Home » Blog » नॉर्डिक थरार

नॉर्डिक थरार

नॉर्डिक थरार

by प्रतिनिधी
0 comments

-अमोल उदगीरकर 

आपल्याकडे पाश्चात्य देश म्हणून अनेकदा सरसकटपणे युरोपियन राष्ट्रांना ओळखलं जातं. युरोप म्हटलं की आपल्याकडे इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी एवढंच डोळ्यासमोर येतं. वास्तविक पाहता युरोप हा खंड खूप विस्तीर्ण आहे. उत्तर युरोपात असणारे नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड हे देश (ज्यांना नॉर्डिक देश म्हणून ओळखलं जातं ) आपल्याला ऐकून माहित असले तरी फारसे परिचीत नाहीत. हे देश छोटे असले तरी जगाच्या राजकारणात त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दरडोई उत्पन्नात जगात सरस असलेली आणि अतिशय समृद्ध असणारी ही राष्ट्र कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. कुठल्याही पेचप्रसंगात त्यांना आपली तटस्थता प्यारी असते. जगात कुठं रक्तरंजित संघर्ष चालू असेल तर नॉर्वेसारख्या नॉर्डिक राष्ट्राला त्या संघर्षात मध्यस्थी करायला प्रचंड आवडतं. श्रीलंकेत जेंव्हा तमिळ बंडखोर आणि श्रीलंकन सैन्य यांच्यात भयानक रक्तपात होत असताना नॉर्वेने या दूरच्या संबंध नसलेल्या देशात मध्यस्थी केली होती आणि संबंधित पक्षांना चर्चेच्या टेबलवर आणलं होतं. पण या चिमुकल्या राष्ट्रांच्या तटस्थतेवर काहीवेळा हुकूमशाही रणगाडा फिरला आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने आपले रणगाडे या सुंदर देशात घुसवले होतेच. ही नॉर्डिक राष्ट्रं अजून एका गोष्टीसाठी ओळखली जातात. ती गोष्ट म्हणजे तिथलं निष्ठूर निर्दयी वातावरण. सतत ढगाळ आणि बर्फाच्छादित वातावरण असतं तिथलं. माणसांना साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करायला लावणारं वातावरण. इंगमार बर्गमनसारखा काही मूलभूत अस्तित्ववादी प्रश्न विचारणारा आणि काहीसा नैराश्याकडे झुकलेले सिनेमे बनवणारा स्वीडनमधला महान दिग्दर्शक घडण्यात या वातावरणाचा वाटा मोठा असणार. पण गेल्या काही वर्षात नॉर्वे आणि डेन्मार्क या दोन नॉर्डिक देशांमधून मोठ्या प्रमाणावर उत्तम सिनेमे आणि वेबसिरीज बनत आहेत. चोखंदळ भारतीय प्रेक्षकांमध्ये सध्या बोर्गन‘  या डॅनिश मालिकेचा मोठा बोलबाला आहे. बोर्गन‘  ही पॉलिटिकल ड्रामा श्रेणीत येणारी सीरिज आहे. पण अनेक लोकांसाठी ही सीरिज केव्हिन स्पेसीच्या गेम ऑफ कार्ड्सया गाजलेल्या पॉलिटिकल ड्रामापेक्षा पेक्षा अनेक पटींनी सरस आहे. ग्रीनलँडमध्ये तेलाच्या विहिरी खणण्यावरून या शांत सुशेगात देशात राजकारणाचा आगडोंब उसळतो. या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे एक महिला राजकारणी जिचा उदय पंतप्रधान म्हणून होतो .

आम्हाला राज्यशास्त्र शिकवणाऱ्या एका सरांची एक फार इंटरेस्टिंग थिअरी होती. ते म्हणायचे, ‘आपल्या प्रत्येक कृतीमागे राजकारण असतं. आपण किचनमध्ये गेल्यावर माठातलं पाणी प्यायचं किंवा फ्रिजमधलं असा विचार करून माठातलंच पाणी पितो. त्या कृतीमागेही राजकारण असतं.राजकारण म्हणजे दरवेळी सत्ता मिळवण्यासाठीचं साधन असंच नसतं. हवीहवीशी प्रत्येक गोष्ट- बंगला, गाडी किंवा कुठलीही भौतिक सुखं असो, इतकंच काय हाडामांसाचा माणूस मिळवण्यासाठीही आपण राजकारण एक साधन म्हणून वापरतो.

