मुंबई : प्रतिनिधी : राज्यात कोणाचे सरकार येणार? हे उद्या (ता.२३) समजणार आहे. त्यामुळेच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान, एकीकडे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली असताना दुसरीकडे राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे हे आपापल्या पक्षातील नेतेमंडळींशी संवाद साधत आहेत. एकूणच सत्तेसाठी जोर-बैठका सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी दिवसभर दिसत होते.
याबाबत शिंदे उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झाले, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणीवेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत महाविकास आघाडी १५७ जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, की महायुतीची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. शनिवारी निकाल लागण्यापूर्वी शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलान बैठक पार पडली. बैठकीत मतमोजणीविषयी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मिळाली. सोबतच महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार याबाबत उमेदवारांना सांगितल्याची माहिती आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीचे ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले असून, महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही बहुमताचा १४५ हा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने हमखास निवडून येणाऱ्या आपल्या बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या पदरात १०१ जागा पडल्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. यात रामटेक मतदारसंघातील बंडखोर राजेंद्र मुळक आणि सोलापूरचे धर्मराव काडादी हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधला आहे. आबा बागूल, सुरेश जेथलिया, मनीष आनंद, कल्याण बोराडे, जयश्री पाटील, अविनाश लाड या अपक्ष निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. राहुल मते या बंडखोरांना सहा वर्षांसाठी काँग्रेसने निलंबित केले आहे, तरीही त्यांच्याशी संपर्क झाला आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या बंडखोरांशी महायुतीचे नेतेही संपर्क साधत आहेत. इतरही बंडखोरांना काँग्रेस नेत्यांचे फोन गेले आहेत. रामटेक ही जागा महविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. तेथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसची पूर्ण संघटना त्यांचा प्रचार करत होती. ते निवडून येतील, असे काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.
बंडखोरांशी संपर्क साधण्याची जबाबदारी
भाजप महायुतीची बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपने जबाबदारी वाटून दिली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नीतेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला. बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि चित्रा वाघ उपस्थित होत्या. प्रत्येक नेत्याला एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव आणि पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटेचा हे नेतेदेखील उपस्थित होते. उद्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्रिपदाचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते, पदाधिकारी आणि उमेदवार सागर बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दिसून आले.
काडादींवरून काँग्रेसमध्ये गोंधळ
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे सांगितले; मात्र त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला. वास्तवात ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आमचा पाठिंबा अपक्ष उमेदवार काडादी यांना असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळ आहे.