Home » Blog » Acb at kejriwals home : केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘एसीबी’चे पथक

Acb at kejriwals home : केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘एसीबी’चे पथक

आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप; केजरीवाल यांना नोटीस

by प्रतिनिधी
0 comments
Acb at kejriwals home

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने ‘आप’च्या काही आमदारांवर जाळे टाकले असल्याचा आरोप गुरुवारी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. (Acb at kejriwals home)

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केजरीवाल यांना ‘आप’ आमदारांना ऑफर’ केल्याच्या आरोपाबद्दल  तपासात सहकार्य करण्याची  नोटीस बजावली आहे.

गुरुवारी केजरीवाल यांनी भाजपने ‘आप’च्या १६ उमेदवारांवर जाळे टाकल्याचा, भाजपकडून ऑफर मिळाल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी पक्ष बदलल्यास प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे केजरीवाल म्हणाले. राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केजरीवाल यांच्या आरोपांचा पुनरुच्चार केला.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, सत्ताधारी पक्षाच्या कायदेशीर सेलचे अध्यक्ष संजीव नसियार यांनी एसीबीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपकडून  हे ‘षडयंत्र’ रचले जात असल्याचा आरोप केला. (Acb at kejriwals home)

एसीबी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. ते कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. संजय सिंग तक्रार दाखल करण्यासाठी एसीबीच्या कार्यालयात आधीच आहेत याची त्यांना माहिती नाही. हे सर्व राजकीय नाटक रचण्याचा भाजपचा डाव आहे. आम्ही नोटिसीबाबत विचारणा केली असता ते नोटीस तयार करण्याच्या सूचना घेत होते. ते भाजपच्या मुख्यालयातून सूचना घेत आहेत की इतर कुठून, हे स्पष्ट नाही, असा टोला नसियार यांनी लगावला. (Acb at kejriwals home)

‘आप’ कडून दहशत माजवण्याचा प्रयत्न : भाजप

दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी लेफ्टनंट गर्व्हरनर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ‘आपने केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. आप आणि त्यांच्या नेत्यांकडून भाजपची प्रतिमा डागाळण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे. दिल्लीत दहशत आणि अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी हे आरोप केल्याचे ते म्हणाले. (Acb at kejriwals home)

‘आप’ नेत्यांनी पुराव्याशिवाय केलेले आरोप गंभीर असल्याचा दावाही भाजप नेत्याने केला.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. भाजपवर केलेले आरोप सिद्ध न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक

आरबीआय’कडून रेपो दरात कपात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00