प्रा. प्रशांत नागावकर : ‘अभिरुची’च्या ‘श्वेतवर्णी श्यामकर्णी’ या नाटकाच्या सादरीकरणाने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धेची सांगता झाली. (shwetvarni shyamkarni)
विश्वामित्राची परीक्षा घेण्यासाठी धर्मदेव वसिष्ठाच्या वेशात त्यांच्याकडे आले. विश्वामित्र पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तांदूळ घेऊन बाहेर आले. तोपर्यंत पाहुणे गायब झाले होते. परंतु धर्मदेव परत येईपर्यंत विश्वामित्र तेथे शंभर वर्षे तांदूळ घेऊन राहिले. इतकी वर्षे गालवाने विश्वामित्रांच्या सुखसोयींची काळजी घेतली. विश्वामित्र गालवावर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यावर कोणत्याही गुरुदक्षिणेशिवाय मुक्तपणे निघून जाण्याची परवानगी दिली. गालवाला गुरूदक्षिणा द्यायची होती, पण विश्वामित्राने ती स्वीकारण्यास नकार दिला. पण गालवाने घेण्याचा आग्रह धरला आणि नंतर विश्वामित्राने त्याला जे आवडते ते देण्यास सांगितले. परंतु गालव याने नेमकी कोणती गुरूदक्षिणा द्यावी हे सांगण्याचा हट्ट धरला. या हट्टीपणाला वैतागून विश्वामित्र म्हणाले, ‘जा आणि माझ्यासाठी श्वेतवर्णी श्यामकर्णी असे आठशे घोडे घेऊन ये.’ ही मागणी ऐकून गालावाला धक्काच बसला आणि तो विशिष्ट अशा घोड्यांच्या शोधात खूप वणवण भटकला. आणि असे अश्व न मिळाल्याने दुःखी झालं. गरुडाला त्याची दया आली आणि तो त्याला ययातीच्या महालात घेऊन गेला . गालवची कथा ऐकून ययाती त्याला आठशे घोडे देऊ शकत नाही, हे सांगतो पण याचक दारावरून विन्मुख जाऊ नये म्हणून आपली उपवर मुलगी-माधवी त्याला देतो. कन्या माधवी हिला गालवासोबत पाठवले आणि सांगितले तिचा विवाह कोणत्याही राजाशी विवाह केल्यास तो त्याला आवश्यक असलेले आठशे घोडे त्या बदल्यात देईल.( shwetvarni shyamkarni)
गालवाने माधवीला राजांच्या इक्ष्वाकु वंशातील राजा हर्यश्वाकडे नेले. त्या वेळी हर्यश्व संतान प्राप्तीसाठी तपश्चर्या करत होते. गालव म्हणाले की, ‘हर्यश्वाला माधवीचा मुलगा मिळेल आणि म्हणून त्याने माधवीचा स्वीकार करावा आणि त्याच्या बदल्यात आठशे घोडे द्यावेत.’ हर्यश्व अटींना अनुकूल होता पण एकमात्र अडचण अशी होती की, त्याच्याकडे अशा प्रकारचे फक्त दोनशे घोडे होते. ही अडचण पाहून माधवी म्हणाली, ‘मुनी कृपया त्याबद्दल काळजी करू नका. मला ब्रह्मवादी ऋषींचे वरदान आहे की, प्रसूतीनंतरही मी कन्याच राहीन. म्हणून या राजाशी माझे लग्न करून द्या आणि दोनशे घोडे मिळवा. या राजाला मुलगा झाल्यावर मला दुसऱ्या राजाकडे घेऊन जा आणि त्याच्याकडून दोनशे घोडे मिळवा आणि मग दुसऱ्याला आणि अशा प्रकारे मला चार राजांना देऊन तुम्ही आठशे घोडे मिळवू शकता.’ गालवाला ही योजना आवडली आणि म्हणून जेव्हा माधवीला मुलगा झाला तेव्हा तो तिला काशीच्या राजा दिवोदासाकडे घेऊन गेला. जेव्हा त्याला मुलगा झाला तेव्हा गालव तिला भोजाचा राजा उशिनाराकडे घेऊन गेला. अशा प्रकारे गालवाला सहाशे घोडे मिळाले पण उरलेले दोनशे घोडे त्याला देण्यासाठी दुसरे कोणी नव्हते. गालव पुढे काय करायचे याचा विचार करत असताना गरुड त्याच्या मदतीला आला. त्याने गालवाला सहाशे घोडे आणि उर्वरित दोनशे घोड्यांच्या बदल्यात माधवीला विश्वामित्राला देण्याचा सल्ला दिला. गालवाने विश्वामित्राला घोडे आणि माधवी दिले आणि गुरुदक्षिणावर प्रसन्न होऊन विश्वामित्राने गालवाला आशीर्वाद दिला. यानंतर विश्वामित्र माधवीला ययाती राजाकडे पुन्हा सोपवतो ययाती राजा न्यायला आलेला असतो. तिचे दोघे भाऊ तिचं स्वयंवर मांडण्याचे योजतात; पण ती ते उधळून लावून तपाचरणासाठी ती विजनवासात निघून जाते. इथे माधवीच्या या चक्राकार जीवनाचे एक वर्तुळ पूर्ण होते. ( shwetvarni shyamkarni)
