मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीतून सावरला असून तो संघासोबत सहभागी झाला आहे. मुंबईने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली असली, तरी ७ एप्रिल रोजी बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता धूसर आहे. (Bumrah)
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान उद्भवलेल्या पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह मागील चार महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. याच दुखापतीमुळे त्याला मागील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सहभागी होता आले नव्हते. आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यांनाही बुमराह मुकला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसआय) सेंटर फॉर एक्सलन्समध्ये बुमराह दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत होता. आता बुमराह पुरेसा तंदुरुस्त झाल्यामुळे त्याचा आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Bumrah)
आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईची कामगिरी फारशी प्रभावी नसल्याने संघाचे चाहते आतुरतेने बुमराहच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. शुक्रवारी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने ‘बुमराह लवकरच परतेल,’ असे सांगत त्याच्या संघात परतण्याचे संकेत दिले होते. आता मुंबईतर्फे बुमराह संघामध्ये सहभागी झाल्याची पोस्ट करण्यात आल्यामुळे हार्दिकचे संकेत खरे ठरले आहेत. “बुमराह काल रात्री संघामध्ये दाखल झाला. आज त्याने संघासोबत काही काळ सराव केला. मुंबईचे फिजिओ त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. आज गोलंदाजी करताना त्याला कोणताही त्रास जाणवला नाही,” अशी माहिती मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी दिली. (Bumrah)
मुंबईचा संघ वानखेडेवर सोमवारी बेंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यामध्ये बुमराहची निवड अंतिम अकरा खेळाडूंत होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला असून गुणतक्त्यात मुंबईचा संघ सातव्या स्थानी आहे. आयपीएलमध्ये २०१३ पासून केवळ मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहच्या नावावर आतापर्यंत १३३ सामन्यांत १६५ विकेट घेतल्या आहेत. (Bumrah)
हेही वाचा :