कोल्हापूर; प्रतिनिधी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी एक कोटी रुपये सामाजिक कामासाठी देण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. पैकी १० लाख रुपये गडहिंग्लज येथील नेत्रदान चळवळीतील अवधूत पाटील यांना जाहीर केल्याची माहिती डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीतर्फे देण्यात आली. समितीच्यावतीने ‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर सोमवारी (दि. ७) रोजी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. तर समाजाविषयी तळमळ असलेल्या आणि तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या संस्थांना अशा प्रकारचा निधी दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Kolhapur News)
प्रा. द्वादशीवार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रमोद मुनघाटे प्रमुख पाहुणे आहेत.
समितीतर्फे तीन महिन्यातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. येत्या २८ डिसेंबरला निवडक आणि इच्छुक शिक्षकांची शिक्षक परिषद न्यू कॉलेजच्या सभागृहात होत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, सदानंद कदम, डॉ. रमेश पानसे यांना आमंत्रित केले जाणार आहे. सकाळच्या सत्रात नामवंत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम दहा शाळांत राबविला जाणार आहे. पत्रकार परिषदेला प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव संजय कळके, प्रा. सी. एम. गायकवाड, भाग्यश्री कासोटे-पाटील आदी उपस्थित होते. (Kolhapur News)