रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. विधानसभेच्या ८१ जागांपैकी भाजप ६८, झारखंड स्टुडंटस् युनियन १०, संयुक्त जनता दल २ आणि लोक जनशक्ती पक्ष एक जागा लढवणार आहे. (Jharkhand Election)
झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. झारखंड निवडणुकीत कमळ फुलण्यासाठी शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर भाजपने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजप व्यतिरिक्त, झारखंड एनडीएमध्ये ‘ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन’ (एजेएसयू), बिहार सरकारमधील संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पक्ष यांचा समावेश आहे. तर. ‘इंडिया’ आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष यांचा समावेश आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे एक कारण म्हणजे पक्षाने ‘एजेएसयू’ सोबतची युती तोडली होती; परंतु, राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत, भाजपने राज्यातील १४ पैकी ८ जागा जिंकल्या आणि ‘एजेएसयू’ ने एक जागा जिंकली तर ‘इंडिया’ आघाडीने पाच जागा जिंकल्या. तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी घटली. ‘जेएमएम’ आणि काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढली. भाजपने आपल्या मित्रपक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे, की विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या सरकारला सत्तेवरून हटवणे हे आपले उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पाचही जागांवर भाजपचा पराभव झाल्याने झारखंडमधील भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वात सक्रियता वाढली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांनी फक्त २ जागा जिंकल्या होत्या; परंतु यावेळी त्यांनी पाचही जागा जिंकल्या आहेत.
सोरेन यांच्या अटकेचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आणि विशेषतः आदिवासी पट्ट्यातील जागांवर दिसून आला. अर्जुन मुंडा (खुंटी), सीता सोरेन (दुमका), गीता कोडा (सिंगभूम) हे भाजपचे तीन प्रमुख उमेदवार पराभूत झाले. (Jharkhand Election)
भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओराव यांचा लोहरदगा मतदारसंघातून १.३९ लाख मतांनी पराभव झाला होता. निश्चितच हा पक्षाचा मोठा पराभव आहे. ज्येष्ठ आदिवासी नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सोबत घेऊन भाजपने आदिवासी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. झारखंडमधील सरकारची चावी एससी-एसटी मतदारांकडे आहे. झारखंडमध्ये २८ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. ९ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. अशा परिस्थितीत जवळपास निम्म्या जागांवर एससी आणि एसटीचे मतदार कोणत्याही पक्षाचे सरकार बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. झारखंडमध्ये एसटी समुदायाची लोकसंख्या २६ टक्के, एससी समुदायाची लोकसंख्या सुमारे १२ टक्के आहे.
भाजप घुसखोरीला मुद्दा बनवणार
भाजप ‘घुसखोरी’ आणि ‘डेमोग्राफिक चेंज’चे मुद्दे बनवत आहे. आदिवासी भागातील कथित घुसखोरी आणि लोकसंख्येतील बदल हा भाजपने विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला आहे. झारखंडमध्ये आलेले घुसखोर नोकऱ्या आणि जमीन हडपण्यासाठी आदिवासी महिलांशी लग्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आदिवासींना आपल्या बाजूने आणण्यासाठी भाजप संथाल परगणा या आदिवासी बहुल भागात मुस्लिम घुसखोरीमुळे त्यांचा जीव धोक्यात असल्याचा प्रचार करत आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती
- दर नियंत्रणासाठी राखीव साठ्यातील कांदा बाजारात
- हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक