महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद : सोने खरेदीच्या बहाण्याने येथील एका सराफाला जवळपास १ कोटी ९० लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोने खरेदीसाठी दिलेले पैसे पाहून ज्वेलर्स मालकाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, त्या भामट्यांनी दिलेल्या बंडलमध्ये ५०० च्या नोटांवर चक्क अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो होता.
अहमदाबाद येथील सराफ बाजारात करोडो रुपयांचा गंडा घातल्याची ही घटना उघडकीस आली आहे. सीजी रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्सचे मॅनेजर प्रशांत पटेल यांनी सराफ व्यापारी मेहुल
ठक्कर यांना कांतिलाल मदनलाल आंगडिया फर्मला २१०० ग्रॅम सोने द्यायला सांगितले होते. त्यानुसार ठक्कर यांनी आपले कर्मचारी भरत जोशी यांना २१०० ग्रॅम सोने आंगडिया फर्ममध्ये देण्यासाठी पाठविले. जोशी दुकानात पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील एका व्यक्तीकडे काउंटिंग मशिन दिले. दुसऱ्याने जोशी यांच्याकडून सोने घेतले. बॅगेत १ कोटी ३० लाख आहेत. ते मोजून होईपर्यंत पुढच्या ऑफिसमधून ३० लाख घेऊन या, असे तिसऱ्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, जोशी यांची नजर चुकवून तिघे भामटे सोने घेऊन तेथून पसार झाले. बॅगेतील नोटांचे बंडल तपासले असता त्या सर्व नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता. तसेच नोटांवर रेसोल बँक ऑफ इंडिया असेही लिहिल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघांचा शोध घेतला जात आहे.
कोल्हापूर : प्रतिनिधी
श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले जाणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून चाचणी झाल्यानंतर हे लाडू मंदिरात आणले जातील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, श्री अंबाबाई देवीच्या नित्यपूजेतील सोन्याच्या जडावी अलंकारांची स्वच्छता रविवारी पूर्ण झाली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिर आवारातील मंडपात देवीचे सर्व दागिने लख्ख करण्यात आले. स्वच्छता आणि इतर कामांसाठी मंदिर व्यवस्थापनांसह भाविकही सेवा देऊ लागले आहेत. सुमधूर भक्तिगीतांमुळे मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळातील प्रसन्नतेची छटा उमटू लागली आहे. विक्रेत्यांकडून विविध साहित्यांचे स्टॉल सजू लागले आहेत.
दर्शन रांग शेतकरी संघाच्या कार्यालयातूनच सुरू होणार आहे. तेथून भाविक बाहेरील दर्शन मंडपात दाखल होतील, असे नियोजन आहे. मंडपावर पत्रे घातले असून पिण्याच्या पाण्याचीही सोयही केली आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्थाही देवस्थान समितीकडून सक्रीय ठेवण्यात येणार आहे. घाटी दरवाजा, नवगृहाजवळ असलेले आरोग्य तपासणी केंद्र सुसज्ज ठेवले जाणार आहे.
जुन्या गरूड मंडपाच्या जागी मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पालखी सोहळा व देवीचे धार्मिक विधी येथे होणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहेत.
११६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
अंबाबाई मंदिर व परिसरावर ९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच आहे. त्यांचा आढावा घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समिती प्रशासक अमोल येडगे यांनी मंदिर व भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आणखी वीस कॅमेरे बसवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यानेही मंदिर परिसरावर वॉच ठेवण्यात येणार आहे.
डॉ. शरद भुथाडिया यांना पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती नाट्य पुरस्कार जाहीर
कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षीपासून परिषदेच्यावतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबर रोजी परिषदेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर शाखेच्या वतीने हा महोत्सव होत आहे. त्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात उद्योग मंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षतेखाली आणि आ. सतेज पाटील प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी दि.५ ऑक्टोबर रोजी नाट्य कलेचा जागर हा विशेष कार्यक्रम आणि सायंकाळी पाच वाजता ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
रविवारी, दि.६ रोजी सायंकाळी चार वाजता महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी डॉ. वासुदेव देशिंगकर संकलित आणि संशोधित ‘मराठी रंगभूमीचे प्रतिभावंत नाटककार’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी कला क्षेत्रात उलेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यासागर अध्यापक, मयूर कुलकर्णी, सागर बगाडे, मंजुश्री गोखले आणि ऑलिंपिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी मोफत प्रवेशिका उपलब्घ करून देण्यात आल्या आहेत.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, नाट्य परिषदेचे कार्यवाह गिरीश महाजन, श्रीकांत जोशी, शिवकुमार हिरेमठ, प्रा. शशिकांत चौधरी, श्रीमती हेमसुवर्णा मिरजकर, आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
महोत्सवात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम
- शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर, दुपारी ३.३० वा. : महोत्सवाचे उदघाटन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा. त्यानंतर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम : सादरकर्ते : संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी
- शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, सकाळी ११ वा. नाट्यकलेचा जागर : सादरकर्ते : नाट्य परिषद, मुंबई. सायं. ५ वा. अमेरिकन अल्बम (मराठी नाटक)
- रविवार दि. ६ ऑक्टोबर, दुपारी ४.३० वाजता समारोप आणि ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चे सादरीकरण.
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. (Dadasaheb Phalke Award )
मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार
चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट सृष्टीत अत्यंत मानाचा मानला समजला जातो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते देशासह परदेशातही आहेत. हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत संवाद शैली, नृत्य, अभिनयात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 17 व्या सोहळ्यात 8 ऑक्टोबर रोजी या पुरस्कार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
Dadasaheb Phalke Award : कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटंल आहे की, ” आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व अनोख्या नृत्यशैलीने दोन पिढ्यांतील रसिक तरुणाईच्या मनावर गारुड घालणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये भूमिका साकारताना आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा आणि नृत्यशैलीचा ठसा उमटवून त्यांनी कलारसिकांच्या मनावर अधिराज्य केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दलच्या या पुरस्काराचे मानकरी ठरलेले मिथुन चक्रवर्ती यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! मिथुन दा आपला भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास भावी पिढयांना प्रेरणा देणारा आहे.”
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व अनोख्या नृत्यशैलीने दोन पिढ्यांतील रसिक तरुणाईच्या मनावर गारुड घालणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये भूमिका साकारताना… pic.twitter.com/RdDGkAtnQ8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2024
हेही वाचा
Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित; सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायी ‘राज्यमाता- गोमाता’ (Rajmata-Gaumata ) म्हणून घोषित केल्या आहेत.
Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता- गोमाता’
राज्यसरकारने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहे. “देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज (दि.३०) घेतला आहे.”
देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट
प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हंटले आहे, “प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना “कामधेनू” असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ) त्याचबरोबर, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. तसेच दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्ण अन्न आहे. आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस “राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. “
अतिशय आनंदाची बातमी !
महाराष्ट्र शासनाने गोमातेला “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषित केले आहे.
प्रत्येक सामान्यांच्या जनमनाचा विचार करुन घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे.त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक आभार !
भारतीय गोवंशाचे संवर्धन,संगोपन करणार्या सर्व गोप्रेमींचे… pic.twitter.com/yi41HPC0wD
— Shekhar Mundada (@shekhar_mundada) September 30, 2024
हेही वाचा
कोल्हापूर : दिनमान वृत्तसेवा
तळाशी ( ता.राधानगरी) येथील तुकाराम गाथेचे निरूपणकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव (वय ९१) यांचे निधन झाले. संत साहित्यातील योगदानाबद्दल नुकताच त्यांना शिवाजी विद्यापीठाचा पहिला पदमश्री डॉ. डी वाय पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास करत होते. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली असून त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे ते संयोजन करत. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे कामही ते अखंडितपणे करत होते.
अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उद्या (सोमवारी) सकाळी तळाशी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Laddu Mutya Baba : हाताने चालता फॅन बंद करुन प्रसाद देणारा लड्डू मुत्या बाबा आहे तरी कोण?
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोशल मिडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. अलिकडच्या काही दिवसात पंखाबाबा उर्फ लड्डू मुत्या बाबाचे (Laddu Mutya Baba) व्हिडिओ, रील्स सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जाणून घेवूया पंखाबाबा कोण आहेत. (Fan Baba)
Laddu Mutya Baba : कोण आहे लड्डू मुत्या बाबा?
