इंडियन वेल्स : रशियाची १७ वर्षीय टेनिसपटू मिरा अँड्रिव्हाने शनिवारी इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अँड्रिव्हाने गतविजेत्या इगा स्वियातेकला ७-६(७-१), १-६, ६-३ अशी धूळ चारली. अंतिम फेरीत तिचा सामना अग्रमानांकित आर्यना सबालेंकाशी होईल. (Andreeva)
जागतिक क्रमवारीत स्वियातेक दुसऱ्या, तर अँड्रिव्हा नवव्या स्थानी आहे. स्वियातेकने २०२२ आणि २०२४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. सहाजिकच उपांत्य फेरीत अँड्रिव्हाविरुद्ध तिचे पारडे जड समजले जात होते. प्रत्यक्ष सामन्यात मात्र, अँड्रिव्हाने स्वियातेकच्या तोडीस तोड खेळ केला. पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकरमध्ये अँड्रिव्हाने ७-१ अशी बाजी मारत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये स्वियातेकने जोरदार पुनरागमन करत हा सेट ६-१ असा जिंकला आणि सामन्यात बरोबरी साधली. (Andreeva)
तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा अँड्रिव्हा सरस ठरली. या सेटमध्ये आपल्या खेळावर नाराज असलेली स्वियातेक रागावर ताबाही ठेवू शकली नाही. प्रथम, बॉलकिडने तिला दिलेला चेंडू तिने रागाच्या भरात पुन्हा त्याच्या दिशेने फटकावला. हा चेंडू बॉलकिडला लागताना थोडक्यात बचावला. त्यानंतर, अँड्रिव्हाच्या सर्व्हिसदरम्यान एक बॉलकिड हालचाल करत असल्यामुळे स्वियातेकने त्याबाबत पंचांशीही हुज्जत घातली. हा सेट ६-३ असा जिंकून अँड्रिव्हाने सव्वादोन तासांहून अधिक वेळ रंगलेल्या सामन्यात विजय निश्चित केला.(Andreeva)
दरम्यान, दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या बेलारुसच्या सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपनविजेत्या अमेरिकेच्या मॅडिसन कीजला ६-०, ६-१ असे सहज पराभूत केले. सबालेंकाने अवघ्या ५१ मिनिटांत हा विजय नोंदवून ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. (Andreeva)
हेही वाचा :
नेमारचे पुनरागमन लांबणीवर