी जैस्वालला वगळून राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. वरुणने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत १४ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या आधारे त्याची वन-डे संघात निवड करून इंग्लंडविरुद्धच्या कटक येथील दुसऱ्या सामन्यात त्याला वन-डे पदार्पणाची संधीही देण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा संघात समावेश करताना वॉशिंग्टन सुंदरला वगळले जाईल, असा अंदाज होता. तथापि, हा अंदाज निवडकर्त्यांनी फोल ठरवला. हे दोन बदल वगळता प्राथमिक संघातील उर्वरित खेळाडूच अंतिम संघातही कायम आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. (Team Selection)
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, महंमद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
राखीव खेळाडू – महंमद सिराज, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे.
हेही वाचा :
ताज्या बातम्या
कोलकाता : गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये विदर्भाने तमिळनाडूवर १९८ धावांनी मात केली, तर गुजरातने सौराष्ट्राला एक डाव ९८ धावांनी हरवले. केरळला जम्मू आणि काश्मीरवर विजय मिळवण्यासाठी अखेरच्या दिवशी २९९ धावांची आवश्यकता आहे. (Mumbai Win)
मुंबईने तिसऱ्या दिवशी हरियाणाविरुद्ध २९२ धावांची आघाडी घेतली होती. मंगळवारी मुंबईचा दुसरा डाव ३३९ धावांत संपुष्टात आला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावताना १८० चेंडूंमध्ये १३ चौकारांसह १०८ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ६ चौकार व एका षटकारासह ४८ धावा फटकावल्या. मुंबईने पहिल्या डावामध्ये १४ धावांची आघाडी घेतल्यामुळे हरियाणासमोर विजयासाठी ३५४ धावांचे लक्ष्य होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच २०१ धावांत संपुष्टात आला. (Mumbai Win)
हरियाणातर्फे दुसऱ्या डावामध्ये लक्ष्य दलाल आणि सुमीत कुमार यांनाच अर्धशतकी कामगिरी करता आली. सलामीवीर लक्ष्यने १३० चेडूंमध्ये ९ चौकारांसह ६४ धावा, तर सुमीतने ९६ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ६२ धावा केल्या. हरियाणाचे अन्य फलंदाज मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रॉयस्टन डायसने ३९ धावांत हरियाणाचा निम्मा संघ गारद केला. शार्दुल ठाकूरने ३, तर तनुष कोटियनने २ विकेट घेऊन मुंबईच्या विजयात हातभार लावला. (Mumbai Win)
उपांत्य फेरीत मुंबईची लढत विदर्भाच्या संघाशी होईल. हे दोन्ही संघ मागील मोसमाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. मंगळवारी विदर्भाने उपांत्यपूर्व लढतीमध्ये तमिळनाडूसमोर विजयासाठी ४०१ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल तमिळनाडूचा दुसरा डाव २०२ धावांत आटोपला. गुजरातने पहिल्या डावामध्ये घेतलेल्या २९५ धावांच्या आघाडीपुढे सौराष्ट्राचा दुसरा डाव १९७ धावांत गारद झाला. जम्मू आणि काश्मीरने चौथ्या दिवशी दुसरा डाव ९ बाद ३९९ धावांवर घोषित करून केरळसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर दिवसअखेरपर्यंत केरळने दुसऱ्या डावात २ बाद १०० धावा केल्या होत्या. (Mumbai Win)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ३१५ आणि दुसरा डाव – ८५.३ षटकांत सर्वबाद ३३९ (अजिंक्य रहाणे १०८, सूर्यकुमार यादव ७०, शिवम दुबे ४८, अनुज ठकराल ४-७०, अंशुल कंबोज २-५७) विजयी विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ३०१ आणि दुसरा डाव ५७.३ षटकांत सर्वबाद २०१ (लक्ष्य दलाल ६४, सुमीत कुमार ६२, जयंत यादव २७, रॉयस्टन डायस ५-३९, शार्दुल ठाकूर ३-२६, तनुष कोटियन २-१५).
