कोल्हापूर : प्रतिनिधी : महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून नागरी समाजाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी आणि देशाच्या विकासासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले. गतिशीलता आणि स्वावलंबन हा चरख्यामागचा खरा विचार आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.(Book on Gandhi)
शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राद्वारे गांधी अभ्यास केंद्राचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत महात्मा गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने गुरुवारी (दि. ३० जानेवारी) ‘चरखा’ या विषयावर डॉ. लवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. अभय बंग लिखित ‘आजचे शिक्षण आणि महात्मा गांधींचे उपाय’ आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर अनुवादित आणि संपादित ‘गांधी : एक माणूस’ या पुस्तकांचे प्रकाशनही झाले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. (Book on Gandhi)
डॉ. लवटे म्हणाले, गांधीजींनी चरखा हे आपल्या स्वराज्याचे साधन म्हणून स्वीकारले. १९०८ साली गांधीजींनी चरख्याला विचारांचे केंद्र बनविले. त्यावेळी ते गांधीजी बॅरिस्टरीच्या अभ्यासासाठी लंडनमध्ये होते. चरख्याला गांधींनी शेतकऱ्यांचे साधन मानले. स्वातंत्र्यपूर्व काळात जिरायती शेती होत्या. केवळ सहा महिनेच शेतकऱ्यांना कामे असत. उर्वरित वेळेत शेतकऱ्यांना कामे मिळण्यासाठी मुलोद्योगाचा पर्याय गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून प्राप्त करून दिला. प्रत्येक गोष्टीला मूल्य असते हे गांधीजींना मान्य होते. भारतीय अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. बलुतेदार हे स्थिर व्यवसाय करीत आणि आलुतेदार फिरून व्यवसाय करीत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खादी आणि मुलोद्योगाचा विकास व्हावा, असे गांधीजींना वाटत होते. खेड्यांचा विकास केल्याशिवाय भारताचा समृद्ध विकास होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. गांधी विचारांवर छोटे छोटे अभ्यासक्रम सुरू झाल्यास आजचा तरूण स्वावलंबी आणि उद्योजक बनेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘गांधी एक माणूस’ या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दशरथ पारेकर म्हणाले, ‘मिस्टर गांधी : अ मॅन’ या पुस्तकाचे भाषांतर माझ्याकडून झालेले असले तरी, हे पुस्तक गांधीजींच्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या मिली ग्रॅहम पोलाक या तरूणीने लिहिलेले आहे. १९०५ ते गांधी भारतात परत येईपर्यंत म्हणजे १९१५ सालापर्यंत मिली त्यांच्यासोबत राहिल्या. त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मिली पोलाक खूप हुशार आणि गांधीजींना थेट प्रश्न करणाऱ्या, स्पष्टवक्त्या होत्या. गांधीजी एक सामान्य माणूस म्हणून किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून कसे होते याचे वर्णन या पुस्तकात अतिशय वेगळ्या स्वरूपात आहे. ते अन्यत्र कोठेही आलेले नाही. पोलाक ही गांधीजींची पहिली चरित्रकर्ती आणि टीकाकारही आहे. गांधीजींबरोबर एकत्र कुटुंबामध्ये जवळ-जवळ दहा ते बारा वर्षांमध्ये त्या स्त्रीचा आणि तिच्या पतीचा कालावधी गेला आहे. गांधीजी त्यांना आपली लहान भावंडे मानत. त्यांचे पती ग्रॅहम पोलाक गांधीजींच्या इंडियन ओपिनियन या वृत्तपत्रामध्ये मदत करीत होते. तेही वकील होते. व्यावसायिक वकिलीपेक्षा त्यांनी भारतीयांची वकिली केली. हे पुस्तक गांधींजी समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. (Book on Gandhi)
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास होण्यासाठी गांधी विचारांवरील पुस्तकांचे सातत्याने वाचन, चिंतन, मनन आणि चर्चा करणे आवश्यक आहे.
गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. मोसिम पठाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, नागेशकर, डॉ. श्रीराम पवार, डॉ. नंदा पारेकर यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :