नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील मेलबर्न कसोटीत भारताच्या जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डी यांची कामगिरी लक्षवेधक ठरली. भारताला या कसोटीत १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला असला, तरी बुमराह व रेड्डीच्या कामगिरीची दखल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने घेतली आहे. एमसीजीच्या सन्मानफलकावर (ऑनर्स बोर्ड) या दोघांना स्थान देण्यात आले आहे. (Nitish, Bumrah)
बुमराहने या कसोटीत पहिल्या डावात चार व दुसऱ्या डावात पाच अशा एकूण ९ विकेट घेतल्या. त्याने यादरम्यान कसोटी कारकिर्दीतील दोनशे बळींचा टप्पाही पूर्ण केला. बुमराहने आतापर्यंत एमसीजीवर खेळलेल्या कसोटींमध्ये २४ विकेट घेतल्या आहेत. नितीशने या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये ११४ धावांची खेळी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. दुसऱ्या डावात मात्र त्याला खाते उघडता आले नव्हते. एमसीजीवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणाऱ्या व डावात पाच बळी घेणाऱ्या खेळाडूंना स्टेडियमच्या सन्मानफलकावर स्थान देण्यात येते. त्यानुसार, रेड्डी व बुमराह यांचे नाव सन्मानफलकावर कोरण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंबंधीचा व्हिडिओ एक्सवरून (ट्विटर) प्रसिद्ध केला आहे. (Nitish, Bumrah)
विशेष म्हणजे, या फलकावर नितीशच्या अगोदरचे नावही अजिंक्य रहाणे या भारतीय फलंदाजाचेच आहे. रहाणेने २०२०-२१ च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेमध्ये मेलबर्न कसोटीत शतक ठोकले होते. गोलंदाजांच्या फलकावर तर बुमराहच्या अगोदरचे नावही बुमराहचेच आहे. बुमराहने २०१८ साली मेलबर्न कसोटीत ३३ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या. (Nitish, Bumrah)
Magnificent 5️⃣-wicket haul 🤝 Special Maiden 💯
Vice Captain Jasprit Bumrah and Nitish Kumar Reddy’s names are etched on the Honours Board of Melbourne Cricket Ground ✍️ 👏#TeamIndia | #AUSvIND | @Jaspritbumrah93 | @NKReddy07 pic.twitter.com/4tat5F0N6e
— BCCI (@BCCI) December 31, 2024
हेही वाचा :
- आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम
- न्यूझीलंडची विजयी आघाडी
- बुमराहला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी नामांकन