हेही वाचा :
डी. गुकेशचे आव्हान संपुष्टात
व्हिसेनहॉस : भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशचे फ्रीस्टाइल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये सलग दुसऱ्या लढतीत त्याला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या फॅबिआनो कॅरुआनाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. (D. Gukesh)
कॅरुआनाविरुद्धची पहिली उपांत्यपूर्व लढत गमावल्यानंतर गुकेशला आव्हान टिकवण्यासाठी दुसऱ्या लढतीत विजय मिळवणे अनिवार्य होते. तथापि, या लढतीत अवघ्या १८ चालींनंतरच गुकेशने सामना सोडला. या लढतीत गुकेश काळ्या मोहऱ्यांसह खेळला. ही लढत जिंकल्यास गुकेशला कॅरुआनाविरुद्ध टायब्रेकर खेळण्याची संधी होती. परंतु, कॅरुआनाने त्याला ही संधी न देता २-० अशा विजयासह उपांत्य फेरीत आगेकूच केली. गुकेशने इतक्या लागलीच शरणागती पत्करण्याबाबत बुद्धिबळतज्ज्ञांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. (D. Gukesh)
गुकेश आता या स्पर्धेत ५ ते ८ या स्थानांसाठी खेळेल. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझावर १.५-०.५ अशी मात केली. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने उझबेकिस्तानच्या नॉदिर्बेक अब्दुसत्तारोव्हला २-० असे पराभूत केले. उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोवने अमेरिकेच्या हिराकू नाकामुराविरुद्ध २.५-१.५ असा विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत केमरशी कार्लसनशी, तर कॅरुआनाची सिंदारोवशी लढत होईल. (D. Gukesh)
हेही वाचा :
न्यूझीलंड अंतिम फेरीत
रोहितने टाकले द्रविड, गेलला मागे
नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळणार का, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवण्याची मुदत १२ फेब्रुवारी असून तत्पूर्वी, बुमराहच्या सहभागाविषयी फैसला घेण्यात येईल. (Bumrah)
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पाचवी कसोटी खेळताना बुमराहची पाठीची दुखापत बळावली होती. या दुखापतीमुळे तो पाचव्या कसोटीच्या अखेरच्या डावात गोलंदाजीही करू शकला नव्हता. तेव्हापासून मागील महिनाभर बुमराह पाठदुखीवर उपचार घेत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्याच्या फिटनेसवर अंतिम संघातील सहभाग अवलंबून आहे. (Bumrah)
मागील आठवड्यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बुमराहच्या पाठीचे स्कॅन्स करण्यात आले. त्यानुसार, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक निवड समितीशी चर्चा करणार असून त्यावर आधारित निर्णय घेण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या प्राथमिक संघामध्ये बुमराहचा समावेश असला, तरी तो खेळू न शकल्यास त्याच्याजागी हर्षित राणाची निवड करण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेस १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. (Bumrah)
हेही वाचा :
न्यूझीलंड अंतिम फेरीत
मुंबईची आघाडी अडीचशेपार
लाहोर : केन विल्यमसनने नाबाद शतक झळकावून न्यूझीलंडला तिरंगी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेटनी विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून याबरोबरच न्यूझीलंडने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. (Newzealand)
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडने ४८.४ षटकांत ४ बाद ३०८ धावा करून विजय साकारला. विल यंग आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडला पहिल्या पॉवर-प्लेमध्ये ५० धावांची सलामी दिली. यंग १९ धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवे आणि विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८७ धावा जोडल्या. कॉनवेचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने १०७ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह ९७ धावांची खेळी केली. त्यानंतर, डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथन झटपट बाद झाले. विल्यमसनने मात्र एक बाजू लावून धरत ग्लेन फिलिप्ससह संघाला विजयापर्यंत पोहोचवले. विल्यमसनने ११३ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १३३ धावा फटकावल्या. त्याचे हे कारकिर्दीतील चौदावे शतक ठरले. फिलिप्स २८ धावांवर नाबाद राहिला. (Newzealand)
तत्पूर्वी, मॅथ्यू ब्रिझ्कच्या विक्रमी दीडशतकामुळे आफ्रिकेला ६ बाद ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली. कारकिर्दीतील पहिलाच वन-डे सामना खेळणाऱ्या ब्रिझ्कने सलामीला येत ११ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने १४८ चेंडूंमध्ये १५० धावा केल्या. याबरोबरच त्याने वन-डे पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा तब्बल ४७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. १९७८ मध्ये वेस्ट इंडिजच्या डेजमंड हेन्सने पदार्पणात १४८ धावांची खेळी केली होती. विल्यम मुल्डरने ६० चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ६४ धावा करून ब्रिझ्कला साथ दिली. (Newzealand)
विल्यमसन ठरला विराटपेक्षा वरचढ
विल्यमसनने या सामन्यादरम्यान वन-डे कारकिर्दीतील ७,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने १५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांमध्ये ७,००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये विल्यमसनने विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. विराटने १६१ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. सर्वांत वेगवान ७,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर असून त्याने १५० डावांत ही कामगिरी केली आहे.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका – ५० षटकांत ६ बाद ३०४ (मॅथ्यू ब्रिझ्क १५०, वियान मुल्डर ६४, जेसन स्मिथ ४१, मॅट हेन्री २-५९, विल ऑरुर्के २-७२) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड – ४८.४ षटकांत ४ बाद ३०८ (केन विल्यमसन नाबाद १३३, डेव्हॉन कॉनवे ९७, ग्लेन फिलिप्स नाबाद २८, सेनुरन मुथुसामी २-५०, एथन बॉश १-३३).
