नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष अल्पसंख्याक समाजाला दहा टक्के जागा देणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या खेळपट्टीवर भाजप-शिवसेना थेट खेळत आहेत, तर पवार महायुतीपासून वेगळ्या वाटेवर निघाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सध्या भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणातील सर्वात मोठा चेहरा योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’’ असा नारा दिला होता. मोदी यांनीही दुसऱ्या शब्दांत ही घोषणा स्वीकारली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते भाजपच्या संपूर्ण फळीपर्यंत, अगदी शिवसेना शिंदे गटही मुख्यमंत्री योगींच्या या घोषणेचे उघड समर्थन करत आहे; मात्र, अजित पवार यांनी त्याला विरोध केला. योगींच्या या घोषणेबद्दल पवार म्हणाले की, ते राज्यातील जातीय सलोख्यासाठी कटिबद्ध आहेत. पवार या घोषणेपासून उघडपणे दुरावल्याने महायुतीत फूट पडण्याच्या अटकळींना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या वक्तव्याचा निषेध करत अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवण सर्वसमावेशक होती आणि त्यांनी सर्व समाज आणि वर्गांना एकत्र केले. इतर राज्यातील लोक अनेकदा महाराष्ट्रात येऊन आपले विचार मांडतात; पण अशा कमेंट्स इथल्या लोकांना आवडत नाहीत आणि अस्वीकारार्ह आहेत.
मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याने त्यांना सत्ताधारी आघाडीकडे आकर्षित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासावर केंद्रित पक्ष म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. आपल्या मित्रपक्षांनी तसेच विविध उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केलेल्या कथित जातीयवादी टिप्पण्या वारंवार नाकारल्या आहेत. मोदी यांच्यासह भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांवर सभा घेणार नाहीत. योगी, शाह आणि मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघात सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पवार म्हणाले, की मोदी यांना बारामतीत सभा घेण्याची विनंती केली नाही. कारण तिथली लढाई ‘कुटुंबातली’ आहे. या मतदारसंघात पुतणे युगेंद्र पवार अजितदादांच्या विरोधात रिंगणात आहेत.