वृत्तसंस्था : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या ट्रॉफीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. यात त्याने ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंबद्दल त्याने सांगितले आहे. ट्रॉफीमधील विजेत्या संघाबाबतही त्याने आपले मत मांडले आहे. आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताचा ३-१ अशा फरकाने पराभव करेल, असे त्याने भाकित केले आहे. यासह मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे संघात नसल्यामुळे संघाचे नुकसान झाल्याचे त्याला वाटते.
कोणता फलंदाज करणार सर्वाधिक धावा
आपले भाकित करताना पाँटिंगने सांगितले, की ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला २० फलंदाजांना बाद करावे लागेल. ही कामगिरी करणे भारतीय संघासाठी कठीण असेल. परंतु अशी कामगिरी केली तरच भारतीय संघाला सामन्यात विजय मिळवता येईल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला की, मला असे वाटते या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ किंवा भारताचा रिषभ पंत सर्वाधिक धावा करू शकतो.
स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल : पाँटिंग
पुढे बोलताना पॉटिंग म्हणाला, की भारताविरुद्घ खेळताना स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. यामुळे सामन्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. ज्या-ज्यावेळी स्टीव्हने संघासाठी सलामी दिली आहे. त्यावेळी त्याला चांगली धावा करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी केलेले चांगले राहील.
ऑस्ट्रेलियापुढे रिषभचे आव्हान
भारतीय संघात रिषभ पंतचे संघात असणे संघाला आव्हानात्मक ठरू शकते. मधल्या फळीत खेळताना रिषभचा फॉर्म संघासाठी फायद्याचा ठरतो. चेंडूची चमक आणि कडकपणा कमी झाल्यानंतर तो अधिक आक्रमक फलंदाजी करतो. यामुळे पंतला मालिकेत सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. यामुळे तो मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असू शकतो.
कोणता गोलंदाज घेणार सर्वाधिक विकेट?
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्यांवर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्याची संधी आहे. यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सर्वाधिक विकेट घेऊ शकतो, असे भाकित केले आहे.
पाँटिंग म्हणाला, ‘हेझलवूड सध्या शानदार कामगिरी करत आहे. त्यामुळे मी त्याला या मालिकेतील अव्वल विकेट घेणारा गोलंदाज मानतो.’ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेमुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. ऑस्ट्रेलिया आणि भारत सध्या टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.