Kane Williamson’s unbeaten 133 leads the team to victory in Lahore! A 187-run partnership with Devon Conway (97) laying the foundations and a 57-run partnership with Glenn Phillips (28*) to bring the team home! Catch up on all scores | https://t.co/qWQRpLC2D2 📲 #3Nations1Trophy pic.twitter.com/2TV4rrJJiQ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 10, 2025
हेही वाचा :
मुंबईची आघाडी अडीचशेपार
रोहितने टाकले द्रविड, गेलला मागे
कोलकाता : रहाणे, सूर्यकुमारची अर्धशतके; शार्दुलच्या सहा विकेट रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर हरियाणाविरुद्ध दुसऱ्या डावात २९२ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावामधील १४ धावांच्या नाममात्र आघाडीनंतर मुंबईने सोमवारी दुसऱ्या डावात ४ बाद २७८ धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. (Mumbai Lead)
मुंबईच्या पहिल्या डावातील ३१५ धावांना प्रत्युत्तर देताना हरियाणाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २६३ पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे, हरियाणा पहिल्या डावामध्ये आघाडी घेईल, असा अंदाज होता. तथापि, सोमवारी सकाळी शार्दुल ठाकूरच्या स्विंग माऱ्यासमोर जेमतेम १३ षटकांमध्येच हरियाणाचा डाव संपुष्टात आला. सोमवारच्या पाचही विकेट शार्दुलने काढल्या. डावामध्ये ५८ धावा देत ६ विकेट घेऊन त्याने मुंबईला १४ धावांची आघाडी मिळवून दिली. (Mumbai Lead)
दुसऱ्या डावामध्ये मुंबईचे सलामीवीर लवकर बाद झाले, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रहाणेने सिद्धेश लाडसोबत अर्धशतकी, तर सूर्यकुमारसोबत शतकी भागीदारी रचली. सिद्धेश ७५ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ४३ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने ८६ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर रहाणे आणि शिवम दुबे यांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. खेळ थांबला, तेव्हा रहाणे १४२ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ८८, तर दुबे ३० धावांवर खेळत होता. (Mumbai Lead)
उपांत्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यांमध्ये, जम्मू आणि काश्मीरने केरळविरुद्ध दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १८० धावा केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरकडे १७९ धावांची आघाडी आहे. विदर्भाने तमिळनाडूविरुद्ध दुसऱ्या डावामध्ये ५ बाद १६९ धावा केल्या असून त्यांची आघाडी २९७ धावांपर्यंत वाढली आहे. विदर्भाकडून दुसऱ्या डावामध्ये यश राठोडने नाबाद ५५ धावांची खेळी केली. चौथ्या सामन्यामध्ये, गुजरातने सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावामध्ये ५११ धावांचा डोंगर उभारून २९५ धावांची भक्कम आघाडी घेतली. गुजराकडून जयमीत पटेल (१०३) व उर्विल पटेल (१४०) यांनी शतके झळकावली. त्यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद ३३ धावा केल्या असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी २६२ धावांची गरज आहे. (Mumbai Lead)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ३१५ आणि दुसरा डाव ६७ षटकांत ४ बाद २७८ (अजिंक्य रहाणे खेळत आहे ८८, सूर्यकुमार यादव ७०, सिद्धेश लाड ४३, अनुज ठकराल २-६१, सुमीत कुमार १-४२) विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ८४.५ षटकांत सर्वबाद ३०१ (अंकित कुमार १३६, शार्दुल ठाकूर ६-५८).
