बँकॉक : किदाम्बी श्रीकांत, रक्षिता रामराज या भारतीय बॅडमिंटनपटूंनी थायलंड मास्टर्स स्पर्धेमध्ये अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या शंकर सुब्रमण्यमने गुरुवारी पुरुष एकेरीत तृतीय मानांकित इंडोनेशियाच्या चिको वॉरदोयोला पराभवाचा धक्का दिला. (Badminton)
श्रीकांतने दुसऱ्या फेरीमध्ये हाँगकाँगच्या जेसन गुनावानला २१-१९, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पुढील फेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या सहाव्या मानांकित झेंग शिंग वँगशी होईल. शंकरने तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत वॉरदोयोला एका गेमची पिछाडी भरून काढत ९-२१, २१-१०, २१-१७ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत शंकरची लढत शुआन चेन झू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीमध्ये पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय-साई प्रतीक या भारताच्या आठव्या मानांकित जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत त्यांनी थायलंडच्या विचायापाँग कंजानाकिरीवाँग-नुरुसेत लाओथेर्डपाँग या जोडीचा १४-२१, २१-१०, २१-९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना द्वितीय मानांकित इंडोनेशियाच्या महंमद सोहिबुल फिक्री-डॅनिएल मार्टिन या जोडीशी होईल. (Badminton)
महिला एकेरीमध्ये दुसऱ्या फेरीत रक्षिता रामराजने चायनीज तैपेईच्या क्लोऊ-ताँग तुंग हिच्यावर २१-१५, २१-१२ अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत थायलंडच्या थामोनवान निथितिक्राई हिच्याशी होईल. मिश्र दुहेरीमध्ये मात्र, रोहन कपूर-ऋत्विका शिवानी गड्डे या भारतीय जोडीस दुसऱ्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला. थायलंडच्या राचापॉल माक्कासासिथॉर्न-नात्तामॉन लाइसुआन या जोडीने रोहन-ऋत्विका जोडीला २१-१९, २१-१५ असे पराभूत केले. (Badminton)