मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा या महिन्यात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर सूर्याने दोन आठवडे वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटपासून दूर राहणे पसंत केले होते. त्यानंतर, तो आता मैदानावर उतरण्यास सज्ज झाला असून सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुंबई-आंध्रप्रदेश सामन्याद्वारे तो पुनरागमन करणार आहे.
सूर्या मुंबई संघात परतला असला, तरी संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडेच राहणार असल्याचे समजते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळण्यास आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचे सूर्याने संघव्यवस्थापनास कळवले आहे. हे दोघे भारतीय वन-डे संघात एकत्र खेळत असल्याने त्यांच्यामध्ये ताळमेळ आहे. इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धेमध्ये मात्र सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असून नुकत्याच झालेल्या खेळाडू लिलावामध्ये पंजाब किंग्ज संघाने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.
सध्या मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईचा संघ ग्रुप ‘ई’मध्ये तिसऱ्या स्थानावर असून साखळी फेरीतील त्यांचे दोन सामने अद्याप शिल्लक आहेत. अशावेळी सूर्यासारखा स्फोटक फलंदाज संघात परतल्याने मुंबई संघाची ताकद वाढली आहे. सूर्यकुमार यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. मुश्ताक अली स्पर्धेनंतर होणाऱ्या विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेमध्येही सूर्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करेल. ही स्पर्धा २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.