मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात येत असतानाच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रामुळे राजकीय आरोप -प्रत्यारोपाची नवीन फोडणी पहावयास मिळणार आहे. लवकरच प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. (Anil Deshmukh)
देशमुख यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पुस्तकातील वीस प्रकरणांपकी एका प्रकरणाचे नाव ‘ईडी – वरून प्रेशर आहे,’ असे आहे. त्यात २०२१ सालच्या दिवाळीदिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.
या पुस्तकातून त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटनांचा उलगडा होऊ शकतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणे, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याकडून झालेल्या हप्ता वसुलीचे आरोपाचा समावेश आहे. देशमुख यांच्या या पुस्तकाची त्यामुळेच उत्सुकता आहे.
हेही वाचा :
- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ पात्र
- के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!
- शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर