Home » Blog » Shami : महंमद शमीचे पुनरागमन

Shami : महंमद शमीचे पुनरागमन

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Shami

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मगील जवळपास सव्वा वर्ष दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असणारा वेगवान गोलंदाज महंमद शमीला या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. (Shami)

पाच सामन्यांच्या या मालिकेस २२ जानेवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिकाही खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी भारताची ही अखेरची मालिका आहे. त्यामुळे, खेळाडूंचा फिटनेस व कामगिरी यांची चाचपणी करण्याची अखेरची संधी हणून या मालिकेकडे पाहण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शमीची निवड टी-२० मालिकेसाठी करण्यात आली. (Shami)

नोव्हेंबर २०२३ मध्ये वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने मागील वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर, त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडण्यात येण्याचीही चर्चा रंगली होती. तथापि, शमी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय कसोटी क्रिकेटसाठी त्याचा विचार करण्यात येणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले होते. भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर शमीचा संघात समावेश न केल्याबद्द्ल बीसीसीआयवर टीकाही करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक या देशांतर्गत वन-डे स्पर्धेमध्ये शमीने बंगालकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे, इंग्लंडविरुद्ध त्याला संघात स्थान देण्यात आले. (Shami)

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टी-२० संघामध्ये नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून खेळलेल्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा या भारताच्या कसोटी संघातील चौघांजणांना टी-२० संघातही स्थान मिळाले आहे. अक्षर पटेलकडे या संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. (Shami)

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, महंमद शमी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा :
विदर्भ, हरियाणा उपांत्य फेरीत

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00