Home » Blog » Ajinkya Rahane : रहाणेची बॅट तळपली

Ajinkya Rahane : रहाणेची बॅट तळपली

विदर्भाला नमवून मुंबई उपांत्य फेरीत

by प्रतिनिधी
0 comments
Ajinkya Rahane file photo

बेंगळुरू : अजिंक्य रहाणेच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने विदर्भाचा ६ विकेटनी पराभव करताना २२२ धावांचे खडतर आव्हान १९.२ षटकांत पार केले. उपांत्य फेरीत मुंबईचा सामना बडोदा संघाशी होईल.  (Ajinkya Rahane)

या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २२१ धावा केल्या. अथर्व तायडे आणि करुण नायर या विदर्भाच्या सलामी जोडीने पॉवर-प्लेमध्ये ६० धावा फटकावल्या. अथर्व अंकोलेकरने नायरला बाद करून ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ पार्थ रेखाडेही बाद झाल्यानंतर तायडेने अपूर्व वानखेडेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. तायडेने ४१ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह ६६ धावा केल्या. वानखेडेने ३३ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. अखेरच्या षटकांत शुभम दुबेच्या फटकेबाजीमुळे विदर्भाला २२० धावांचा टप्पा ओलांडता आला. मुंबईकडून अंकोलेकर आणि सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.  (Ajinkya Rahane)

विदर्भाच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी ७ षटकांमध्ये ८३ धावांची सलामी दिली. शॉ २६ चेंडूंमध्ये ५ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव झटपट बाद झाले. रहाणेने मात्र एक बाजू लावून धरत १० चौकार व ३ षटकारांसह ४५ चेंडूंमध्ये ८४ धावा फटकावल्या. रहाणे बाद झाल्यानंतर शिवम दुबे (नाबाद ३७) आणि सूर्यांश शेडगे (नाबाद ३६) यांनी नाबाद ६७ धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय साकारला.

मुंबईचा नवा विक्रम

मुंबईने या सामन्यात ४ बाद २२४ धावा करून आपल्या नावे नवा विक्रम नोंदवला. पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीतील हा सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी हा विक्रम कराची डॉल्फिन्स संघाच्या नावावर होता. त्यांनी टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीत २१० धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले होते. Cricket

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00