उदय कुलकर्णी, मुंबई
लेखक, संपादक, रसिक श्रीयुत सुनील कर्णिक यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या `ब्राह्मणकन्या` या कादंबरीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर तारीफ केली होती. जुनी कादंबरी आहे माहीत होतं. फक्त नाव ऐकून होतो. ही मागवली व वाचली. वाचनाची सुरुवात करताना इतकी जुनी कादंबरी काय वाचायची, चाळून बघू असा विचार मनात होता. वाचत गेलो तसं लक्षात आलं. ही खरोखर एक अप्रतिम कादंबरी आहे. (Brahmankanya Novel)
या कादंबरीचे प्रथम प्रकाशन १९३०मध्ये झाले. नंतर पुनर्मुद्रण होत २००५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती मी वाचली. ही व्हीनस प्रकाशनने प्रकाशित केली आहे.
काळाशी सुसंगत
१९३०मध्ये प्रकाशित झालेली असली तरी त्यातील विचार आजही लागू होतात. आपल्या समाजाची स्थिती बघता खेदाने असे म्हणावे लागते की ते शंभर वर्षांनीसुद्धा लागू होतील. परंतु त्याकाळी खरोखर विचारांची घुसळण होत होती. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था यावर चर्चा होत होती. आपले दोष स्वीकारून सुधारणा करण्याची गरज वाटत होती. ते ठामपणे सांगता येत होते. हे सगळे चकित करणारे आहे. आज तर आपण मागेच जाण्याचे ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर याचे महत्त्व आणखीच जाणवते.
१९३०ला जे शब्द समाजात प्रचलित होते व संमत होते ते कादंबरीत वापरलेले आहेत.
मंजुळेची गोष्ट
कादंबरीत मंजुळा ही एक स्त्री आहे. जिची जात ब्राह्मण नाही इतकेच पक्के माहिती आहे. कादंबरीत लिहिल्याप्रमाणे ती कदाचित धोबी किंवा गवळी किंवा तेली अशा कोणत्याही जातीची असू शकेल. तिचा बालविवाह वयाच्या चौथ्या वर्षीच झाला. परंतु ती माहेरीच राहिली. शिकावयास जाऊ लागली. ती सहा यत्ता शिकली. पंधरा-सोळा वर्षाची असताना मास्तरीण झाली. नवरा जुन्नर किंवा तळेगाव येथे कुठेतरी गावी राहत होता. परंतु तो न शिकलेला. खेडवळ. त्यामुळे तिने त्याच्याकडे जाण्याचे नाकारले. वकिलाचा सल्ला घेऊन, डावपेच करून त्याच्यापासून फारकत घेतली. (Brahmankanya Novel)
या मंजुळेचे पुढे अनेकांशी प्रेमसंबंध आले. शेवटी डॉक्टर चिंतोपंत यांच्याशी संबंध जुळला. तो शेवटपर्यंत टिकला. ती त्यांच्याशी एकनिष्ठ राहिली. त्या दोघांना संतती झाली परंतु ती अनौरस. कारण लग्न झालेले नव्हते. त्या दोघांच्या अनौरस संततीमध्ये एक मुलगी होती. तिचे नाव शांताबाई. या शांताचे लग्न कसे होईल अशी मंजुळेस चिंता होती. मुलीने निदान आपल्या पायावर तरी उभे राहावे म्हणून मंजुळेने शांतास चांगले शिकवले. (Brahmankanya Novel)
कालिंदीची कहाणी
अप्पासाहेब डग्गे नावाचा एक ब्राह्मण तरुण वकील होता. तो सुधारकी विचारांचा होता. त्याला सुशिक्षित मुलगी हवी होती. जातिभेद मोडून काढले पाहिजेत असे तो म्हणत होता. त्याने शांताबरोबर लग्न केले. तेसुद्धा हुंडा न घेता.
आता या दोघांना मुले झाली. एक सत्यव्रत, दुसरी कालिंदी. तिसरी उषा.
कादंबरीत कालिंदीची कहाणी विस्ताराने आहे. त्या अनुषंगाने बरीच चर्चा व विचार आहेत.
ब्राह्मणांना सुधारण्याचे प्रयत्न
अप्पासाहेब यांनी शांताबरोबर लग्न केले तेव्हा त्यांना आपण सुधारणा करत आहोत व चांगले काम करत आहोत असे वाटले होते. जातिभेद नष्ट करण्याच्या मार्गावरील एक हे पाऊल आहे असा त्यांचा समज होता. आपण एका अनौरस व मिश्र जातीतील मुलीला पत्नी म्हणून स्वीकारले. तसे आपल्या मुलीला म्हणजे कालिंदीलाही एखादा उमदा तरुण स्वीकारेल असे त्यांना वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. कालिंदीस योग्य स्थळे येत नव्हती.
