Home » Blog » Boxing Day Test : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया तीनशे पार

Boxing Day Test : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया तीनशे पार

ऑस्ट्रेलिया ६ बाद ३११

by प्रतिनिधी
0 comments
Boxing Day Test

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ फलंदाज गमावून ३११ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत भारताच्या जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. (Boxing Day Test)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना बॉक्सिंग-डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात एक तर ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला आणि नॅथन मॅकस्विनीच्या जागी सॅम कॉन्स्टस , भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसने उस्मान ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले. त्याने आक्रमक फलंदाजी करत ५९ चेंडूंत आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकवले. परंतु सामन्याच्या २० व्या ओव्हरमध्ये भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने त्याला एलबीडब्ल्यू केले. कॉन्स्टसने आपल्या खेळीत ६५ चेंडूंत २ षटकार आणि ६ चौकाराच्या सहाय्याने ६० धावांची खेळी केली.

यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या उस्मान ख्वाजासोबत लाबुशेनने ६५ धावांची भागीदारी रचली. यावेळी ख्वाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २७ वे अर्धशतक झळकवले. सामन्याच्या ४५ व्या षटकात बुमराहने ख्वाजाच्या रूपात ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला. ख्वाजाने आपल्या खेळीत १२१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. यानंतर स्टीव स्मिथने लाबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागिदारी केली. सामन्याच्या ६६ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने विराट कोहलीकरवी लाबुशेनला  झेलबाद केले. लाबुशेनने  १४५ चेंडूंत ७ चौकाराच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या हेडला बुमराहने आल्यापावली तंबूत पाठवले. त्याला धावांचा भोपळा ही फोडता आला नाही. त्यानंतर बुमराहने मिचेल मार्शला चार धावांवर बाद केले.

एका बाजूने विकेट पडत असताना स्मिथने शानदार फलंदाजी केली. त्याने १११ चेंडूंत ६८ धावांच्या नाबाद खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला आहे. तर, कर्णधार पॅट कमिन्स ११ धावांवर खेळत आहे. भारताकडून गोलंदाजीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, आकाश दीप, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00