माँटेव्हिडिओ : थिएगो अल्माडाच्या एकमेव गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात उरुग्वेचा १-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ दक्षिण अमेरिकेच्या गटातील गुणतक्त्यात अग्रस्थानी पोहोचला असून वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आहे. (Argentina)
अर्जेंटिना व उरुग्वे यांच्यामध्ये ब्युनॉस आयर्स येथे रंगलेल्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात उरुग्वेने २-० असा विजय मिळवला होता. या पराभवाचा वचपा अर्जेंटिनाने शनिवारी काढला. या सामन्यात अर्जेंटिनाचा संघ प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीविना उतरला होता. मात्र, त्याचा परिणाम अर्जेंटिनाने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धामध्ये, अल्माडाने गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर, उरुग्वे संघाने बरोबरीचा गोल करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही. स्टॉपेज टाइममध्ये अर्जेंटिनाच्या निकोलास गोंझालेसला रेड कार्डही देण्यात आले. परंतु, उर्वरित वेळ दहा खेळाडूंसह खेळूनही अर्जेंटिनाने १-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. (Argentina)
दक्षिण अमेरिका गटामध्ये अर्जेंटिनाचा हा १३ सामन्यांतील नववा विजय ठरला. गुणतक्त्यात अर्जेंटिनाचा संघ २८ गुणांसह अव्वलस्थानी आहे. पात्रता फेरीमधील अर्जेंटिनाचे अद्याप पाच सामने शिल्लक आहेत. हे पाचही सामने गमावले, तरी अर्जेंटिना सातव्या स्थानावर फेकला जाईल. या गटातून आघाडीच्या सहा संघांना २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार असून सातव्या क्रमांकावरील संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरेल. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ वर्ल्ड कप पात्रतेच्या उंबरठ्यावर असून उर्वरित सामन्यांपैकी एखादी बरोबरीही अर्जेंटिनाला पात्रतेसाठी पुरेशी आहे. (Argentina) दरम्यान, या गटातील पात्रता फेरीच्या अन्य सामन्यात शनिवारी इक्वेडोरने व्हेनेझुएलावर २-१ अशी मात केली. या विजयानंतर इक्वेडोरचा संघ ब्राझीलला मागे टाकत २२ गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ब्राझील २१ गुणांसह तिसऱ्या, तर उरुग्वे २० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. (Argentina)
हेही वाचा :
आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम
तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व