कोल्हापूर : प्रतिनिधी : बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाला सम्राटनगर स्पोर्टस् ने २-२ असे बरोबरीत रोखले. वेताळमाळ तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ३-० असा विजय मिळवला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित केएसए अ गट वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Football KSA)
पाटाकडील संघाला सम्राटनगर स्पोर्टसने कडवी झुंज दिली. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला सम्राटनगरच्या अभिषेक सिंगने मैदानी गोल करत खळबळ उडवून दिली, पण ३६ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथेने गोल करत पाटाकडील संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरास हीच स्थिती होती. उत्तरार्धात पाटाकडीलच्या अक्षय मेथेने गोल करुन संघास आघाडी मिळवून दिली. पाटाकडील संघ सामना जिंकणार असे वाटत असताना ७९ व्या मिनिटाला सामन्याला कलाटणी मिळाली. सम्राटनगरच्या निरंजन कामतेने गोल करुन संघाला २-२ असे बरोबरीत आणले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. (Football KSA)
दुपारच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला संपूर्ण सामन्यात डोके वर काढू दिले नाही. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला आकाश माळीने गोल करत वेताळमाळचे खाते उघडले. त्यानंतर तीनच मिनिटात वेताळमाळने प्रॅक्टिसला दुसरा धक्का दिला. आठव्या मिनिटाला प्रणव कणसने गोल केला. मध्यंतरास वेताळमाळ २-० अशा गोलफरकाने आघाडीवर होता. (Football KSA)
उत्तरार्धात प्रॅक्टिसने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. ४८ व्या मिनिटाला चंदन गवळीने गोल करत वेताळमाळ संघाला ३-० अशी घसघशीत आघाडी मिळवून दिली. तीन गोलच्या दबावामुळे प्रॅक्टिसचा खेळ विस्कळीत झाला. तीन गोलची आघाडी कायम टिकवत वेताळमाळने सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली.
- गुरुवारचे सामने
- झुंजार क्लब वि. बीजीएम स्पोर्टस् : दुपारी २.०० वा.
- खंडोबा तालीम मंडळ वि. दिलबहार तालीम मंडळ : दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
बुमराह ठरला ‘प्लेयर ऑफ दि मंथ’