हेही वाचा :
रोहितने टाकले द्रविड, गेलला मागे
ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश
कटक : भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये शानदार शतक झळकावताना काही विक्रमांच्या याद्यांमध्येही आगेकूच केली. वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांना मागे टाकले. वन-डेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. (Rohit Sharma)
रोहितने रविवारी ९० चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत ११९ धावांची खेळी केली. त्याचे हे वन-डेतील ३२ वे शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात इंग्लंडचा ४ विकेटनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहितने या खेळीदरम्यान काही विक्रमांवर नाव कोरले. (Rohit Sharma)
- रोहितच्या नावावर वन-डेमध्ये १०,९८७ धावा आहेत. इंग्लंडविरुद्धच्या खेळीदरम्यान त्याने राहुल द्रविड (१०,८८९ धावा) यांना मागे टाकले. भारताकडून वन-डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो आता चौथ्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहाव्या स्थानी पोहोचला आहे. भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (१८,४६३) नावे असून त्याच्याखालोखाल विराट कोहली (१३,९११) व सौरव गांगुली (११,३६३) हे आहेत.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत मिळून रोहितचे हे ४९ वे शतक ठरले. त्याने ४८ शतके नोंदवणाऱ्या राहुल द्रविड यांना मागे टाकले. या यादीत रोहित ‘टॉप टेन’मध्ये पोहोचला असून ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तरीत्या दहाव्या स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत कसोटीमध्ये १२, वन-डेमध्ये ३२ आणि टी-२० क्रिकेटमध्ये पाच शतके झळकावली आहेत.
- रोहितच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ३३८ षटकार आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तो ख्रिस गेलला (३३१ षटकार) मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचला. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदी (३५१ षटकार) अग्रस्थानी आहे. तिन्ही प्रकारांत मिळून रोहितच्या नावावर ६३१ षटकार असून सहाशेचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव फलंदाज आहे.
- वन-डेमध्ये धावांचा पाठलाग करताना रोहितने ६,०२६ धावा केल्या आहेत. या यादीत तो सचिन तेंडुलकर (८,७२०) आणि विराट कोहली (७,८५७) यांच्याखालोखाल तिसऱ्या स्थानावर आहे.
- वन-डे क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना रोहितने पाचवे शतक झळकावले. या यादीत तो इंग्लंडच्या जेसन रॉयसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी पोहोचला असून भारताचा विराट कोहली ९ शतकांसह अग्रस्थानी आहे.
हेही वाचा :
ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश
कोल्हापूर महावितरणला सर्वसाधारण अजिंक्यपद
बारामती : प्रतिनिधी : महावितरणच्या २०२४-२५ च्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वच क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतविजेत्या पुणे-बारामती संघाला अजिंक्यपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. ( Mahavitaran sports)
बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते राजेंद्र पवार, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, धर्मराज पेठकर, मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मासं) राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह बारामती परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख आणि समितीप्रमुख उपस्थित होते. ( Mahavitaran sports)
सांघिक खेळांचे अंतिम निकाल
अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – कोल्हापूर व कल्याण-रत्नागिरी. व्हॉलिबॉल – पुणे-बारामती व कोल्हापूर. खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर. टेबल टेनिस (पुरुष)- कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया. बॅडमिंटन (पुरुष)- नाशिक-जळगाव व कोल्हापूर. कॅरम (महिला)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, टेनिक्वाईट महिला- कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया. ( Mahavitaran sports)
वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ)
अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे : ८०० मीटर धावणे – पुरुष गट – परेश चौधरी (नाशिक-जळगाव) व वैभव माने (कोल्हापूर), महिला गट – स्वाती दमाणे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व संजना शेजल (पुणे-बारामती), ५००० मीटर धावणे – पुरुष – सुनिल कोकणे (कल्याण-रत्नागिरी) व एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रतीक वाईकर, गुलाबसिंग वसावे, अक्षय केंगाळे, सोमनाथ कांतीकर (पुणे-बारामती) व प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, अथर्व कोळी, वैभव माने (कोल्हापूर) व महिला गट – श्वेतांबरी अंबाडे, वेदवी सोनवणे, स्वाती दमाणे, संगीता पुंदे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व सोनिया मिठबावकर, सारिका जाधव, सोनाली मोरे, रिता तायडे (सांघिक कार्यालय-भांडूप) ( Mahavitaran sports)
गोळा फेक – पुरुष गट – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व इम्रान मुजावर (कोल्हापूर), महिला गट – प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक – पुरुष गट – धर्मेद्र पाटील (नाशिक-जळगाव) व संदेश मोहिते (सांघिक कार्यालय-भांडुप), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव), भाला फेक – पुरुष गट – अमित पाटील (कोल्हापूर) व मिलींद डफळे (कल्याण-रत्नागिरी), महिला गट – अश्विनी जाधव (कोल्हापूर) व हर्षदा मोरे (कल्याण-रत्नागिरी), उंच उडी – पुरुष गट – सतीश पाटील (कोल्हापूर) व जाकीर शेख (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर), महिला गट – सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), कॅरम – पुरुष गट – अनिकेत भैसाने (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडुप), महिला गट – पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विजया माळी (कोल्हापूर). ( Mahavitaran sports)
टेनिक्वाईट – महिला दुहेरी – मंजुषा माने, पूजा ऐनापूरे (कोल्हापूर) व शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती), टेबल टेनिस – पुरुष एकेरी – अतुल दंडवते (कोल्हापूर) व रितेश सव्वालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), बॅडमिंटन – महिला दुहेरी – वैष्णवी गांगारकर – अनिता कुलकर्णी (पुणे-बारामती) व विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर), कुस्ती – ५७ किलो – आत्माराम मुंढे (पुणे-बारामती) व संभाजी जाधव (कोल्हापूर), ७० किलो – अनंत नागरगोजे (सांघिक कार्यालय-भांडुप) व युवराज निकम (कोल्हापूर), ७४ किलो -गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर) व जयकुमार तेलगावकर (छ. संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७९ किलो – अकिल मुजावर (पुणे-बारामती) व ज्योतीबा ओंकार (कोल्हापूर), ९२ किलो – अमोल गवळी (पुणे-बारामती) व तुषार वारके (कोल्हापूर), ९७ किलो – महेश कोळी (पुणे-बारामती) व हनुमंत कदम (कोल्हापूर) आणि १२५ किलो – प्रमोद ढेरे (कोल्हापूर) व वैभव पवार (पुणे-बारामती). ( Mahavitaran sports)
ब्रिज- पंकज आखाडे-प्रतिक शहा (नाशिक-जळगाव) व अभिषेक बारापहे-विजय पवार (कोल्हापूर). शरीर सौष्ठव – ७० किलो – अमित पाटील (कोल्हापूर) व मोहम्मद शेख (अकोला-अमरावती) ७५ किलो – प्रवीण झुनके (कोल्हापूर) व नामदेव शिंदे (नाशिक-जळगाव), ८० किलो – राहूल कांबळे (कोल्हापूर) व दिनेश दहाडे (नाशिक-जळगाव), ९० किलो – अपूर्व शिर्के (कल्याण-रत्नागिरी) व गौरव पोवार (कोल्हापूर) ९० किलो+ – सलमान मुंडे (कोल्हापूर) व नागेश चौगुले (कोल्हापूर).
पॉवर लिफ्टींग –७४ किलो- मनिष कोंद्रा (पुणे-बारामती) व सागर जगताप (कोल्हापूर), ८३ किलो- स्वप्नील निमसरकार (सांघिक कार्यालय-भांडुप) व प्रवीण घुनके (कोल्हापूर), १०५ किलो- श्रीकृष्ण इंगोले (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व नागेश चौगुले (कोल्हापूर).
हेही वाचा :
ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश
हरियाणाच्या ५ बाद २६३ धावा
महिला ‘टी ट्वेंटी’त कोल्हापूर
कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शतकामुळे हरियाणाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद २६३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३१५ धावांवर संपला असून दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा संघ ५२ धावांनी आघाडीवर आहे. (Haryana)
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या दिवशी ८ बाद २७८ धावा केल्या होत्या. शनिवारी ८५ धावांवर नाबाद असणारा तनुष कोटियन रविवारी शतक पूर्ण करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सुमीत कुमारने त्याचा ९७ धावांवर त्रिफळा उडवला. कोटियनने १७३ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह ९७ धावा केल्या. त्यानंतर, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस या अखेरच्या जोडीने मुंबईचे त्रिशतक पूर्ण केले. निशांत सिंधूने डायसला बाद करून मुंबईचा डाव संपवला. हरियाणातर्फे अंशुल कंबोज आणि सुमीत यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (Haryana)
