ब्राझिलिया : भारताच्या मनीष राठोड, हितेश आणि अभिनाश जामवाल या बॉक्सरनी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मनीषने ५५ किलो गटात, हितेशने ७० किलो गटात, तर अभिनाशने ६५ किलो गटात उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले. दरम्यान, ५० किलो गटातून भारताच्या जदुमणी सिंहनेही उपांत्य फेरीत धडक मारली. (Boxing)
ब्राझीलमधील फॉझ दो इगुआकू येथे ही स्पर्धा सुरू आहे. ५५ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मनीषने ऑस्ट्रेलियाच्या युसुफ चॉथियाविरुद्ध ३-० असा विजय मिळवला. या सामन्याच्या सुरुवातीच्या दोन राउंडमध्ये युसुफ मनीषवर वरचढ ठरला होता. परंतु, तिसऱ्या राउंडमध्ये त्याने अतिरिक्त ‘क्लिंचिंग’ केल्यामुळे पंचांनी त्याचे गुण कापले व त्याचा पुरेपूर फायदा मनीषने घेतला. या राउंडमध्ये जोरदार पुनरागमन करत मनीषने सामन्यातील विजय निश्चित केला. पाचपैकी तीन पंचांनी मनीषच्या बाजूने निकाल दिला, तर अन्य दोन पंचांनी दोन्ही बॉक्सरना समान गुण दिले. उपांत्य फेरीत मनीशचा सामना कझाखस्तानच्या नूरसुल्तान अल्तयनबेक याच्याशी होईल. (Boxing)
हितेशने ७० किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या गॅब्रिएल रॉन्तानीला ५-० असे एकतर्फी पराभूत केले. पाचपैकी तीन पंचांनी हितेशच्या बाजूने ३०-२७ असा, तर अन्य दोघांनी २९-२८ असा निकाल दिला. उपांत्य फेरीमध्ये हितेशचा सामना फ्रान्सच्या माकन त्राओरशी होईल. ६५ किलो गटात अभिनाशने उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीच्या डेनिस ब्रिलचा ५-० असा पराभव केला. पाचही पंचांनी अभिनाशच्या बाजूने २९-२८ असा निकाल दिला. उपांत्य फेरीत अभिनाशसमोर इटलीच्या जिआनलुईजी मँलंगाचे आव्हान आहे. (Boxing)
तत्पूर्वी, ५० किलो गटामध्ये भारताचा राष्ट्रीय विजेता जदुमणी सिंह मांन्देंगबामनने ब्रिटनच्या एलिस ट्रोब्रिजला हरवून उपांत्य फेरी गाठली. मागील वर्षी या स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या ट्रोब्रिजने आक्रमक सुरुवात केली होती. परंतु, जदुमणीने कौशल्याने प्रतिस्पर्ध्याचे ठोसे टाळले. हा सामना जदुमणीने ३-२ असा जिंकला. उपांत्य फेरीत त्याचा सामना २२ वर्षांखालील आशियाई विजेता असिल्बेक जालिलोव्ह याच्याशी होईल. या स्पर्धेच्या ७५ किलो, ८५ किलो आणि ९० किलोहून अधिक गटामध्ये मात्र भारतीय बॉक्सरचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले.
हेही वाचा :
सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा
सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण