Home » Blog » रस्ता चुकवला म्हणून गूगल मॅपला दोषी धरता येईल का?

रस्ता चुकवला म्हणून गूगल मॅपला दोषी धरता येईल का?

गूगल मॅप काम कसा करते, ते रस्ता कसा दाखवते, रस्ता का चुकतो... अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न...

by प्रतिनिधी
0 comments
Google Maps

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गूगल मॅपमुळं बरेलीमध्ये अपघात झाला आणि तिघांना जीव गमावावा लागला. गूगल मॅपमुळं बिहारमधून गोव्याला निघालेल्या कुटुंबाला बेळगावजवळ जंगलात नेऊन सोडलं… या अलीकडच्या घटनांवरून गूगल मॅप चर्चेत आला आहे. त्याबद्दलचं कुतूहल वाढलं आहे. गूगल मॅप (Google Maps) काम कसा करते, ते रस्ता कसा दाखवते, रस्ता का चुकतो… अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न…

गूगलने सुरुवातीच्या काळात Keyhole नावाची कंपनी खरेदी केली होती. या कंपनीनं एक मॅप किंवा तशा प्रकारे काही बनवलं होतं, परंतु ते डेस्कटॉपपुरतं मर्यादित होतं. याच कंपनीच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गूगलनं मॅप डेव्हलप केला. काही अन्य कंपन्यांबाबतही असाच संभ्रम आहे. गूगल मॅप्सच्या सॅटेलाइटसंदर्भातही असाच संभ्रम आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून गूगल लाइव्ह डेटा आणि फोटो घेते, असा एक समज आहे. त्यात तथ्य असलं तरी ते तसंच नाही. अगदी सुरुवातीच्या काळात गूगलनं मॅप डेव्हलप करायला एका सॅटेलाइट सर्व्हिसची मदत घेतली होती. मॅप तयार झाला. इमारती, दवाखाने, नदी, पूल अशा सगळ्या गोष्टी मॅपवर दिसायला लागल्यावर गूगलनं सॅटेलाइटशी संबंध तोडून टाकले. त्याचं कारण असं की सॅटेलाइटचा व्यवहार महागडा होता आणि गूगल मॅपची सेवा मोफत होती. याउपर गूगल सॅटेलाइटची मदत घेत असेल तर त्याची कल्पना नाही.

Maxar Tech ही एक अवकाश, सॅटेलाइट यासंदर्भात काम करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून गूगल आवश्यकतेनुसार फोटो खरेदी करते. आवश्यकता असेल तेव्हाच करते, कारण हा मोठा खर्चिक मामला आहे. तुम्ही जेव्हा मॅपवर सॅटेलाइट व्ह्यू पाहाल तेव्हा या कंपनीचं नाव क्रेडिटमध्ये दिसेल. कारण अलीकडं सगळे फोटो थ्रीडी दिसतात, त्यामुळं वाटतं की, सगळं लाइव्ह आहे.

मग प्रश्न असा पडतो की गूगलकडं हा डेटा येतो कुठून?

गूगलला त्यासाठी कुठंही जावं लागत नाही. तुम्ही-आम्हीच त्यांचा सगळ्यात मोठा सोर्स आहोत. जगभरातले कोट्यवधी स्मार्टफोन वापरकर्ते मिळून मॅप तयार करतात. कधी सरळ आणि कधी वाकडे तिकडे. मॅप हा एक ओपन सोर्स आहे किंवा क्राउड सोर्स प्लॅटफॉर्मही म्हणू शकता. इथं सगळेच डेटा अपलोड करतात. भारतात सरकारी संस्था मॅपवर डेटा अपलोड करीत नसले तरी विदेशात अनेक देशांमध्ये डिजिटल मॅप गूगल मॅपवर अपलोड होतो आणि अपडेटही. त्यानंतर तुम्ही आम्ही येतो. म्हणजे गूगल आपला पाठलाग करीत असते. आपल्यावर गूगलची नजर असते. आपल्याकडं लोकेशन ट्रॅकिंगचा पर्याय असला तरी तो वेळोवेळी सुरू किंवा बंद करावा लागतो. हाच डेटा मॅपसाठी उपयुक्त ठरत असतो.

Google Maps अपडेशन महत्त्वाचं

याचबरोबर मॅपवर डेटा अपलोड करण्याचीही सुविधा आहे. तुमच्याकडे गूगल अकाउंट असेल तर तुम्हीही डेटा अपलोड करू शकता. म्हणजे तुमचं दुकान असेल, संस्था असेल किंवा घर असेल. मॅपवर काँट्रिब्यूट करण्याचा पर्याय स्क्रीनवरच दिसतो. मॅपवरचं हे अद्ययावतीकरण म्हणजे अपडेशन अत्यंत महत्त्वाचं असतं. तेच मॅपला रस्ता दाखवतं. हे अपडेशन झालं नाही तर त्यातून रस्ता चुकण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही छोट्या गोष्टी अपडेट केल्या तर त्याची पडताळणी होत नाही. परंतु तुम्ही मोठ्या गोष्टी अपडेट केल्या म्हणजे हॉस्पिटल, विद्यापीठ, कारखाना वगैरे तर गूगलची टीम त्याची पडताळणी करते आणि त्यानंतरच ती दुरुस्ती केली जाते.

गूगल कारची टेहळणी

गूगल कार हे डेटा कलेक्शनचे प्रमुख माध्यम आहे. गूगल स्ट्रीट व्ह्यू याच कारमुळं पाहू शकतो. डोक्यावर मोठा कॅमेरा बांधून ही कार सगळीकडं फिरत असते. इमारती, रस्ते, झाडांचे फोटो घेत असते. त्यामुळं आपल्याला स्क्रीनवर त्या ठिकाणचा व्ह्यू दिसतो. डेटा कलेक्शन कसं केलं जातं, हे लक्षात येतं. परंतु खरा प्रश्न असतो तो म्हणजे गूगल मॅप आपल्याला रस्ता कसा दाखवतो?

जीपीएसची मदत

लोकेशन सर्व्हिस अनेकदा सुरू, बंद करावी लागते. आपल्याला मॅप आवश्यक नसला तरी हे करावं लागतं. जेवणाची ऑर्डर द्यायची असेल, औषधं मागवायची असतील तर हे करावं लागतं. लोकेशन ऑन म्हणजे जीपीएस कनेक्ट. ज्या ज्या वेळी आपण गूगलला रस्ता विचारतो तेव्हा गूगल मदतीला येते. आधीपासून उपलब्ध असलेला डेटा, आणि त्याक्षणी त्या मार्गावरून चाललेल्या फोनच्या मदतीनं गूगल तुम्हाला अधिक मोकळा असलेला रस्ता सुचवते. त्या परिसरात किती स्मार्टफोन एक्टिव्ह आहेत, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्याच आधारे त्या रस्त्यावरील ट्राफिक आणि लागणारा वेळ सांगितला जात असतो. जितके अधिक स्मार्टफोन असतील तेवढा खात्रीशीर डेटा मिळतो.

एखाद्या परिसरात स्मार्टफोन कमी असतील तर मॅपची थोडी गडबड होते. आता तर मॅपकडून रस्ता दाखवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय)चा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी ठराविक एरियात ट्राफिक किती आहे, त्याचा विचार करून मार्ग सुचवला जातो. यावरून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे एखाद्या एरियातून एखादा माणूस अनेक स्मार्टफोन घेऊन निघाला तर गूगल त्या रस्त्यावर लाललाल खुणा दाखवेल का?

मागं एकदा आपण तसं चित्रही पाहिलंय. आधी ते व्यंगचित्र वाटलं, परंतु ती वस्तुस्थिती होती. तशी घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. सायमन वेकर्ट नावाच्या गृहस्थानं ९९ स्मार्टफोन एकत्र ठेवून बर्लिनच्या रिकाम्या रस्त्यावर ट्राफिक असल्याचा आभास निर्माण केला होता. मॅप त्याठिकाणी स्लो मूव्हिंग दाखवत होता. गूगलनं त्यापासूनही धडा घेतला आहे आणि या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बरेलीमध्ये काय झालं?

बरेलीमध्ये गुरुग्रामहून निघालेल्या तिघांना गूगल मॅपनं (Google Maps) एका बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरवर नेलं. आणि त्यांची कार नदीत कोसळली. या प्रकरणामध्ये मामला अद्ययावतीकरणाचा म्हणजे अपडेशनचा असल्याचे मानले जाते. नदीवर बांधलेला पूल कोसळला होता त्यामुळं त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळं मॅपवर रस्ता दिसत असावा. गूगल मैपपासून mapmyindia और इस्रोच्या bhuvan मध्येही इथं रस्ता दिसत होता. इथं अपडेशन झालं असतं तर ही दुर्घटना झाली नसती. परंतु निष्काळजी झाली आणि त्यात तिघांचे बळी गेले. याला जबाबदार कोण, हे चौकशीअंती समोर येईल.

सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची विनंती राहील, ती म्हणजे गूगल मॅप असेल किंवा आणखी कुठला नकाशा. केवळ मॅपच्या भरवशावर राहू नका. शंका येईल तिथं लोकांशी बोला, लोकांना विचारा.

मॅपवर किंवा आपल्या कारच्या पाठीमागील कॅमे-यावर दिलेली सूचना किंवा इशारा आपण वाचत नाही. तो वाचला तर तेही हेच सांगतील. स्क्रीनवर लिहिलेलं असतं की, कॅमे-याचा व्ह्यू तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्ही आजुबाजूला अवतीभवती बघूनच गाडी चालवा. शेअर खरेदी असो, कुणाच कर्ज घ्यायचं असो किंवा आणखी काही. आपल्याला कागदपत्रं वाचायची सवय नसते. त्याच पद्धतीनं आपण गूगलवर जेव्हा सुरुवातीला लॉगिन केलेलं असतं, तेव्हा अनेक अटी-शर्ती असतात आणि आपण त्या मान्य केलेल्या असतात. त्यामुळं रस्ता चुकला किंवा अपघात झाला म्हणून कसलाही दोष गूगल मॅपवर थोपवता येत नाही. गूगल मॅपला कायद्याच्या कचाट्यात अडकवता येत नाही. (Google Maps)

(विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00