ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज महंमद शमीसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली आहेत. तथापि, त्याच्या फिटनेसविषयी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) हमी देणे आवश्यक आहे. शमीच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा समावेश संघात करण्यात येईल, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. (Mohammad Shami)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील ब्रिस्बेन कसोटीनंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान रोहितने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामन्यांअखेर भारत व ऑस्ट्रेलियामध्ये १-१ अशी बरोबरी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने भारताला उर्वरित दोन्ही कसोटी जिंकणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शमीचा समावेश संघात केल्यास भारतीय गोलंदाजीला धार येऊ शकते. रोहितने मात्र याविषयी बोलताना एनसीएकडे बोट दाखवले.
“शमीच्या फिटनेसविषयी एनसीएमधील कोणीतरी स्पष्टीकरण देण्याची वेळ आता आली आहे. शमी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहे. तथापि, त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीविषयी अद्यापही तक्रारी आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर खेळाडू दुखापतग्रस्त होणे हे कोणालाच नको आहे. त्यामुळे, आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. त्याच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा समावेश संघात केला जाईल. अर्थात, तो संघात परतल्यास मला आनंदच होईल,” असे रोहित म्हणाला. या मालिकेतील चोथ्या कसोटीस २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, संघात काही फेरबदल होतात का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (Mohammad Shami)
हेही वाचा :