सोशल मिडियावर प्रकाशझोतात आलेले लाडू मुत्या बाबा (Laddu Mutya Baba) हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामधील आहेत. लाडू मुत्या बाबा चालू असलेला फॅन हाताने बंद करतात आणि लोकांना आशीर्वाद देतात. त्यांच्या या कृत्याने लोक त्यांचे भाविक झाले आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. चालता फॅन हाताने बंद करत असल्याने पंखाबाबा (Fan Baba) म्हणून सोशल मिडियावर लोक त्यांना ओळखू लागले आहेत. लाडू मुत्या बाबा आपल्या एका भाविकाच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी सुरु असलेला फॅन हाताने बंद केला आणि त्याची धूळ भाविकांच्या कपाळाला लावून आशीर्वाद दिला. तेव्हापासून लाडू मुत्या बाबा सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आले. त्यांचे व्हिडिओ व्हायरल होवू लागले आहेत.
सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया
लाडू मुत्या बाबा यांचे व्हिडिओ वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होवू लागले. त्यांच्या व्हिडिओ आणि रील्सच्या खाली सोशल मीडिया युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “देव तर नाहीच नाही पण त्यावर चोरांचा बाजार चालू आहे”. तर एकाने कमेंट केली आहे, “ज्यांना बाबांची लीला माहित नाही ते लोक त्यांना चुकीचे समजतात.” अनेक सोशल मिडिया युजर्सनी लड्डू मुत्या बाबा यांची नक्कल करणारे व्हिडिओ आपल्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओ आणि रील्सवर नेटकरी भन्नाट कमेंटस करत आहेत.
प्रवचनही देतात?
दरम्यानच्या काळात लाडू मुत्या बाबा यांनी यालाबुर्गा तालुक्यातील संगनहळा येथे प्रवचन दिले. यावेळी ते म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीने चांगले वागले पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे. तेव्हाच तुमचे आयुष्य सार्थकी लागेल. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येवो. त्या संकटांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जा. कधीही वाईट काम करु नका, योग्य मार्गाने जा. “
हेही वाचा
- `सिंघम` शिवदीप लांडेंची लाईफ स्टोरी
- दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- Paracetamol : पॅरासिटामॉलसह ५३ औषधे मापदंडानुसार नसल्याचा अहवाल
दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी (Jhumpa Lahiri ) अशी त्यांची नावे असून आपल्या कृतीतून त्यांनी मानवतेचा आवाज बुलंद केला आहे. (Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta)
Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta : जेसिंता केरकेट्टा : रूम टू रीड यंग ऑथर
आदिवासी कवयित्री, लेखिका आणि स्वतंत्र पत्रकार जेसिंता केरकेट्टा (Jacinta Kerketta ) यांना लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘जिरहुल’ या कवितासंग्रहासाठी यूएस एड आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्टतर्फे संयुक्तपणे ‘रूम टू रीड यंग ऑथर ऑफ २०२४’ हा पुरस्कार जाहीर झाला होता.
पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले मारली जात असताना यूएस एड आणि बोईंगशी संबंधित कोणताही पुरस्कार मी स्वीकारणार नाही, असे जेसिंता केरकेट्टा यांनी सांगितले. २०२३ मध्ये पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले आणि महिला मारल्या जात असताना, भारतातील मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी रूम टू रीड इंडिया ट्रस्टने बोईंग संस्थेसोबत सहकार्य केले होते. एकाच शस्त्राने हजारो मुले मारली जात असताना शस्त्रास्त्रांचा व्यापार आणि मुलांची चिंता एकत्र कशी चालते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जेसिंता केरकेट्टा – रूम टू रीड यंग ऑथर
जेसिंता म्हणाल्या, “भारतात बालसाहित्यासाठी फारच कमी लेखन केले जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे कोणत्याही लेखकाला प्रोत्साहन ठरू शकते. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावे लागेल की, जेव्हा मुलांसाठी चांगले जग घडवण्यात जर या लोकांचा सहभाग नसेल, तरमग या पुरस्काराचे काय करायचे? “जिरहुल” हा काव्यसंग्रह २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. आदिवासी भागातील जंगलात असलेल्या अनेक फुलांवरच्या कविता त्यात आहेत. या कविता सामाजिक-राजकीय जाणिवेच्या आहेत.
