कोल्हापूर/ बेळगाव : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून बंद असलेली महाराष्ट्र आणि कर्नाटक बस सेवा गुरुवारपासून पूर्ववत सुरु होणार आहेत. आज बुधवारी कर्नाटकातून बसेसची वाहतूक कोल्हापूरपर्यंत सुरळीत सुरू झाली तर महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटकातील संकेश्वरपर्यंत सुरू झाल्या आहेत. गुरुवारी महाराष्ट्रातील बसेसचा प्रवास बेळगावपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. (Bus transport)
महाराष्ट्राच्या एसटी बसेसचा चालक आणि वाहकाने कर्नाटकात प्रवाशांना कन्नडमधून उत्तरे न दिल्याने कन्नड वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चालक आणि वाहकांना मारहाण केली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कन्नड वेदिकाच्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचा निषेध करत कर्नाटकातील बसेसवर भगवे ध्वज लावले. तसेच कर्नाटकातील बसेसना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे गेले काही दिवस कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद आहे. त्याचा फटका सीमाभागातील मराठी आणि कन्नड नागरिकांना बसत आहे. (Bus transport)
कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन दोन्ही राज्यातील बस वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील एसटीच्या वाहक आणि चालकांना मारहाण करणाऱ्यांना अटक केली असल्याचे कर्नाटक प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात बसेसना सरंक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Bus transport)
बुधवारी कर्नाटकातून बेळगाव, हुबळी, निपाणी येथून बसेसची वाहतूक महाराष्ट्रात सुरू झाली. कोल्हापुरात मध्यवर्ती बस स्थानकात बसेस आल्या. सध्या परिस्थिती पाहून फक्त कोल्हापूरपर्यतच कर्नाटक बसेसची वाहतूक सुरू आहे. तर कोल्हापूरहून महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटकातील संकेश्वरपर्यंत धावत होत्या, अशी माहिती कोल्हापूर एसटीचे नियंत्रक शिवाजी जाधव यांनी दिली. गुरुवारी परिस्थिती पाहून बेळगावपर्यंत महाराष्ट्रातील बसेस धावतील, असे जाधव यांनी सांगितले. (Bus transport) गुरुवारपासून कर्नाटकातील बसेचची वाहतूक महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. बस सेवा सुरु करण्याबाबत आणि सुरक्षा पुरवण्या बाबत कर्नाटकाच्या मुख्य सचिवानी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी सुरक्षेच्या विषयावर चर्चा केली आहे. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गुरुवारी दुपारपासून बस सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती तयारी आणि उपाययोजना केली आहे. दोन्ही राज्यांचे पोलीस आणि अन्य अधिकारी एकमेकांशी समन्वय साधून असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. (Bus transport)
हेही वाचा :
पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार
महाशिवरात्रीच्या स्नानाची साधली पर्वणी