ब्युनॉस आयरिस : गतविश्वविजेत्या अर्जेंटिना संघाने फिफा वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील घोडदौड कायम राखत ब्राझीलवर ४-१ अशा गोलफरकाने मात केली. या विजयानंतर गुणतक्त्यात अग्रस्थानी असणारा अर्जेंटिनाचा संघ ३१ गुणांसह पुढील वर्षी होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. (Argentina Win)
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अर्जेंटिनाने ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटास ज्युलियन अल्वारेझने गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर, १२ व्या मिनिटास एन्झो फर्नांडेझने अर्जेंटिनाचा दुसरा गोल करून संघाची आघाडी २-० अशी वाढवली. २६ व्या मिनिटास ब्राझीलकडून मॅथियस कुन्हाने गोल केला. ब्राझीलचा हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. ३७ व्या मिनिटास ॲलेक्सिस मॅकऑलिस्टरने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने मध्यंतरापर्यंतच ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. (Argentina Win)
उत्तरार्धातही अर्जेंटिनाशी बरोबरी करणे ब्राझीलकरीता आवाक्याबाहेरचे ठरले. मात्र, त्यांनी बचावात्मक खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अर्जेंटिनाला उत्तरार्धात केवळ एक गोल करता आला. सामन्याच्या ७१ व्या मिनिटास ज्युलिआनो सिमिओनने अर्जेंटिनाचा चौथा गोल केला. ही आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत अर्जेंटिनाने ४-१ असा विजय निश्चित केला. अर्जेंटिनाचा हा पात्रता फेरीमधील १४ सामन्यांमधील दहावा विजय आहे. अर्जेंटिनाचे पात्रता फेरीतील चार सामने शिल्लक असतानाच त्यांचे पुढील वर्षीच्या वर्ल्ड कपमधील स्थान निश्चित झाले आहे. दक्षिण अमेरिका गटातून आघाडीच्या सहा संघांना थेट वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळणार असून सातवा संघ प्ले-ऑफमध्ये खेळेल. अर्जेंटिनाने उर्वरित चारही सामने गमावले, तरी त्यांची सहाव्या स्थानापर्यंतच घसरण होऊ शकत असल्याने त्यांचा वर्ल्ड कपप्रवेश निश्चित आहे. (Argentina Win) दरम्यान, दक्षिण अमेरिका गटामध्ये बुधवारी झालेल्या अन्य सामन्यात व्हेनेझुएलाने पेरू संघाचा १-० असा पराभव केला. बोलिव्हिया-उरुग्वे, चिली-इक्वेडोर हे दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत राहिले, तर कोलंबिया-पेराग्वे सामना २-२ अशा बरोबरीत संपला.
हेही वाचा :
अखेरच्या सामन्यातही न्यूझीलंडची बाजी