झुम्पा लाहिरी : नोगुची संग्रहालय पुरस्कार
पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून ‘केफीयेह’ (स्कार्फ) परिधान केलेल्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नोगुची संग्रहालयाकडून पुरस्कार स्वीकारण्यास भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी यांनी नकार दिला आहे. १९९९ मध्ये इंटरप्रिटर ऑफ मेलडीज या लघुकथा संग्रहासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

झुम्पा लाहिरी : नोगुची संग्रहालय पुरस्कार
जपानी-अमेरिकन डिझायनर आणि शिल्पकार इसामू नोगुची यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संग्रहालयाने, त्यांचे कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेत ‘राजकीय संदेश, घोषणा किंवा चिन्हे’ असलेले कपडे किंवा उपकरणे वापरू शकत नाहीत, असे ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. इसामू नोगुची पारितोषिकाची सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली होती. इसामू नोगुची प्रमाणेच, नाविन्यपूर्ण भावना, उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तिंना दरवर्षी पुरस्कार दिला जातो, असे संग्रहालयाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. या पुरस्काराच्या आधीच्या विजेत्यांमध्ये नॉर्मन फोस्टर, डेविड अडजाये, तोशिको मोरी आणि टाडाओ एंडो यांचा समावेश आहे. “आमच्या नवीन ड्रेस कोड धोरणाच्या निषेधार्थ झुम्पा लाहिरी यांनी २०२४ चा पुरस्कार नाकारला असल्याचे संग्रहालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
हेही वाचा
Sangali News : म्हैसाळमध्ये विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
महाराष्ट्र दिनमान, सांगली प्रतिनीधी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काळीज पिळवून टाकणारी घटना आज (दि.२९) घडली आहे. या घटनेमध्ये एकाचवेळी घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीनजण अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिशनाथ मारुती वनमोरे (वय ४० ), साईराज वनमोरे (वय १३) आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) असे मृतांची नावे आहेत. विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Sangali News)
Sangali News : वैरण आणायला जाणं ठरलं शेवटचं…
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ (ता.मिरज) पारिशनाथ वनमोरे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी थ्री फेज विजेची तार तुटून पडली होती. पारिश नाथ आणि साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत यालाही शॉक लागला. यामध्ये प्रदीप हा जागीच ठार झाले तर हेमंत गंभीर जखमी झाला आहे. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनमोरे कुटुंबासोबत गेलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून मृत पावला आहे.
हेही वाचा
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (दि.२८) भारतीय निवड समितीने १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर, वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बांगला देशविरूद्धच्या टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय निवड समितीने जाहीर केलेल्या संघात अभिषेक शर्माची सलमीवीर म्हणून निवड झाली आहे. त्याच्यासोबत संजू सॅमसनला सलामीला येण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव, रिंकू सिंगही, नितिश कुमार रेड्डी, रियान पराग यांच्या खांद्यावर आहे. (IND vs BAN T20 Series)
हार्दिक अनुभवी अष्टपैलू खेळाडू
या मालिकेत हार्दिक पंड्याकडे सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. परंतु, हार्दिकला यावेळी शिवम दुबेकडून चांगलीच स्पर्धा आहे. त्याचबरोबर संघात वॉशिंग्टन सुंदरसारख्या अष्टपैलू खेळाडूला स्थान मिळाले आहे.
मयांक यादवला संधी
मयांक यादवने आयपीएलमधील वेगवान गोलंदाजीच्या सर्वांना प्रभावित केले होते. परंतु, दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. त्याने बंगळूरच्या एनसीएमध्ये उपचार घेतले. यानंतर प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
वरुण चक्रवर्ती-जितेश शर्मा यांचे पुनरागमन
कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरुण चक्रवर्तीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. गेल्या सीझनमध्ये कोलकातासाठी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संधी मिळवली आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs BAN T20 Series )
मुख्य खेळाडूंना विश्रांती
बांगला देशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली आहे. पुढील कसोटी सामने लक्षात घेता या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इशान किशनला पुन्हा संधी मिळालेली नाही. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती; तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 प्रकारातून विश्रांती घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
हेही वाचा :