Home » Blog » animals mourn : मृत पिलासोबत १७ दिवस शोक…

animals mourn : मृत पिलासोबत १७ दिवस शोक…

प्राण्यांचे भावविश्वही माणसासारखेच

by प्रतिनिधी
0 comments
animals mourn

वॉशिंग्टन : जवळचे आप्त, नातेवाईक गेल्यानंतर माणूस बराच काळ धक्क्यातून सावरत नाही. शोकमग्न अवस्थेत तो बरेच दिवस असतो. त्याच्या आठवणींनी नेहमी दु:खीकष्टी होतो. त्याच्याशी असलेले भावबंध त्याला सतत आठवत राहतात. मात्र केवळ माणूसच नाही; तर प्राणीही शोक व्यक्त करतात, त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होतात, असे सिद्ध झाले आहे. अनेक प्राण्यांची भावावस्था माणसासारखेच असते, असे दिसून आले आहे. (animals mourn)

अलीकडेच वॉशिंग्टनजवळच्या एका किनारपट्टीवर एक मादी किलर व्हेल तिच्या मृत पिलाचा मृतदेह ढकलत असताना दिसली. ओर्का, ज्याला तहलेक्वा म्हणून ओळखले जाते, तिचेही वर्तन असेच होते. तिच्या पिलाचाही मृत्यू झाला. मात्र ते पिलू ती जवळपास १७ दिवस ढकलत किनाऱ्यावर आणत होती, ते बुडू देत नव्हती. त्याच्यासोबत होती.

पिलाच्या मृतदेहांवर शोक व्यक्त करणारी केवळ व्हेल हीच एकमेव प्रजाती नाही. इतर अनेक प्राण्यांचे वर्तनही अनेकदा असेच दिसून आले आहे. २०२१ ची घटना. एडिनबर्ग प्राणीसंग्रहालयात लियान या मादी चिंपांझीचे पिलू जन्मत:च मृत झाले. मात्र ती त्या पिलाला बरेच दिवस पोटाशी धरून बसली होती. प्राणिसंग्रहालयात ती कुणालाही जवळ येऊ देत नव्हती. डॉल्फिन आणि माकडे अशा इतर प्राण्यांचे वर्तनही असेच दिसून आले.(animals mourn)

‘जवळचा नातेवाईक गमावला तर माणूस दु:खातिरेकाने व्याकूळ होतो. अगदी तसेच या प्राण्यांचे वर्तनही असते. म्हणून ते आपल्या मृत पिलासोबत असतात,’ असे मत कार्डिफ विद्यापीठातील संशोधक बेकी मिलर व्यक्त करतात. प्रिय व्यक्तीशी असलेले बंध टिकवून ठेवण्याचे ते सहज प्रकटीकरण असते, असे ते सांगतात. प्राणी अनेकदा त्यांच्या साथीदारांच्या मृत्यूनंतर त्यांचा शोध घेतात. माणूसही आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी बराच काळ काढत असतो, याकडे मिलर लक्ष वेधतात. प्राण्यांच्या बाबतीत अशी अनेक निरीक्षणे प्रसिद्ध आहेत. (animals mourn)

१४ वर्षे मालकाच्या कबरीजवळ

जपानमधील ग्रेफिअसे बॉबी हा कुत्रा हे त्याचे प्रसिद्ध उदाहरण. एडिनबर्ग, स्कॉटलंड येथील हा कुत्रा. मालकाच्या मृत्यूनंतर तो तब्बल १४ वर्षे त्याच्या कबरीजवळ जाऊन बसत असे. आणखी एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतर जपानच्या रेल्वेस्टेशनवर बरीच वर्षे वाट पाहत असे. जवळचा साथीदार गमावल्यानंतर प्राण्यांनाही अतीव दु:ख होते. पिलाला व्हेलने खाल्ल्याचे पाहून मादी समुद्री सिंह मोठ्याने रडतात. अशी इतरही अनेक उदाहरणे आहेत. मानववंशशास्त्रज्ञ बार्बरा किंग यांनी त्यांच्या ‘हाऊ ॲनिमल्स ग्रीव्ह’ या पुस्तकात मांजरी, कुत्रे आणि ससे त्यांच्या साथीदाराच्या शोधात रडतात, असे निरीक्षण नोंदवले आहे. कळपातील घोडा पुरलेल्या ठिकाणी इतर घोडे बराच वेळ येऊन थांबल्याचे वर्णनही त्यांनी केले आहे.

हत्तीणीचे अश्रू…

१९९९ मध्ये भारतातील एका प्राणीसंग्रहालयातही अशीच घटना घडली. दामिनी या हत्तीणीसोबतची हत्तीण व्यायली. त्यावेळी तिचा मृत्यू झाला. दामिनी दु:खातिरेकाने रोज तिच्या मृत शरीराजवळ येऊन अश्रू ढाळत असे. काही दिवसांनी तिने अन्न-पाणीही सोडले. त्यातच तिचा मृत्यू झाला. प्राण्यांचे भावविश्व असे आहे.

(सौजन्य : बीबीसी)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00