Home » Blog » Kung Fu Hustle कराटेपटांमधलं एव्हरेस्ट

Kung Fu Hustle कराटेपटांमधलं एव्हरेस्ट

कुंग फू पटांची खासियत म्हणजे ते बहुतेक देमार पटांसारखे डोकं बाजूला ठेवून बघण्याचे सिनेमे नाहीत. या सिनेमांना बहुतेक एक अध्यात्मिक डूब असते.

by प्रतिनिधी
0 comments
Kung Fu Hustle file photo

-अमोल उदगीरकर

मला कराटेपट/कुंग फू आवडतात. मी अगदी मन लावून ते बघतो. झी टीव्ही आणि मी असे दोघेही बाल्यावस्थेत असताना झीवर ‘हिमगिरी का वीर’ नावाची डब मालिका दाखवायचे. ती मी अतिशय आवडीने बघायचो. त्यात कुंग फू ऍक्शनचा जोरदार धमाका होता. पण विशेष मजेशीर गोष्ट म्हणजे ‘हिमगिरी का वीर’ मधल्या सगळ्या पात्रांना महाभारतातल्या व्यक्तिरेखेची नाव दिलेली होती. त्यात नायकाचं नाव अर्जुन होतं तर खलनायकाचं नाव छोटा कर्ण असं काही तरी होतं. तर तेव्हापासून लागलेला चस्का नंतर कुंग फू सिनेमे बघण्याच्या व्यसनात रूपांतरित झाला. ब्रुसलीचा ‘एंटर द ड्रॅगन’, जॅकी चेनचे सिनेमे, ‘ईप मॅन’ चे पहिले दोन भाग, ‘कराटे किड’ (नवीन आणि जुना दोन्ही ), आणि अगदी ऍनिमेशनपट असणारा ‘ कुंग फु पांडा’ (तिन्ही भाग ) मला प्रचंड आवडतात. या सिनेमांचा प्रचंड प्रभाव ज्यांच्यावर पडला आहे त्यांच्यामध्ये टारंटिनो सारख्या महत्वाच्या दिग्दर्शकाचा पण समावेश आहे. त्याच्या ‘किल बिल’ मध्ये हा प्रभाव स्पष्टच दिसून येतो. कुंग फू पटांची खासियत म्हणजे ते बहुतेक देमार पटांसारखे डोकं बाजूला ठेवून बघण्याचे सिनेमे नाहीत. या सिनेमांना बहुतेक एक अध्यात्मिक डूब असते. बौद्ध धर्मातल्या तत्त्वांचा या सिनेमाच्या पटकथेवर प्रभाव असतो. मुख्य म्हणजे एक्शनपट पुरुषांनाच आवडतात या नियमांना हे सिनेमे छेद देतात. या सिनेमात हिंसाचार असतो पण अतिरक्तपात नसतो. मुख्य म्हणजे या सिनेमांमध्ये नायिका या शोपीस नसतात तर लढवय्या असतात. पुरुषांच्या बरोबरीने दे दणादण हाणामारी करतात. (Kung Fu Hustle)

पण, एक असा कुंग फू पट आहे जो माझ्यासाठी या वरच्या सगळ्या सिनेमांपेक्षा दशांगुळे सरस आहे. तो सिनेमा म्हणजे ‘कुंग फु हसल’. ‘ये सिर्फ मुव्ही नही, एक इमोशन है’ असा घासूनपुसून गुळगुळीत झालेला वाक्प्रचार माझ्यापुरता ‘कुंग फु हसल’ च्या बाबतीत तरी खरा आहे.