कालिंदी तर वडिलांना म्हणाली, तुम्ही जे सुधारणावादी पाऊल उचलले त्यामुळे तुमचे काही नुकसान झाले नाही. परंतु तुमच्या मुलांचे मात्र खूपच नुकसान झाले आहे. कारण आमची जात काय हा प्रश्न आहे. ब्राह्मण जात आम्हाला स्वीकारत नाही. आम्ही अनिश्चित जातीतले आहोत. अप्पासाहेब यांच्या पत्नी शांताबाईही म्हणतात, ब्राह्मण मंडळी आपल्या कुटुंबास निराळ्या तऱ्हेने वागवतात. त्यावर अप्पासाहेब त्यांना म्हणतात, तरीही आपण ब्राह्मण मंडळीत मिसळत राहिले पाहिजे. त्यातूनच ब्राह्मण जातीत काही सुधारणा होऊ शकेल. ब्राह्मण जातीला प्रगमनशील करणे याचा उल्लेख कादंबरीत आहे. (Brahmankanya Novel)
नाट्यमय सुरुवात
कादंबरीच्या सुरुवातीलाच गृहत्याग या नावाचे प्रकरण आहे. त्यात कालिंदीच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी एक घटना सांगितलेली आहे. कालिंदी बीएच्या वर्गात शिकत होती. ती बीए पास झाल्यानंतर तिचा मोठा गौरव होईल, वर्तमानपत्रात नाव येईल अशी अपेक्षा होती. परंतु कालिंदेने कॉलेज सोडले. एवढेच नव्हे तर आपल्या आई-बाबांचे घर सोडून ती एका शिवशरणआप्पा नावाच्या व्यापाऱ्यापाशी त्याची केवळ रखेली म्हणून जाऊन राहिली. त्याची तंबाखूची वखार होती. त्याची कालिंदीच्या कुटुंबाबरोबर ओळख होती. तिने हा निर्णय घेतला तेव्हा ती २१ वर्षाची होती. त्यामुळे कायदा तिच्या बाजूने होता. पालक काही करू शकत नव्हते. कादंबरीची सुरवात अशी नाट्यपूर्ण केली आहे. (Brahmankanya Novel)
तिने हे पाऊल का उचलले याबाबत ती आपला भाऊ सत्यव्रत याला सांगते. ब्राह्मण जातीत आपल्याला प्रवेश नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करायचे आणि लग्न झालेच तर त्या माणसाच्या आयुष्याचे नुकसान करायचे. एवढे मला आपलं नैतिक अध:पतन करून घ्यायचं नाही. त्यामुळे ज्या जातीस सर्व तुच्छ समजतात त्याच जातीत आपण वळले पाहिजे.
सत्यव्रत विचारतो. हे तर समजलं. पण तू लग्नाशिवाय एका माणसाबरोबर का राहत आहेस?
विवाहाच्या महत्त्वाची चर्चा
याबाबत ती खुलासा करते. कायदेशीर लग्नाचा हेतू मुलांना पैसे मिळावे हा आहे. त्याप्रमाणेच आपल्यालाही अन्न वस्त्राचा हक्क मिळावा हा आहे. हा पैशाचा हेतू सोडून दिला तर दुसरा हेतू कोणता? तर मुलांना अक्करमाशा कोणी म्हणू नये एवढाच. मुले जातीत राहावी. त्यास अधर्म संतती कोणी समजू नये यासाठी निर्धनांनादेखील धार्मिक विवाहाचे महत्त्व आहे. ज्यांना द्रव्याकडे पहावयाचे नाही त्यांच्या बाबतीत लग्नाचे महत्त्व मुलास कुलीनता प्राप्त व्हावी म्हणूनच असते. जर अक्करमाशांच्या जातीतच माझ्या मुलांना जावे लागणार, तर माझी मुले धर्मसंतती असली काय आणि नसली काय सारखेच. धार्मिक विचाराचे सोंग माझ्या मनात खोट्या आशा उत्पन्न करील. म्हणून ते सोंग मला नको आहे. माझे लग्न अक्षता पडून झाल्याने जर माझी मुले धर्मसंतती होणार नाहीत तर माझ्या बाबतीत निरुपयोगी विवाहसंस्थेचा मी स्वीकार तरी कशाला करू? जर माझ्या अपत्याचे भवितव्य ठरलेलेच आहे तर मी विवाह केला तो अपत्याला उच्च दर्जा मिळावा म्हणून केला. असे न ठरता तो केवळ पैशासाठीच केला असे होईल.
कादंबरीतील विचार
कादंबरीत काही व्यक्तिरेखांच्याद्वारे काय काय विचार येतात बघा:
मुंबईच्या प्रार्थनासमाजापेक्षा उत्तरेकडील आर्यसमाज जातीभेद तोडण्याचे काम जास्त परिणामकारक करेल असा उल्लेख आहे.
स्त्री मिळवती असेल तर तिचे आणि नवऱ्याचे नाते हे पारंपरिक राहणार नाही. व ते नियम लागू होणार नाहीत. वैजनाथ शास्त्री हे कादंबरीतील एक पात्र, ते म्हणतात स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वायत्त बनल्या म्हणजे पातिव्रत्य धर्माचे नितीनियम त्यांना कठोर रीतीने वापरताच येणार नाहीत.
