Home » Blog » Anna Bansode : अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी

Anna Bansode : अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी

१३ कोटी जनतेसाठी अभिमानास्पद निवड : मुख्यमंत्री

by प्रतिनिधी
0 comments
Anna Bansode

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेचे २२ वे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ त्यांचाच अर्ज दाखल असल्याने बुधवारी (२६ मार्च) त्यांच्या नियुक्तीची सभागृहात घोषणा करण्यात आली.( Anna Bansode)

त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’ मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला गौरवशाली परंपरा आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, ही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्चपदावर पोहोचू शकतो.'( Anna Bansode)

ते म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाची ही परंपरा पुढे नेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्षपद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे. अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संवैधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ( Anna Bansode)

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ एक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा अण्णा बनसोडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असून त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल. उपाध्यक्षपदावरून ते सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ( Anna Bansode) उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,’ अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याबरोबरच सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या  बनसोडे  प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, ही जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :
जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी
उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00