सिनेमाची गोष्ट वरकरणी सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधली लढाई अशी वाटू शकते. पण तसं खरंच आहे का? एका शहरावर दहशत ठेवून असणा-या एक्स गँगची टक्कर एका चाळीत राहणाऱ्या काही रहिवाशांशी होते. या संघर्षाशी काहीही देणंघेणं नसणारा एक भुरटा चोर या संघर्षात स्वतःच्या मूर्खपणामुळे ओढला जातो. अशा दोन ओळीत सिनेमाची कथा सांगणं म्हणजे भगवदगीतेचे सार दोन ओळीत सांगण्यासारखं आहे. टिपिकल मसालापट असून पण ‘कुंग फु हसल’ फिल्ममेकिंगच्या अनेक नियमांना फाट्यावर मारतो. या सिनेमात खलनायक एक्स गॅंग आहे असं प्रेक्षकाला वाटत असतानाच मध्यंतराच्या अलीकडे खऱ्या खतरनाक खलनायकाची एंट्री होते. कसा आहे हा खलनायक? चेहऱ्यावर कारकुनी भाव असणारा. काहीसा स्थूल. डोळ्यावर चष्मा घातलेला. सिनेमात खरा नायक कोण आहे ते सगळ्यात शेवटी कळतं. जे पात्र फक्त विनोदनिर्मितीसाठी आणि कॉन्फ्लिक्ट तयार करण्यासाठी आहे, तो खरा नायक आहे, हे कळल्यावर जबर धक्का बसतो. पण नंतर काळजीपूर्वक बघितल्यावर त्याच्या नायक असण्याचे क्ल्यू सिनेमाभर सोडले आहेत, हे लक्षात येतं. (Kung Fu Hustle)

सिनेमाचं अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे चाळीत राहणाऱ्या वल्ली. चाळीत राहणाऱ्या या व्यक्ती वरपांगी साधारण, घाबरट आणि loser वाटतात. पण नंतर त्यांच्या अंगी कशा नाना कळा आहेत हे फार उत्तमपणे दाखवलं आहे. सुपरहिरो समाजात आल्टर इगोच्या बुरख्यात लपून असतात, ही थियरी सिनेमात उत्कृष्टरित्या दाखवली आहे. आपलं सध्याचं जग पण असंच आहे. वरून काहीतरी वेगळंच दिसणारं आणि आतून काहीतरी वेगळंच असणारं. चाळीची जहाँबाज खडूस कजाग भांडकुदळ मालकीण जिला तिच्या नवऱ्यासकट सगळे टरकून असतात, ती या सिनेमात सगळ्यात जमून आलेलं पात्र आहे. सिनेमात एक छोटीशी सुंदर प्रेमकथा पण आहे. सिनेमातली एक्शन भन्नाट आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच सिनेमात पूर्णपणे वाट लावलेली आहे. आपले साऊथ इंडियन सिनेमे `कुंग फू हसल` समोर माना खाली घालून शरणागती पत्करतील. पण हा सिनेमा एकदा बघून एन्जॉय करून सोडून देण्यासारखा आहे का? तर नाही. अंडरडॉग- ज्याच्या बद्दल नंतर आपल्याला सहानुभूती निर्माण होते, त्याचं रूपांतर शेवटी एका फायटर नायकात होण्याची प्रक्रिया जितकी मनस्वी, सुंदर आहे तितकीच अध्यात्मिक आहे. आणि क्लायमॅक्समधला शेवटचा ऍक्शन सीन म्हणजे वल्लाह, अझिमोशां शहेनशहा आहे. आणि सिनेमाचा शेवट पण तितकाच सुंदर. पुन्हा एक्शनपटांच्या नियमांना फाट्यावर मारणारा. मला या सिनेमाचं वाचोवस्की ब्रदर्सच्या ‘मॅट्रिक्स’ चित्रत्रयीच्या बाबतीत जाणवतं. (Kung Fu Hustle)

सिनेमात एक भिकारी दाखवला आहे. तो लहान मुलांना फसवून त्यांच्याकडचे पैसे घेऊन त्यांना कुंग फू ची पुस्तकं विकत असतो. त्याच्याकडे कुंग फू कसा करावा, हठयोग कसा करावा, कुंडलिनी जागृत करण्याची पुस्तकं असतात. सिनेमातला नायक अशा हळुवार संवेदनशील क्षणी आपल्याकडचे आहे नाही ते पैसे देऊन त्याच्याकडून पुस्तकं विकत घेतो आणि अपमान मानभंग विकत घेतो. पण त्या पुस्तक विकत घेण्याच्या छोट्या कृतीचे परिणाम किती मोठे होतात, हे बघण्यासाठी सिनेमाचं बघायला पाहिजे. आता सध्याच्या अस्थिर असुरक्षित जगात पुस्तकासाठी आपला पैशांचा गल्ला फोडणाऱ्या मुलांची खूप गरज आहे. आता पुन्हा हा संदर्भ समजण्यासाठी तुम्हाला हा भन्नाट सिनेमा बघावाच लागेल. ‘कुंग फू हसल’ नक्की बघा.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00