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या हरियाणाला अंकित आणि लक्ष्य दलाल यांनी ८७ धावांची सलामी दिली. लक्ष्य ३४ धावांवर बाद झाल्यानंतर अंकितने यशवर्धन दलालसोबतही दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. अंकितने कर्णधारास साजेशी खेळी करत २०६ चेंडूंमध्ये १३६ धावा करताना २१ चौकारही ठोकले. त्याला हरियाणाच्या मधल्या फळीकडून मात्र अपेक्षित साथ लाभली नाही. अखेर ७० व्या षटकात शम्स मुलाणीने अंकितला बाद केले. खेळ थांबला, तेव्हा रोहित शर्मा २२, तर अनुज ठकराल ५ धावांवर खेळत होते. मुंबईकडून मुलाणी आणि कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Haryana)
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यांमध्ये, जम्मू आणि काश्मीरचा पहिला डाव २८० धावांत आटोपल्यानंतर केरळने दुसऱ्या दिवशी ९ बाद २०० धावा केल्या. केरळचा संघ अद्याप ८० धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात, विदर्भाने तमिळनाडूविरुद्ध पहिल्या डावामध्ये ३५३ धावा केल्या. विदर्भातर्फे करुण नायरने शतक झळकावताना २४३ चेंडूंमध्ये १८ चौकार व एका षटकारासह १२२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवशी तमिळनाडूची अवस्था ६ बाद १५९ अशी झाली होती. विदर्भाकडे अद्याप १९४ धावांची आघाडी आहे. चौथ्या सामन्यात, सौराष्ट्राचा पहिला डाव २१६ धावांत संपल्यानंतर गुजरातने रविवारी ४ बाद २६० धावा करून ४४ धावांची आघाडी घेतली. (Haryana)
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ८८.२ षटकांत सर्वबाद ३१५ (तनुष कोटियन ९७, शम्स मुलाणी ९१, अजिंक्य रहाणे ३१, अंशुल कम्बोज ३-७१, सुमीत कुमार ३-८१) विरुद्ध हरियाणा – पहिला डाव ७२ षटकांत ५ बाद २६३ (अंकित कुमार १३६, यशवर्धन दलाल ३६, लक्ष्य दलाल ३४, शम्स मुलाणी २-५९, तनुष कोटियन २-५७).
हेही वाचा :
ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश
महिला ‘टी ट्वेंटी’त कोल्हापूर उपविजेता
विराट दुसऱ्या वन-डेमध्ये खेळणार
गॉल : ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये रविवारी चौथ्या दिवशीच ९ विकेटनी विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या या मालिकेमध्ये २-० असे निर्भेळ यश मिळवले आहे. (Australia Win)
या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरच श्रीलंकेची अवस्था दुसऱ्या डावात ८ बाद २११ अशी झाली होती. श्रीलंकेकडे केवळ ५४ धावांची आघाडी असल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित समजला जात होता. रविवारी श्रीलंकेला या धावसंख्येत केवळ २० धावांची भर घालता आल्याने त्यांचा डाव २३१ धावांत आटोपला. शनिवारी ४८ धावांवर नाबाद असणाऱ्या कुसल मेंडिसला रविवारी केवळ २ धावा करता आल्या. त्याने ५४ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुन्हेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ४ विकेट, तर ब्यू वेबस्टरने २ विकेट घेतल्या. याबरोबरच, लायनने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थान पटकावले. त्याच्या नावावर आता ६० विकेट असून त्याने ५९ विकेट घेणाऱ्या शेन वॉर्नला मागे टाकले. (Australia Win)
विजयासाठी ७५ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने १७.४ षटकांमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. उस्मान ख्वाजा २७, तर मार्नस लॅबुशेन २६ धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात १५६ धावांची खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ॲलेक्स केरी सामनावीर, तर दोन्ही कसोटींत शतक झळकावणारा स्टीव्ह स्मिथ मालिकावीर ठरला. या विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील (वर्ल्ड चॅम्पियनशीप) ही अखेरची मालिका होती. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने १९ सामन्यांत १३ विजय मिळवले. आता या स्पर्धेची अंतिम लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जून महिन्यात रंगेल. (Australia Win)
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – पहिला डाव २५७ आणि दुसरा डाव ६८.१ षटकांत सर्वबाद २३१ (अँजलो मॅथ्यूज ७६, कुसल मेंडिस ५०, धनंजय डिसिल्वा २३, मॅथ्यू कुन्हेमन ४-६३, नॅथन लायन ४-८४, ब्यू वेबस्टर २-६) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिला डाव ४१४ आणि दुसरा डाव १७.४ षटकांत १ बाद ७५ (उस्मान ख्वाजा नाबाद २७, मार्नस लॅबुशेन नाबाद २६, प्रबथ जयसूर्या १-२०).
Australia’s first series sweep in Asia in almost two decades! #SLvAUS @ARamseyCricket‘s report from Galle: https://t.co/aZL7gxNJ8t pic.twitter.com/ONkkYehVm5
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2025
हेही वाचा :