नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडी भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून भाजप आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी एनडीए नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधकांकडून सुरू असलेल्या फेक नॅरेटिव्हचा सामना करण्यासाठी एनडीएने संयुक्त आघाडी उभारण्याची गरज याविषयी चर्चा करण्यात आली. (Shah Nadda )
शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुमारे तासभर एनडीए नेत्यांची भेट घेतली. सूत्रांनी सांगितले की, शाह यांच्या वक्तव्यावरुन भाजपवर विरोधकांनी केलेला हल्ला, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाचे राजकारण हे मुख्य विषय होते. काँग्रेस खोटे नरॅटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे शाह यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह नेत्यांसमोर स्पष्ट केले. याचा मुकाबला एनडीएला एकजुटीने करावा लागेल.(Shah Nadda )
नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते.
जदयूचे नेते, केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लालन सिंह आणि शिवसेनेचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी, टीडीपी नेते आणि नागरी विमान वाहतूक मंत्री, के राममोहन नायडू आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, जीतन राम मांझी आणि संजय निषाद उपस्थित होते.(Shah Nadda )
शाह म्हणाले की, काँग्रेसने कधीही आंबेडकरांचा आदर केला नाही, परंतु आता त्यांच्या बाजूने एक खोटी कथा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा जोरदार आणि एकजुटीने सामना केला पाहिजे. यावेळी त्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काय झाले यांसह अलीकडील राजकीय घडामोडींविषयी उपस्थित नेत्यांशी चर्चा केली. बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्याआधी एक दिवस बैठक झाली.