महाराष्ट्र दिनमान डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भोपळा मिळाला असला तरी काँग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतदानामुळे विधानसभेच्या १३ जागांवर ‘आप’ला फटका बसला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर चित्र वेगळे पहायला मिळाले असते. यापूर्वी ‘आप’वर भाजपची बी टीम म्हणून टीका व्हायची. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर भाजपची बी टीम म्हणून आरोप होण्याची शक्यता आहे.( aap congress)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागापैकी भाजपला ४८ जागा मिळाल्या तर ‘आप’ला २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण १३ जागा अशा आहेत की त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे ‘आप’च्या उमेदवारांचा पराभव झाला.
निवडणुकीत मिळालेली टक्केवारी
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवणाऱ्या भाजपला ४५.८८ टक्के मते मिळाली तर २२ जागा मिळवणाऱ्या ‘आप’ला ४३.६१ टक्के मते मिळाली. दोन्ही पक्षात मताचे अंतर २.२७ इतके आहे. काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना ६.३९ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे विजय आणि पराजयामध्ये २.२७ टक्के मतांचे अंतर आहे. काँग्रेस आणि ‘आप’ हे या दोन पक्षांसह इंडिया आघाडी एकत्रित लढली असती तर आपच्या जागांमध्ये वाढ झाली असती आणि काँग्रेसचे खाते खोलले असते.

aap congress
हेही वाचा :
दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय
विकास आणि सुशासनाचा विजय