नवी दिल्ली : तुमची कार्यपद्धती पाहता आणखी २५ वर्षांत तुम्ही खटला पूर्णकरू शकणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) वर ताशेरे ओढले. (AgustaWestland)
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१८ फेब्रुवारी) ब्रिटिश शस्त्रास्त्र सल्लागार ख्रिश्चन जेम्स मिशेलला जामीन मंजूर केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने मिशेलचा जामीन २५ सप्टेंबर २०२४ रोजी नाकारला होता. या आदेशाविरुद्ध मिशेलच्यावतीने विशेष रजा याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना मिशेल यांना जामीन मंजूर केला. तो करताना पासपोर्टचे नूतनीकरण करून तो जमा करावा, ही अट घातली. (AgustaWestland)
प्रकरणाची सुनावणी सकाळीच करण्यात आली. मात्र, सीबीआयच्या वकिलांनी थोडा वेळ मागितला. न्यायालयाने जामीन देण्याची इच्छा व्यक्त केल्यावर वकिलांनी सांगितले की, ही याचिका केवळ वैद्यकीय कारणास्तव जामीन मागण्याच्या संदर्भात दाखल करण्यात आली आहे.
न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी दुपारनंतर ठेवली. या प्रकरणाची दखल घेतली असता न्यायालयाने खटल्याच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
न्यायमूर्ती नाथ यांनी प्रतिवादीच्या वकिलांना विचारले की, ‘तुम्ही तपास पूर्ण केला आहे, आरोपपत्र दाखल केले आहे. असे असताना सहा वर्षानंतरही तुम्हाला कोठडी कशासाठी हवी आहे आहे?”
त्यावर सीबीआयचे वकील, ज्येष्ठ विधिज्ज्ञ नचिकेता जोशी यांनी, ‘‘या व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्यात आले आणि म्हणून त्यांना भारतात आणण्यात आले,’’ असे सांगितले. (AgustaWestland)
‘‘या खटल्याचे काय? तुम्ही खटला सुरूही करत नाही,’’ अशी विचारणा न्यायमूर्ती नाथ यांनी केली.
न्यायमूर्ती मेहता म्हणाले, ‘‘अभियोक्ता म्हणून तुमचे कर्तव्य आहे. एवढी सहा वर्षे तुम्हाला कोणी थांबवले होते?’’
मिशेलची बाजू मांडणारे वकील अल्जो के. जोसेफ यांनी सांगितले की तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. पुढील तपासासाठी त्यांनी वेळ मागितला. ते अजूनही वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या कागदपत्रांवर अवलंबून आहेत आणि ते माझ्यावर जबाबदारी टाकत आहेत, म्हणजेच माझ्यामुळेच तपास पूर्ण झाली नाही, असे सांगताहेत
सीबीआयच्या वकिलांनी हे प्रकरण शुक्रवारी सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली. तथापि, न्यायालयाने आपण मिशेलला जामीन दिलेला आहे. सीबीआय पुढील तपास सुरू ठेवू शकते, असे स्पष्ट केले. (AgustaWestland)
तुम्ही सध्या ज्या पद्धतीने काम करत आहात ते लक्षात घेता आणखी २५ वर्षांत तुम्ही खटला पूर्ण करू शकणार नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती मेहता यांनी केली.