दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकप्तान स्मृती मानधनाने आयसीसीच्या वन-डे व टी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती ७३४ गुणांसह दुसऱ्या, तर टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत ७४१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (Smriti Mandhana)
नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेमध्ये स्मृतीने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते. त्यानंतर, सध्या सुरू असणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही तिने अर्धशतकी खेळी केली होती. या दोन्ही खेळींचा उपयोग तिला क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी झाला. वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती ही अव्वल दहामधील एकमेव भारतीय खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्व्हर्ट वन-डे फलंदाजांमध्ये ७७३ गुणांसह अव्वलस्थानी असून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही ६२९ गुणांसह तेराव्या स्थानावर आहे. (Smriti Mandhana)
टी-२० महिला फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचे स्थानही सुधारले आहे. हरमनप्रीत ही ६४१ गुणांसह दहाव्या, तर रॉड्रिग्ज ६१९ गुणांसह पंधराव्या स्थानी पोहोचली आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये जेमिमाने ३५ चेंडूंत ७३ धावा फटकावल्या होत्या.
टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या दीप्ती शर्माने दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून तिच्या खात्यामध्ये ७४८ गुण आहेत. इंग्लंडची सोफी एक्सेलस्टोन या क्रमवारीत ७६८ गुणांसह अग्रस्थानी आहे. वन-डे गोलंदाजांमध्ये मात्र दीप्तीचे स्थान दोननी घसरले असून ती ६६० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. (Smriti Mandhana)
हेही वाचा :