कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेदरम्यान भारताच्या फलंदाजी क्रमामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, असे सूतोवाच संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलने केले. पाच सामन्यांच्या या मालिकेस २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. (Axar Patel)
मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर रंगेल. या सामन्यापूर्वी अक्षरने संघाविषयीच्या विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय संघामध्ये सलामी फलंदाज वगळता अन्य कोणाचाच फलंदाजी क्रम निश्चित नाही. आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि हे माझ्यासह सर्व फलंदाजांना लागू आहे, असे अक्षर म्हणाला. २०२४ च्या सुरुवातीपासूनच आम्ही ३ ते ७ क्रमांकांच्या फलंदाजांमध्ये वैविध्य राखले आहे. परिस्थितीची गरज, खेळाडू आदी गोष्टी विचारात घेऊन हा क्रम सामन्यागणिक बदलला जाऊ शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये परिस्थितीनुरूप योग्य फलंदाजाचा खुबीने वापर करून घेणे महत्त्वाचे असते, असेही अक्षरने सांगितले. (Axar Patel)
या मालिकेसाठी प्रथमच अक्षरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. माझ्यासाठी ही जबाबदारी नवीन आहे. परंतु, त्यामुळे माझा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा बदललेला नाही. भारताच्या टी-२० संघाची घडी व्यवस्थित बसली आहे. त्यामुळे, या जबाबदारीमुळे माझ्यावर ताण आलेला नाही, असेही अक्षरने नमूद केले. तुम्ही नेतृत्वपदावर असता, तेव्हा तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्ही संघाच्या बैठकीत याविषयीही चर्चा केली. तुमचे मत प्रामाणिक असणे आणि परस्परांवर विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे, असेही अक्षर म्हणाला. (Axar Patel)
भारताच्या कसोटी संघाला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पराभव पत्करावा लागला असला, तरी त्याचे दडपण टी-२० संघावर नसल्याचा निर्वाळाही अक्षरने केला. वेगवान गोलंदाज महंमद शमी टी-२० संघात परतणे ही सकारात्मक बाब असल्याचेही अक्षरने सांगितले. शमीने पुनरागमनानंतर सईद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासारखा वरिष्ठ खेळाडू जेव्हा संघात येतो, तेव्हा संघाचे बळ वाढते. सुरुवातीच्या षटकांत नव्या चेंडूवर, तसेच अखेरच्या षटकात त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल, असेही अक्षर म्हणाला. (Axar Patel)
Here’s wishing #TeamIndia All-rounder and ICC Men’s T20 World Cup 2024 winner – Axar Patel – a very Happy Birthday
@akshar2026 pic.twitter.com/d668RYd16F
— BCCI (@BCCI) January 20, 2025
हेही वाचा :
फिरकीपटूंनी साकारला पाकचा विजय