अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवरून धावणा-या वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून सात महिन्यांत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई आणि नवी मुंबई प्रवास अति वेगवान करण्यासाठी शिवडी – न्हावाशेवा दरम्यान २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सागरी सेतू जानेवारीमध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. मुंबई – नवी मुंबई अंतर त्यामुळे बारा ते पंधरा मिनिटांत पार करणे शक्य झाले. पथकर अधिक असल्याने प्रारंभीच्या काळात अटल सेतूला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नंतर त्यात सुधारणा होत गेली.
उपलब्ध आकडेवारीनुसार १३ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०२४ या काळात अटल सेतूवरून ५० लाख ४ हजार ३५० वाहनांनी प्रवास केला. अटल सेतूवरून दिवसाला ७० हजार वाहने धावतील अशी अपेक्षा प्रारंभी एमएमआरडीला होती. प्रत्यक्षात मात्र दररोज सुमारे २५ हजार वाहने अटल सेतूवरून प्रवास करताहेत. अटल सेतूवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत नजिकच्या काळात वाढ होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीए कडून व्यक्त केली जात आहे.