सगळं घडतं, घडत जातं आणि माधवी काहीच बोलत नाही. कुणाला साधा सवालही करीत नाही. गालवाच्या मागे मागे ती आंधळेपणाने चालत जाते. एखाद्या प्रामाणिक गायीप्रमाणे. यातली व्यक्तिनिष्ठता हळूहळू गळून पडते आणि उरतात यातली प्रतिकं. माधवी धर्मसत्तेच्या पाशात अडकून केवळ वस्तुजात म्हणून इथून तिथे आणि तिथून इथे फेकली गेलेली. धर्मानेच नागवलेली ही माधवी पुन्हा धर्माच्या शोधात अशी सर्वसंगपरित्याग करून पुढे निघते. हे प्रवृत्तीदर्शक प्रतिक. आपण हळूहळू विश्वामित्र विसरतो, गालव विसरतो, माधवीही विसरतो आणि मानवी प्रवृत्तीच्या आदीम तत्त्वाकडे ओढले जातो. ही माधवीची कथा नेमकी कुठल्या काळातली असेल? धर्माच्या नावानं स्त्रीला आदेश द्यावेत आणि तिनं कुठलाही प्रश्न न विचारता त्या आदेशाच्या पूर्तीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करावं, ही अवस्था याच काळातली असू शकते.( shwetvarni shyamkarni)
पुराणकथेतील हा समकालीन अन्वयार्थ लेखक दिग्दर्शकाने खूप सुंदर मांडला आहे. लेखक-दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञान या सर्वांच्या एकात्मिक कलात्मकाने सुंदर प्रयोग सादर करण्यात अभिरुची यशस्वी झाली आहे. जितेंद्र देशपांडे यांची सहिता खूप आशयपूर्ण आहे. पण संहितेचे थोडं संपादन होणे आवश्यक होते. लेखकच जरा दिग्दर्शक असेल तर दिग्दर्शनासाठी वेगळी रंगावृत्ती करण्याची गरज भासत नसावी. त्यामुळे दिग्दर्शकीय संस्कार वेगळे असे दिसून आले नाहीत.( shwetvarni shyamkarni)
यातील कलाकार हे अनुभवी असल्याने आपल्या व्यक्तिरेखा त्यांनी तितक्याच ताकदीने उभ्या केल्या. धनंजय पाटील यांनी उभा केलेला गालव अस्वस्थ करून सोडतो. माधवीची चाललेली फरफट त्यांनी अत्यंत तळमळीने सादर करण्याचा प्रयत्न केला. महेश गोटखिंडीकर यांनी चार व्यक्तिरेखा साकारल्या. पण व्यक्तिरेखांमधला वेगळेपणा दाखवण्यात ते काहीसे अयशस्वी झाले. ययाती आणि सुपर्ण झालेले चंद्रशेखर फडणीस आणि प्रफुल्ल गवस यांनी आपल्या भूमिका खूपच समजून घेऊन साकारल्या. या सर्वामध्ये अभिनयाच्या पातळीवर उठून दिसली ती मानसी बोकुरे. वास्तविक या सर्व कलाकारांमध्ये ती अनअनुभवी. पण माधवीची व्यक्तिरेखा परिपक्वपणे साकारली आहे. आणि खऱ्या अर्थाने माधवीच्या दुःखाला, तिच्या आर्ततेला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे.
तांत्रिक पातळीवर प्रकाश योजनेमध्ये अत्यंत सफाईदारपणा होता. कपिल मुळे प्रकाशयोजनाकारांमधील एक महत्त्वाचं नाव. प्रकाश योजनेमध्ये आताषबाजी करण्यापेक्षा आशयाच्या पातळीवर काम करण्याचे त्यांचे कौशल्य आहे. या नाटकातून हे कौशल्य पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले.
नेपथ्यकाराने पाच दगडी खांबाच्या कोरीव लेण्यातून पूर्वीचा काळ साकारला. या नाटकात वेशभूषा अतिशय महत्त्वाची ठरली. आर्या गोटखिंडीकर यांनी वेशभूषेच्या माध्यमातून पुराण काळ तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच या स्पर्धेतील अंतिम नाटक अत्यंत सफाईदारपणे सादर झाले. शेवटचे नाटक असल्याने कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांनी खूपच गर्दी केली होती. ही स्पर्धा सर्व पातळ्यांवर अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक पातळीवर झाली. या स्पर्धेने कोल्हापुरातील हौशी नाट्य कलावंतांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली. कोल्हापुरातील सांस्कृतिक वातावरण या स्पर्धेमुळे नक्कीच उल्हासित झाले.
(छाया : अर्जुन टाकळकर)
- नाटक : श्वेतवर्णी-शामकर्णी
लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य : जितेंद्र देशपाडे
सादरकर्ते : अभिरूची, कोल्हापूर
निर्मितीप्रमुख : सुधीर जोशी, प्रसाद जमदग्नी
प्रकाश योजना : कपिल मुळे
पार्श्वसंगीत : विकास गुळवणी
वेशभूषा : आर्या गोटखिंडीकर
रंगभूषा : महेश जाधव - भूमिका आणि कलावंत
गालव : धनंजय पाटील
माधवी : मानसी बोळुरे
विश्वामित्र, हर्यश्र्व, दिवोदास, औशीनर : महेश गोटखिंडीकर
ययाती : चंद्रशेखर फडणीस
सुपर्ण : प्रफुल्ल गवस.
हेही वाचा :