अम्मान : आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ग्रीको-रोमन प्रकारात भारताने दोन ब्राँझपदकांची कमाई केली. गुरुवारी भारताच्या नितेशने या प्रकारातील ९७ किलो वजनी गटात ब्राँझपदकावर नाव कोरले. तत्पूर्वी, भारताच्या सुनील कुमारनेही ८७ किलो गटात ब्राँझपदक जिंकले होते. (Asian Wrestling)
जॉर्डनमधील अम्मान येथे ही स्पर्धा सुरू आहे. २२ वर्षीय नितेशने ब्राँझपदकाच्या लढतीत तुर्कमेनिस्तानच्या आगामामोदोव्ह याच्यावर ९-० अशी एकतर्फी मात केली. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात नितेशने कझाखस्तानच्या इलियास गुचिगोव्हला ९-० असे पराभूत केले. उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणच्या मोहम्मदादी अब्दोल्ला सारावीकडून ०-९ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे नितेशला ब्राँझपदकाची लढत खेळावी लागली. या लढतीत मात्र त्याने प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. (Asian Wrestling)
तत्पूर्वी, भारताच्या सुनील कुमारने ग्रीको-रोमनच्या ८७ किलो गटामध्ये चीनच्या जिआशिन हुआंगला ५-१ असे नमवून ब्राँझपदक निश्चित केले होते. ग्रीको-रोमनच्या अन्य वजनी गटांमध्ये मात्र, भारतीय कुस्तीपटूंना विशेष यश मिळाले नाही. ५५ किलो गटात भारताच्या नितीनला पात्रता फेरीमध्ये उत्तर कोरियाच्या यू चोई रोविरुद्ध ०-९ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. ७७ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताचा सागर थाक्रान पराभूत झाला. भारतीय कुस्ती संघटनेचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष संजय सिंह यांनी या स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारातील भारतीय कुस्तीपटूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. (Asian Wrestling)
या स्पर्धेच्या फ्रीस्टाइल महिला गटातील सामने गुरुवारपासून सुरू झाले. या गटात भारताच्या नेहा, मुस्कान, मोनिका, मानसी लाथर, ज्योती बेरवाल आणि रितिका या कुस्तीपटू विविध गटामध्ये सहभागी होणार आहेत.
हेही वाचा :
अर्जेंटिनाची ब्राझीलवर मात