जोहान्सबर्ग : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना ३६ धावांनी जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. डकवर्थ लुइस नियमानुसार पाकच्या ९ बाद ३०८ धावांचा पाठलाग करताना यजमान आफ्रिकेचा डाव २७१ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला मायदेशात प्रथमच वन-डे क्रिकेट मालिकेत एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. (Pak Series win)
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पाकने सलामीवीर साइम अयुबच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३०८ धावा फटकावल्या. अयुबने मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील तिसरे वन-डे शतक झळकावताना ९४ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. कर्णधार महंमद रिझवान आणि बाबर आझम यांनी अर्धशतके पूर्ण केली. बाबरने ७१ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ५२, तर रिझवानने ५२ चेंडूंमध्ये ५ चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या. आफ्रिकेतर्फे कॅगिसो रबाडाने ३, तर फॉर्ट्युइनने २ विकेट घेतल्या.
पाकचे आव्हान पेलण्यात आफ्रिकेच्या संघाला अपयश आले. हेन्रिक क्लासेन वगळता आफ्रिकेच्या कोणत्याच फलंदाजास मोठी खेळी करता आली नाही. क्लासेनने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावताना अवघ्या ४३ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकार लगावत ८१ धावा ठोकल्या. तळातील कोर्बिन बॉशने नाबाद ४० धावा केल्या. पाकच्या सुफियान मुकीमने ५२ धावांत ४ बळी टिपले. शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. सामनावीर व मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार साइम अयुबला मिळाले. (Pak Series win)
हेही वाचा :