वाङ्मयसेवा, जनसेवा, शास्त्रसेवा इत्यादी बिनकिफायतशीर सेवा करणाऱ्या पुरुषांनी मिळवत्या स्त्रीबरोबर लग्न करावे हा विचार कादंबरीत सांगितला गेलेला आहे.
कादंबरीत रामराव हा एक तरुण वकील व कामगार नेता आहे. तो गिरणी कामगारांचे नेतृत्व करत आहे. त्याचे स्वप्न किंवा ध्येय आहे कामगारांनी एकत्र येऊन स्वतः गिरणीचे मालक बनणे व गिरणी चालवणे.
वैजनाथ शास्त्री यांना एका नव्या पद्धतीच्या समाजाची व्यवस्था असावी असे वाटते. त्यासाठी ते काही आखणी करतात. त्यात काय काय असावे यासाठी दिशादर्शक बेचाळीस सूत्रे सांगितलेली आहेत. त्यातच त्यांनी मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. (Brahmankanya Novel)
नवीन समाजाचे स्वप्न
त्यांचे अकस्मात निधन होते मात्र त्यांनी दिलेले नवीन समाज काढण्याचे बेत वाचून रामराव म्हणतो, सुशिक्षित लोकांची निराळी जात काढण्याचे कारण नाही. मराठा जातच कितीतरी व्यापक आहे, तिच्यातच सर्वांचा समावेश होत जाईल. आज ही जात अशिक्षित असल्यामुळे हिच्यात आपला प्रवेश तुम्हास आवडत नाही. म्हणून तुम्ही हिच्यातून निसटून जाऊ पाहत आहात. मला तर महाराष्ट्रातले सर्व जातीभेद मोडू पाहणारे लोक पुढे मराठ्यांच्या जातीत समाविष्ट होतील असे वाटते. मातृसत्ताक समाजपद्धती तयार करण्याचे ओझे कोणी घेऊ नये. कायदा आणि उपासनापद्धती यांचा परस्पर संबंध तोडून टाकण्यासाठी लागणारा कायदा आपणास पूर्ण स्वराज्य मिळेल तेव्हा आपण आणूच. विदेशी लोकांची सत्ता जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत या सुधारणा सोप्या नाहीत.
इथे कादंबरीचा शेवट आहे. शेवटचे वाक्य जे आहे विदेशी लोकांची सत्ता जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत या सुधारणा सोप्या नाही. यावरून वाटतं की ते स्वातंत्र्यानंतर सुधारणा होतील याबाबत खूप आशावादी होते. मात्र प्रत्यक्षात ज्या काही धार्मिक सुधारणा झाल्या त्या देश पारतंत्र्यात असताना. नंतर मात्र तेवढ्या वेगात होऊ शकल्या नाहीत. सामाजिक चळवळी जरूर झाल्या. परंतु कायदे संमत करण्यास मात्र अडचणी निर्माण झाल्या.
१९३० च्या परिस्थितीशी साम्य
आज प्रेमविवाह होतात व त्यात आंतरजातीय विवाह होतात मात्र ठरवून विवाह होताना म्हणजे अॅरेंज्ड मॅरेजमध्ये मात्र सहसा स्वजातीय विवाह होत असतात. या अॅरेंज्ड मॅरेजमध्ये मुलगा किंवा मुलगी यांच्या पालकांचा आंतरजातीय विवाह आहे का हेसुद्धा बघितले जाते. जर पालकांचा विवाह आंतरजातीय झालेला असेल तर अशा मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यास थोडे तरी अडचणीचे नक्कीच ठरते.
म्हणजे १९३०ची परिस्थिती अजून काही प्रमाणात आहे, मात्र थोडीफार सुधारणा झालेली आहे.
बेने इस्त्राईल अर्थात ज्यू समाज यांविषयीसुद्धा कादंबरीत बराच उल्लेख आहे.
ही कादंबरी चांगलेच नावाजलेली. अजूनही काही लोकांना आठवते. या कादंबरीवर काही लेख, पुस्तके वगैरेही आलेली आहेत. म्हणजे कादंबरीची दखल चांगली घेतली गेली.
कादंबरी वाचनीय आहे, त्यात रचनेचे प्रयोग आहेत. कादंबरीत कथा असाही प्रयोग आहे. (Brahmankanya Novel)
कादंबरी मी वाचली पण टिपणे काढत वाचली नाही त्यामुळे आणखी लिहिणे शक्य होणार नाही. परंतु कोणाला इच्छा झाली तर उत्तम, विशेषतः त्यातले विचार व आजची स्थिती या अंगाने लिहिता आले तर फार उत्तम. लेखकाने विचारमंथन करून जे काही सुचवले आहे त्याचा आता कितपत उपयोग होईल याही गोष्टी सुचवल्या जाऊ शकतात. स्वत: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही लिहिलेले आहे. कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी म्हणजे तिचे रहस्य अधिकाधिक कळत जाईल. त्यांचे म्हणणे योग्यच आहे. पुन्हा वाचल्याने आकलन वाढत जाते.