Home » Blog » Afghanistan : चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानची बाजी

Afghanistan : चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानची बाजी

आठ धावांनी विजय; इंग्लंडचे आव्हान संपुष्टात

by प्रतिनिधी
0 comments
Afghanistan

लाहोर : अखेरच्या षटकापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानने बुधवारी इंग्लंडचा ८ धावांनी पराभव केला. इब्राहिम झादरानच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३२६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ४९.५ षटकांत ३१७ धावांत आटोपला. या विजयामुळे अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या असल्या, तरी इंग्लंडचे आव्हान मात्र साखळीतच संपुष्टात आले आहे. (Afghanistan)
गदाफी स्टेडियमवर हा सामना रंगला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीच्या सात षटकांमध्येच फिल सॉल्ट आणि जेमी स्मिथ हे दोन फलंदाज गमावले. त्यानंतर, मागच्या सामन्यातील शतकवीर बेन डकेट आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. डकेट ३८ धावा करून बाद झाला. पाचव्या क्रमांकावरील ब्रुकला २५ धावांवर महंमद नबीने बाद केले. रूटने कर्णधार जोस बटलरला साथीला घेत संघाचे द्विशतक धावफलकावर लावले. बटलरही ३८ धावा करून परतला. लियाम लिव्हिंगस्टनही केवळ १० धावा करू शकला. (Afghanistan)
त्यानंतर, रूटने आठव्या स्थानावरील जेमी ओव्हर्टनसह अर्धशतकी भागीदारी रचली. जो रूटने एकाकी लढत देत वन-डे कारकिर्दीतील १७ वे शतक झळकावताना १११ चेंडूंमध्ये ११ चौकार व एका षटकारासह १२० धावांची खेळी केली. रूटने २०१९ नंतर तब्बल सहा वर्षांनी वन-डे शतक साजरे केले. ४६ व्या षटकात ओमरझाईने रूटला बाद केले. त्यानेच ४८ व्या षटकात ओव्हर्टनलाही ३२ धावांवर बाद केले. अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ओमरझाईने आदिल रशीदला बाद करून इंग्लंडचा डाव संपवला आणि अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओमरझाईने ५८ धावांत ५ विकेट घेतल्या.(Afghanistan)
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या ९ षटकांमध्येच अफगाणिस्तानचे ३ फलंदाज माघारी परतल्याने त्यांची स्थिती ३ बाद ३७ अशी होती. सलामीवीर इब्राहिम झादरान आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून अफगाणिस्तानच्या डावास आकार दिला. शाहिदी ४० धावांवर बाद झाल्यानंतर झादरानने अझमतुल्ला ओमरझाईसोबत ६२ धावा जोडून संघाचे द्विशतक पूर्ण केले. ओमरझाईने ३१ चेंडूंमध्ये १ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यानंतर झादरान आणि महंमद नबी यांनी सहाव्या विकेटसाठी अवघ्या ५५ चेंडूंमध्ये १११ धावांची भागीदारी रचली.(Afghanistan)
अखेरच्या षटकात लियाम लिव्हिंगस्टनने या दोघांनाही बाद केल्यामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या सव्वातीनशेवर थांबली. नबीने २४ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा फटकावल्या. झादरानने वन-डे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावताना १४६ चेंडूंमध्ये १२ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १७७ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा स्वत:चाच विक्रम त्याने मागे टाकला. २०२२ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध १६२ धावा करून अफगाणिस्तानतर्फे सर्वोच्च धावांचा विक्रम नोंदवला होता. त्याचप्रमाणे, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वोच्च खेळीचा इंग्लंडच्या बेन डकेटचा १६५ धावांचा विक्रमही मोडीत काढला. मागील आठवड्यात डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६५ धावा केल्या होत्या.(Afghanistan)


संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान – ५० षटकांत ७ बाद ३२५ (इब्राहिम झादरान १७७, हशमतुल्ला शाहिदी ४०, अझमतुल्ला ओमरझाई ४१, महंमद नबी ४०, जोफ्रा आर्चर ३-६४, लियाम लिव्हिंगस्टन २-२८) विजयी विरुद्ध इंग्लंड – ४९.५ षटकांत सर्वबाद ३१७ (जो रूट १२०, बेन डकेट ३८, जोस बटलर ३८, अझमतुल्ला ओमरझाई ५-५८, महंमद नबी २-५७).

हेही वाचा :

तनिशा-ध्रुवची विजयी सलामी

दानिश, करुणने विदर्भाला सावरले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00