बेळगाव : एकतीस आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५१ अग्निवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा पार पडला. बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडलेल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांनी तिरंगा ध्वज, रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने शपथ घेतली. अग्निविरांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. अग्नीवीर अतुल लहाने आणि मेजर संदीप कुमार यांनी परेडचे नेतृत्व केले. यावेळी मिलिटरी बँडने देशभक्तीपर धून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
प्रशिक्षण कालावधीत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहिल शिंदे याला उत्कृष्ट आग्निवीर पुरस्कार ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दीक्षांत समारंभ झाल्यावर युद्ध स्मारक येथे युध्दात शहीद झालेल्या शहिदांना मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. दीक्षांत समारंभाला वायू दलाचे अधिकारी, निवृत्त अधिकारी आणि अग्निवीर कुटुंबीय उपस्थित होते.