दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. या क्रमवारीत ९०४ गुणांसह अग्रस्थानी असणारा बुमराह या गुणांपर्यंत पोहोचणारा रविचंद्रन अश्विननंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. (Bumrah)
मागील आठवड्यातही बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत ८९० गुणांसह अग्रस्थानीच होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी स्पर्धेतील ब्रिस्बेन येथील तिसऱ्या कसोटीत बुमराहने दोन्ही डावांत मिळून ९४ धावांत ९ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे त्याच्या खात्यात १४ गुणांची भर पडून ९०४ गुण झाले आहेत. आतापर्यंत भारताच्या केवळ अश्विनला कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ९०४ गुण मिळवण्यात यश आले होते. २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मुंबईतील चौथ्या सामन्यानंतर तो ९०४ गुणांसह अग्रस्थानी पोहोचला होता. (Bumrah)
बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन कसोटींत १०.९० च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या आहेत. सध्या तो या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीमध्ये त्याने कामगिरीत सातत्य राखल्यास तो आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरू शकतो.
हेही वाचा :
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर
कोण आहे तनुष कोटियन?