थोडक्यात काय, राजकारण हे सर्वव्यापी आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, तेव्हाच राजकारण आपल्या पाचवीला पुजलेलं असतं. आणि त्या अर्थानं आपण सगळेच राजकारणी. मायक्रो राजकारण खेळणारे राजकारणी. प्रेमातलं राजकारण किंवा स्त्री-पुरुष नात्यातलं राजकारण हा तर प्राचीन खेळ आहे. इव्ह आणि अॅडमइतकाच प्राचीन. फक्त नावं बदलत जातात. खेळ तोच राहतो. बोर्गनराजकारणाच्या वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पीचवर फ्रंटफूटवर बॅटिंग करतो. मोठ्या देशातल्या राजकारणाला एक ग्लॅमर असतं, ते छोट्या देशातल्या राजकारणाला नसतं. पण ग्रीनलँडसारख्या छोट्या देशातलं राजकारण पण तितकंच क्रूर ,निर्दयी आणि थंड डोक्यानी खेळलेलं असतं. राजकारणी लोकांची वैयक्तिक आयुष्यं, राजकारणाचा त्यावर होणारा परिणाम, आधुनिक राजकारणात असणारं माध्यमांचं महत्व, माध्यमांचा राजकारणातला सहभाग यावर बोर्गन ही मालिका अप्रतिम भाष्य करते. बोर्गन बघताना आपल्यासारख्या राजकारणात प्रचंड रस असणाऱ्या देशातल्या पॉलिटिकल सीरिजचा दर्जा आठवतो आणि मन विषण्ण होतं. नेटफ्लिक्सवर एक नॉर्डिक नॉईर नावाची सब कॅटेगरी आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेतून एखाद्या गूढ रहस्यमय केसचा घेतलेला आढावा असं या सिरीजचं ढोबळमानाने वर्णन करता येईल. नॉर्डिक नॉईरही नेटफ्लिक्सवरची सगळ्यात अफाट श्रेणी आहे. अनेक उत्तम सीरिज आणि सिनेमे या कॅटेगरीमध्ये आहेत. बर्फ़ाळ वातावरण, या नॉर्डिक देशांमधला रात्र -दिवसांचा अनोखा खेळ, अख्खा देश थांबवणारी बर्फ़ाळ वादळं, लोकसंख्येची घनता कमी असल्याने एकूणच स्क्रीनवर आपसूक येणारी निर्मनुष्य स्क्रीन, रस्ते आणि फ्रेम्स या, गच्च ओली पण भयाण सुंदर जंगल गोष्टी नॉर्डिक देशांना अशा क्राईम शोज साठी एक आदर्श सेट अप बनवतात. या देशांच्या वातावरणातच काहीतरी गूढ असं, शब्दात पकडता न येण्यासारखं काही तरी आहे. नेटफ्लिक्सवरच उपलब्ध असणारी बॉर्डरटाऊनही सिरीज बघणं नोईर प्रेमींनीप्रचंड आवश्यक आहे. ह्या सीरिजमधलं मुख्य पात्र असणारा जो डिटेक्टिव्ह आहे त्याला फोटोग्राफिक मेमरीचं वरदान आहे. पण हे स्मृतीचं वरदान आहे की शाप ? सिटीझन केन मध्ये तो प्रख्यात संवाद आहे न – The greatest curse is memory . तर असा हा यातला वेगळा नायक. नायक असण्याचे पारंपरिक साचे तोडणारा. प्रत्येक सिझनला नवीन खलनायक आहेच. ते पण नायकाइतकेच रोचक आहेत. यातला एक खलनायक सार्वजनिक पाणी पुरवठ्यात विष मिसळून पूर्ण शहर संपवण्याचा प्रयत्न करत असतो. एक व्हिलन भूल देऊन लोकांना मारत असतो. या दुष्ट सुष्ट वृतींमधला लढा म्हणजे बॉर्डरटाऊन ‘. ‘ट्रॅपड ही अजून एक अफाट नॉर्वेजियन सीरिज. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनिश्चित आणि क्रूर वातावरण हे नॉर्डिक नॉईर मधलं एक पात्रंच आहे. ट्रॅपडमध्ये बर्फाच्या दरडी कोसळणं, बर्फाची वादळं बघून बघून एका टप्प्यानंतर आपल्या डोळ्यांच्या साईडला छोटासा बर्फाचा थर साचल्यासारखं वाटायला लागतं. पण बर्फाच्या वादळामुळे एका शहराचा उर्वरित देशाशी संपर्क तुटतो. बाहेरून रसद मिळण्याचे सगळे मार्ग खुंटतात आणि तिथल्या छोट्या पोलीस फोर्ससमोर आव्हान येतं एका गूढ गुन्ह्यांचं. निव्वळ छायाचित्रणासाठी ही सीरिज बघावी. द वोलहला मर्डर्स‘ , ‘द ब्रिज‘ , आणि द किलिंगया पण नॉर्डिक नॉईर श्रेणीतल्या आवर्जून बघण्यासारख्या वेबसिरीज. एखाद्या पावसाळी किंवा थंडीचा कडेलोट झालेल्या हुरहुरत्या संध्याकाळी कॉफीचा भरपूर पुरवठा असताना नॉर्डिक सिरीज बघणं हा परमानंद आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00