मुंबई : विशेष प्रतिनिधी : बांग्लादेशात गेल्या तीन, चार महिन्यापासून हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉन मंदिर जाळले जाते. त्याच्या प्रमुखाला अटक होते, पण आपले विश्वगुरु त्याबद्दल गप्प का आहेत? त्यांनी त्याबाबतची भूमिका मांडावी. एक फोन करून युक्रेनचे युद्ध जसे थांबवले तसे हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. (Uddhav Thackrey)
बांग्ला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाच्या खासदारांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची भेट मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी व भाजपावर कडाडून टीका केली.
ते म्हणाले, ‘निवडणुकीत केवळ हिंदूंची मते मिळवण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देऊन मते मिळवली जातात. मात्र जिथे अत्याचार होतात तिथे सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. दोन-तीन महिन्यांपूर्वी बांग्लादेशचा क्रिकेटचा संघ इकडे आला होता त्यावेळी आदित्यने हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र साहजिकच सत्ताधारी भाजपाने अपेक्षेप्रमाणे काहीही केले नाही. (Uddhav Thackrey)
मणिपूरप्रमाणेच बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे पंतप्रधानांचे लक्ष नाही. या विषयावर त्यांची, केंद्र सरकारची भूमिका संसदेत मांडावी यासाठी आमच्या खासदाराचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देशात, जगभरात फिरायचे असल्याने वेळ देण्यात आला नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. (Uddhav Thackrey)
दादर रेल्वे स्थानकाजवळ ८० वर्षांपूर्वी हमालांनी बांधलेले हिंदू मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने नोटीस काढली आहे. ‘सिडको’मधील मंदिरासाठीच्या आरक्षित जागांवर कोणाचा डोळा आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
बावनकुळेंचे प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सत्तेसाठी जे हिंदुत्वाची कास सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलताहेत, तुमचे हिंदू प्रेम किती बेगडी होते हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
हेही वाचा :
संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे
पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा
https://x.com/cbawankule/status/1867488325382353257