हिंगोली : कुटुंबकल्याण विभागाने ४३ महिलांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरेसे बेड नसल्याने महिलांना थंडीत झोपवण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे. (hingoli health news)
आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालयात शुक्रवारी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४३ महिलांवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून महिलांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे महिलांना नाईलाजास्तव फरशीवर झोपावे लागले.(hingoli health news)
शस्त्रक्रियेनंतर महिलांना दाटीवाटीने जमिनीवर झोपावे लागल्याने महिलांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने आरोग्यखात्याला कुणीही वाली नसल्याची टीका होऊ लागली आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांच्या बोगस औषधांचा घोटाळा झाला असताना ग्रामीण रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध करुन देता आले नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. हिंगोलीत आरोग्यप्रशासनाचा हा गलथान कारभार उधड झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे, तुम्ही कितीही पैसे खा मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा. जर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही आपापसात बसून चर्चा करत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही, त्यामुळे अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ.’
हेही वाचा: